Breaking News

उत्पादकतेला आरोग्याची जोड द्यावी लागणार कोरोनासोबत जगण्यासाठी पोटाला भाकर आणि हाताला काम द्यावे लागेल

चीनमध्ये डिसेंबर १९ ला मध्ये आढळून आलेल्या covid-19 विषाणूचा फैलाव भारतात होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे मार्च २४ ला लॉकडाउन सुरू झाला. १३० कोटीचा देश स्तब्ध झाला. यामुळे मोठ्या जनसंख्येचे उत्पन्न बुडाले, बचत संपायला लागली, रोजगार बुडाला. साहजिकच साथ येण्यापूर्वी डबघाईस आलेली अर्थव्यवस्था पूर्ण बुडण्याच्या मार्गावर आहे.
धोरणकर्ते लॉकडाउनमध्ये काय करावे काय करू नये याच्या सूचना देत असताना, छोटे व्यवसाय आणि रोजगार ठप्प झाले. त्यामुळे कोरोना व्हायरस पेक्षा गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली. यामुळे रुपयाची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत कमी होत जाणार आहे. क्रूड ऑइलच्या घसरत्या किंमती हाही एक विचार करायला लावणारा विषय आहे. म्हणजेच सकल घरेलू उत्पादनाचा दर खाली जाणार आहे. जो व्यक्ती पूर्वी १०० रुपये खर्च करीत होता, तो आता फक्त ४० रुपये खर्च करू शकणार आहे. त्यातही मोठा वाटा हा अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचा असणार आहे.
अशा परिस्थितीत कोरोनाची लस मिळेपर्यंत लॉकडाउन सुरूच राहिल्यास प्रसिद्ध उद्योगपती नारायण मूर्ती म्हणाल्या नुसार आपणास हे ठरवावे लागेल की, कोरोना व्हायरसमुळे मरु द्यावे की भूकबळी होऊ द्यावेत. कारण सकल घरेलू उत्पादन दर खाली जात आहे. असंघटित क्षेत्रातील नोकऱ्या संपल्यात जमा आहेत. अर्धवट तयारीने केलेल्या लॉकडाउनमुळे श्रमिक आपल्या गावी मिळेल त्या मार्गाने जात आहेत. पुढील सहा महिने कामाचे तास कमी होणार आहेत. वाहन उद्योगाचे उदाहरण घेतल्यास वाहन उद्योगाचा जीडीपीमध्ये वाटा १% आहे आणि सरकारी महसुलात ११% वाटा आहे. सुमारे चार कोटी लोकांना रोजगार पुरविणाऱ्या या व्यवसायाची स्थिती अशी आहे की या उद्योगाच्या इतिहासात पहिल्यांदाच एप्रिल महिन्यात एकही गाडी विकली गेली नाही. हीच परिस्थिती माहिती तंत्रज्ञान, वित्तीय संस्था, विमा, ऊर्जा इत्यादी क्षेत्रात आहे. सिमेंट, नैसर्गिक वायू, खते, स्टील, वीज, क्रूड ऑइल हे सर्व व्यवसाय उणे २५% ते उणे ५% असे नुकसानीत आहेत. पर्यटन, बांधकाम उद्योग, रिफायनरी हे उद्योग बुडल्यात जमा आहेत. याची फार मोठी किंमत भारतीय अर्थव्यवस्थेला चुकवावी लागणार आहे. एका अंदाजानुसार सुमारे ३२ हजार कोटी रुपये प्रतिदिन एवढे नुकसान अर्थव्यवस्थेला होत असून, त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे.
ही परिस्थिती ओढवण्याचे मुख्य कारण म्हणजे आपली नफेखोरी वर आधारित अर्थव्यवस्था, भांडवलशाही. परंतु शेतकरी मजूर संपला तर देश संपेल आणि देश वाचवायचा असेल तर शेतकरी, शेती, शेतमजूर, लघुउद्योग आणि कामगार वाचवावे लागतील. त्यामुळे कोरोना सह जगण्याची कला वैद्यकीय क्षेत्राकडुन शिकून शेती आणि लघुउद्योग त्वरित सुरू करणे आवश्यक आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जे काही थोडेफार देश वर उठतील, त्यांना त्यांची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी खूप मोठा वाव राहणार आहे. त्यासाठी प्रयत्नपूर्वक वारंवार धोरणात्मक बदल करणे, धोरणांमध्ये लवचिकता आणण्याची व आर्थिक सुधारणांची आवश्यकता आहे.
कृषी क्षेत्र हे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. सकल घरेलू उत्पादनाच्या १४ टक्के हिस्सा हा कृषी क्षेत्राचा आहे व हेच एकमेव क्षेत्र आहे, जे कोरोना मध्ये देशाला वाचवित आहे. देशाला भूकबळी पासून वाचविण्यासाठी या क्षेत्राला बळकटी देण्याचे काम करावे लागेल. कोरोना काळात देश जरी जगला असला तरी तो जगविणारा शेतकरी मात्र शेतमालाचे भाव पडल्याने आणि निसर्गाच्या अवकृपेने देशोधडीला लागला आहे. कृषी क्षेत्राचा जीडीपी मधील वाटा वाढविण्याची हीच संधी आहे. मात्र त्यासाठी शेतकऱ्यास बी-बियाणे, खते, रसायने, शेती अवजारे व त्यांचे वितरण बांधावर करणे. शेती अवजारे भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देणे. मालवाहतूक, गोदाम व्यवस्था, किमान आधारभूत किंमत अशा सर्व प्रकारे पाठिंबा देणे आवश्यक आहे. या वर्षीच्या अपेक्षित चांगला पाऊस याचा फायदा कृषी अर्थव्यवस्थेला, पर्यायाने देशाच्या अर्थव्यवस्थेला होईल.
जसजसा कोरोनाचा प्रभाव कमी होईल, तसतशी सेवा क्षेत्राला उभारी येईल. उद्योगांमधील पायाभूत सुविधांना कोरोनामुळे नुकसान झाले नसल्याने उद्योग पूर्ववत होऊ शकतील. मात्र त्यासाठी नवीन श्रमसंस्कृती तयार करावी लागेल. त्यासाठी श्रमिकांना परत आणून त्यांचे राहणीमान व जीवनमान यांची योग्य काळजी घ्यावी लागेल. उद्योगांना योग्य व आवश्यक वित्तपुरवठा करावा लागेल.
लघु व मध्यम उद्योग यांचा घरेलू उत्पादनातील वाटा हा तीस टक्के आहे. शेतीक्षेत्र नंतर लघु व मध्यम उद्योग सुरू केल्यास व्यवस्थेवर अतिरिक्त ताण येणार नाही. भारतीय अर्थव्यवस्था रुळावर येण्यात या विभागाचा वाटा लक्षणीय असल्याने तसेच चीनमधून बाहेर पडणाऱ्या उद्योगांना भारतात येण्यासाठी लघु व मध्यम उद्योग बळकट करणे आवश्यक आहे.
सद्यस्थितीत लॉकडाउनमुळे हे क्षेत्र पूर्णपणे बंद आहे. ते आपल्या कामगारांना पगार देऊ शकत नाहीत. कित्येकांना उद्योग सुरू करण्यासाठी भांडवल नाही. ते उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. याशिवाय पर्यटन, हवाई उद्योग, वाहन उद्योग, बांधकाम ही तिसऱ्या प्राथमिकतेची असून त्यामध्ये शक्यतो पायाभूत सुविधांवर भर देणे आवश्यक आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे लोकांना सुरक्षितपणे कामावर परत आणणे आणि त्यांना योग्य वैद्यकीय आरोग्य विषयक सहज सुविधा उपलब्ध करून दिल्यास असा लॉकडाउन परत त्यांच्या आयुष्यात येणार नाही असा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण करावा लागेल.  तरच आरोग्यपूर्ण जनतेकडून उत्पादकता वाढेल. आरोग्यसुविधा सरसकट सर्व गटांना पुरविणे ही प्राथमिकता ठेवल्यास उत्पन्न, उत्पादन आणि उत्पादकता निश्चितच वाढेल आणि ती काळाची गरज आहे. मानव वंशाच्या इतिहासात असे अनेक रोग, साथीचे संकट येऊन गेले. त्या संकटाला मागे टाकून मानवाने नेहमीच उत्क्रांती केली.  आपणही या संकटामधून बाहेर पडू, हे ही दिवस जातील.
दिलीप सुर्यगण
निवृत्त उपमहाव्यवस्थापक

महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मुंबई.

Check Also

नेस्ले इंडियाच्या भारतातील उत्पादनात युरोपपेक्षा जास्तीच्या साखरेचे प्रमाण

सेरेलॅक आणि निडो ब्रँड्समध्ये जास्त प्रमाणात साखर आणि मध असल्याचे आढळून आल्यानंतर नेस्ले इंडियाने बेबी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *