Breaking News

अमित शाह, फडणवीस बोलले…देशमुख यांची हकालपट्टी करा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई: प्रतिनिधी
पालघर जिल्ह्यात पोलिसांच्या साक्षीने दोन साधूंची जमावाकडून हत्या झाल्याची मॉब लिंचिंगची घटना अत्यंत धक्कादायक आणि निषेधार्ह आहे. राज्यात वारंवार कायदा सुव्यवस्थेची समस्या निर्माण होत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी व या घटनांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी केली.
चंद्रकांत पाटील यांनी पालघर जिल्ह्यातील साधूंच्या हत्याकांडाविषयी राज्यपाल, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पत्र पाठवले असून त्यामध्ये वरील मागणी केली आहे.
पालघरच्या घटनेची मुख्यमंत्र्यांना सरकारी यंत्रणेकडून तातडीने माहिती मिळाली असेलच. तथापि, याविषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वतः विचारणा केली, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आवाज उठवला आणि सोशल मीडियावरून या प्रकरणी सरकारची नाचक्की झाली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी बोलले. या गंभीर घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने स्वतः जनतेशी संवाद साधायला हवा होता. तरीही त्यांनी चार दिवस वेळ लावला याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला.
राज्यात गेल्या काही दिवसात गंभीर घटना घडल्या. ठाण्यात एका तरुणाला एका मंत्र्याच्या बंगल्यात नेऊन मारहाण करण्यात आली. हजारो कोटींच्या गैरव्यवहारात तपास यंत्रणांना हवा असलेल्या आरोपीला राज्याच्या गृहखात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून लॉकडाऊनच्या काळात सवलत देण्यासाठी पत्र देण्यात आले. लॉकडाऊनमुळे संचारबंदी असताना तसेच चौकाचौकात पोलिसांचा बंदोबस्त असतानाही मुंबईत बांद्रा येथे हजारोंचा जमाव जमला. आता पालघर जिल्ह्यात पोलिसांच्या साक्षीने साधूंचे हत्याकांड झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनांबद्दल गृहमंत्री अनिल देशमुख यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून वरील घटनांची निःपक्ष चौकशी करावी, अशी मागणी करत ठाणे येथे तरुणाच्या मारहाणप्रकरणी निःपक्ष चौकशीसाठी संबंधित मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा द्यावा या मागणीचा पुनरुच्चार त्यांनी केला.
साधूंच्या हत्याकांडातील गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी तसेच घटनास्थळी उपस्थित असूनही साधूंना वाचविण्यासाठी काहीही न करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवरही कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली.

Check Also

उद्धव ठाकरे यांचा टोला, मुस्लिम लीगबद्दलची माहिती नरेंद्र मोदी यांना असेल….

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मुस्लिम लीगशी स्वातंत्र्यपूर्व काळापासून संबंध आहे. १९४२ साली जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *