Breaking News

खाजगी डॉक्टरांना पीपीई किट द्या, मात्र लोकल सुरु करण्यासाठीही पाठपुरावा करा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे प्रशासनाला आदेश

मुंबई: प्रतिनिधी
कोविड 19 व्यतिरिक्त अन्य आजारावरील उपचारांसाठी विशेषत: येणारा पावसाळा लक्षात घेऊन डॉक्टरांनी आपले क्लिनिक सुरू करणे आवश्यक असल्याने त्यांना पीपीई किट देण्याची व्यवस्था करण्यात यावी तसेच वैद्यकीय सेवा तथा अन्य अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यासाठी लागणार्‍या मनुष्यबळासाठी मुंबई रेल्वेची लोकल सेवा सुरू करण्याशिवाय पर्याय नसल्याने केंद्राकडे पाठपुरावा करावा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज प्रशासनाला दिले.
कोविड 19 विषाणू प्रादर्भावाबाब्त करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा मुख्यमंत्र्यांनी आज आढावा घेतला. कोविड 19 संदर्भात जनमानसात असलेली भीती दूर होणे आवश्यक आहे. ताप, कोरडा खोकला, अशक्तपणा, अर्धशिशी, नाक चोंदलेले असणे अशा स्वरुपाची लक्षणे दिसत असल्यास लगेच चाचणी करणे गरजेचे आहे. पण अशी चाचणी डॉक्टरांच्या लेखी सल्ल्याशिवाय करता येत नाही आणि अनेक डॉक्टरांना त्यांच्या स्वत:च्या सुरक्षेसाठी खबरदारी घेतल्याशिवाय रोग्यांची तपासणी करणे योग्य वाटत नाही. त्यांची यासंदर्भातील काळजी दूर करण्यासाठी त्यांना महापालिकेच्या वॉर्ड ऑफिसरमार्फत पीपीई किट पुरविण्याचे आदेश त्यांनी दिले.
येत्या पावसाळ्यात विविध प्रकारचे आजार वाढण्याची शक्यता असते. या आजारांची आणि कोविड 19ची लक्षणे सारखी असल्याने जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. महापालिकांची आणि शासनाची रुग्णालये ही कोविड 19 साठी रुग्णालये म्हणून राखून ठेवण्यात आलेली असल्याने पावसाळ्यातील आजारांसंदर्भात खाजगी रुग्णालयांची भूमिका जास्त महत्त्वाची असणार आहे. या रुग्णालयांच्या कर्मचारी वर्गाकरिता सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू असणे गरजेचे आहे. म्हणून केंद्राकडे अत्यावश्यक सेवेच्या कर्मचार्‍यांकरिता आणि अशा प्रकारच्या महत्त्वाच्या सेवांसाठी मुंबईत लोकल सेवा सुरू करण्यात याव्यात अशी मागणी आपण केंद्राकडे केली आहे. त्याचा प्रशासनाने पाठपुरावा करावा, अशा सूचनाही त्यांनी केली.
जगात आणि देशात अन्यत्र कोविड 19 मुळे मरण पावलेल्या रुग्णांचे प्रमाण ५ ते ७ टक्के असताना राज्यातील मृत्यू दर ३.३ टक्के आणण्यात आपण यशस्वी झालो आहोत. कोविड 19 प्रादुर्भावापूर्वी कोविड विषाणू चाचाणीसाठी राज्यात केवळ २ सध्या शाळा होत्या केवळ २ महिन्यात आपण राज्यात ७२ प्रयोगशाळा सुरू करू शकलो. येत्या आठवड्यात नव्याने २६ लॅब येत्या काही दिवसात कार्यान्वित होतील, या कामगिरीबद्दल प्रशासनाचे कौतुक करून मुख्यमंत्र्यांनी कोरोनावर उपचारासाठी नेमण्यात आलेल्या ११ तज्ज्ञ डॉक्टरांच्या कृती दलाचे केंद्राने आणि अन्य राज्याने कौतुक केले आहे, याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. या डॉक्टरांनी उपचाराचा प्रोटोकॉल तयार केला आहे. तो सर्व जिल्ह्यांना पाठविण्यात आला. हे डॉक्टर्स २४ तास उपलब्ध असून कुठल्याही जिल्ह्याला उपचाराबाबत आवश्यकता असल्यास ते त्यांना संपर्क करु शकत असल्याने कोविड 19 मुळे होणार्‍या मृत्यूची टक्केवारी रोखण्यात आपल्याला यश आले आहे, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
राज्याचा रुग्ण दुपटीचा दर (डबलींग रेट) कालावधी तीन दिवसांवरुन १४ दिवसांवर आला आहे आणि राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ( Recovery Rate ) ३१ टक्क्यांपेक्षा जास्त आहे, अशी माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांना देण्यात आली.
येत्या सोमवारपर्यंत मुंबईत एसएससीआय वरळी, महालक्ष्मी, बांद्रा व नेसको, गोरेगाव अशा मिळून २४७५ खाटा असलेल्या सुविधा रुग्ण सेवेकरिता उपलब्ध होत आहेत. बीकेसी येथे एमएमआरडीने १५ दिवसांत उभारलेले देशातील पहिले ओपन हॉस्पिटल (आयसीयू २०० बेड्स १००० बेड्सची जम्बो सुविधा), महालक्ष्मी येथे सध्या युद्धपातळीवर सुरु. असलेले कोरोना केअर सेंटरचे (CCC) काम, नेस्को गोरेगाव येथे येथे ५३५ बेड्सची जम्बो सुविधा, रेसकोर्स, दहिसर, गोरेगाव, मुलुंड येथे ७००० पेक्षा जास्त बेड्सची सुविधा असलेल्या डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल सेंटर (DCHC) आणि डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल (DCH) यांची उभारणी यासर्वांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी यावेळे घेतला.
खाजगी रुग्णालयांचे ८० टक्के बेड्स मुंबई महापालिकेने आपल्या ताब्यात घेण्याचे निदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर आता महापालिकेकडे रुग्णांसाठी अधिक चांगल्याप्रमाणात सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. या सर्व खाटांचे नियोजन आता संगणकाच्या माध्यमातून रिअल टाईम डॅशबोर्डमध्ये करण्याचे तसेच प्रत्येक बेडला युनिक आयडी देण्याची सूचना त्यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना केली.

Check Also

सीबीएसईने पुन्हा एकदा ११ वी आणि १२ वीचा अभ्यासक्रम बदलला शैक्षणिक संचालक जोसेफ इम्युन्युअल यांची माहिती

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० शी संरेखित करण्यासाठी २०२४-२५ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *