Breaking News

कोटा येथे अडकलेले ३२ विद्यार्थी रायगडकडे रवाना पालकमंत्री आदिती ठाकरे यांची माहिती

अलिबाग: प्रतिनिधी
राजस्थान येथील कोटा येथे आय.आय.टी., मेडिकलच्या प्रवेश परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील विद्यार्थी गेले होते. करोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे देशात सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे ते विद्यार्थी त्या ठिकाणीच अडकले होते. त्यांना परत गावाकडे आणण्यासाठी त्यांच्या पालकांनी जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार आज २८ रोजी पहाटे कोटा येथून या ३२ विद्यार्थ्यांना घेवून बसेस निघाल्या आहेत. प्रवासात त्यांच्याकरिता उज्जैन व धुळे येथे फूड पॅकेट्सची व्यवस्था करण्यात आली आहे.
याबाबत पालकमंत्री तटकरे यांनी देखील राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तात्काळ पत्राद्वारे याबाबत विनंती केली होती. त्याचप्रमाणे राजस्थान सरकारसोबत सुद्धा त्यांनी संपर्क साधला होता. त्यांच्या या मागणीला यश आले असून राजस्थान सरकारने रायगड जिल्ह्यातील त्या विद्यार्थ्यांना आपल्या मूळ गावी रायगड जिल्ह्यात जाण्यासाठी परवानगी दिली. यासाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनीही कोटा येथील जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून या विदयार्थ्यांना कोटा येथून रायगडला आणण्याच्या नियोजनाबाबत चर्चा केली. अपर जिल्हाधिकारी डॉ.भरत शितोळे, तहसिलदार विशाल दौंडकर यांनी पुढील समन्वयाची आवश्यक ती तयारी केली.
लॉकडाऊन कालावधी सुरू असून खबरदारी म्हणून त्यांना पनवेल येथे आणल्यानंतर त्यांची कोविड-१९ चाचणी करण्यात येणार आहे. त्यानंतर किमान २८ दिवसांपर्यंत या सर्व विद्यार्थ्यांना होम क्वारंटाईन करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

Check Also

जयराम रमेश यांचे भाकित, मतदानाचे संकेत स्पष्ट, मोदी सरकारला निरोप…

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील १०२ जागांवर झालेले मतदान हे भाजपा व नरेंद्र मोदी सरकारचे शेवटचे दिवस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *