Breaking News

टेस्टिंग वाढवल्याने रुग्णसंख्येत वाढ होतेय, मात्र मुंबईची परिस्थिती वाईट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची माहिती

नाशिक: प्रतिनिधी

राज्यात टेस्टिंग वाढवल्याने कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. रुग्णांसाठी बेड्सची संख्या वाढवण्याच्यादृष्टीने आरोग्य खात्याकडून पुढील काही दिवसात महत्त्वपूर्ण पावले टाकण्यात येतील. त्यासाठी एक यंत्रणा तयार करण्यात आली आहे. भारतात सध्या महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली आणि कर्नाटक या राज्यात रुग्णसंख्या वाढली आहे. महाराष्ट्राचा विचार केल्यास मुंबई, ठाणे, पुणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक, सोलापूर, अकोला याठिकाणी कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यातही मुंबई येथील स्थिती अधिक वाईट असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्पष्ट केले.

अनेक तज्ज्ञांनी आपल्याला येत्या काळात कोरोनासोबत जगावे लागेल, असे मत व्यक्त केले आहे. राज्यातील ज्या जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत त्या जिल्ह्यांतील सर्व प्रमुखांची बैठक घेऊन, समस्या जाणून त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे नाशिक दौऱ्यावर असून आज त्यांनी कोरोना पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. नाशिकमधील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नियोजन भवन, नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील कोरोना उपाययोजनांचा आढावा शरद पवार यांनी घेतला. त्यांच्यासोबत आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, कृषी मंत्री दादाजी भुसे आदी उपस्थित होते. तसेच त्यानंतर स्थानिक पत्रकारांशी संवादही साधला.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागील काही महिने कोरोनाशी लढण्यावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेऊन त्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांना द्यावा हा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने आज नाशिक जिल्हा आढावा बैठक घेण्यात आल्याचे ते म्हणाले.

राज्याचे आरोग्य विद्यापीठ नाशिकमध्ये आहे. पण तेथील डॉक्टर रुग्णसेवा देण्यासाठी पुढे येत नाहीत असे करून चालणार नाही. जिल्ह्याच्या यंत्रणेला डिझास्टर मॅनेजमेंट कायद्यानुसार डॉक्टरांवर अधिकारांचा वापर करावा लागू नये ही सरकारची भूमिका आहे. पण वेळ आल्यास तशी सक्ती करण्याची गरज भासू शकते असा इशाराही त्यांनी यावेळी स्थानिक डॉक्टरांना दिला.

शरद पवार यांनी नाशिक जिल्ह्यातील गरजू कोरोना रुग्णांसाठी रेमडेसिव्हिर या महागड्या औषधांची उपलब्धता करून ५० औषधे जिल्हाधिकाऱ्यांच्या सुपूर्द केली. याआधी देखील २५ औषधे देण्यात आली होती. तसेच गरजू रुग्णांच्या उपचारांसाठी नेहमीच पुढाकार घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

आरोग्याप्रमाणे आर्थिक संकटदेखील मोठे आहे. राज्यात नामांकित औद्योगिक केंद्रे आहेत. ही केंद्रे सुरू करून महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती कशी सुधारता येईल याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा असे आवाहनही जिल्हा प्रशासनाला केले. मात्र कोरोना रुग्णसंख्या वाढेल अशी भूमिका कोणी घेऊ नये. आतापर्यंत विशेषतः महाराष्ट्रातील अल्पसंख्याक समाजाने बासी ईद, रमजान ईदच्या वेळेस अतिशय समंजसपणाची भूमिका घेतली. याचे उत्तम उदाहरण मालेगाव आहे. त्यामुळे असेच सहकार्य यापुढेही असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *