Breaking News

मुख्यमंत्र्यांचे आदेश, भूमिपुत्रांना रोजगार द्या रोजगार संधीसमवेत त्यांना योग्य प्रशिक्षण ही देण्याचे निर्देश

मुंबई: प्रतिनिधी
राज्यात सुरू असलेल्या मेट्रोसारख्या पायाभूत सुविधांच्या विकास कामासांठी स्थानिकांना रोजगार देऊन कामे बंद पडू देऊ नका. भूमिपुत्रांना रोजगार देतानाच कामांसाठी लागणारे प्रशिक्षण द्या, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर मेट्रो तसेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आदी विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी मंत्रालयात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, संजय बनसोड, मुख्य अजोय मेहता, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव उपस्थित होते.
कोरोनामुळे राज्यभरात लॉकडाऊन झाले. आता मुंबई महानगर परीसर, पुणे वगळता राज्यात अन्य ठिकाणी उद्योग सुरू झाले आहेत. मात्र मजुरांची आणि कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत आहे. परराज्यातील मजूर त्यांच्या गावी गेले आहेत. ते जेव्हा परत येतील तोपर्यंत त्यांच्यावर विसंबून न राहता विकास कामांसाठी लागणारे कुशल, अकुशल कर्मचारी, मजूर यांची विभागवार यादी करा. त्याचबरोबर कोणत्या विभागात रोजगार उपलब्ध आहे याचाही तपशील घ्या आणि राज्यभर कुशल मनुष्यबळ उपलब्धतेसाठी जाहीराती द्या. खासकरून जेथे जेथे मेट्रोचे कामं सुरू आहेत तेथे मोठ्या प्रमाणावर जाहीराती द्या. त्यामुळे राज्यातील भुमीपुत्रांना रोजगार मिळेल. सुरूवातीच्या काळात या भूमिपुत्रांना काही काळ प्रशिक्षण देण्याची व्यवस्था देखील करावी, असेही त्यांनी सांगितले.
राज्य शासनाच्या कौशल्य विकास विभागाच्या समनव्यातून कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावेत. विकास कामे करतांना त्याचा प्राधान्यक्रम ठरवा, पावसाळा सुरू होत आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे काही ठिकाणी सुरू असलेली विकास कामे बंद आहेत. अशा वेळी प्रमुख शहरांमध्ये कुठलीही अडचण, पुरस्थिती उद्भवणार नाही याची दक्षता घेवून तातडीने डेब्रीज उचलणे, ड्रेनेज पाईप दुरुस्ती करणे आदी कामांवर लक्ष देण्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मुंबई मेट्रो, पुणे, नागपूर, नाशिक मेट्रोबाबत सादरीकरण करण्यात आले.

Check Also

महाराष्ट्र लोकसेवा आयोग लवकरच ‘या’ परिक्षांच्या तारखा जाहीर करणार

सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण विचारात घेऊन नव्याने आरक्षण निश्चिती करून लवकरच सुधारित परिक्षांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *