Breaking News

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे विरोधी पक्षनेते फडणवीस यांना आव्हान विरोधी पक्ष नेत्यांनी प्रत्यक्ष खर्चाचे पॅकेज किती आणि कर्जाचे पॅकेज किती याची आकडेवारी सादर करावी

कराड : प्रतिनिधी
महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून सुमारे २ लाख ७० हजार कोटी रुपये मिळाले असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसेच विविध योजने अंतर्गत महाराष्ट्राच्या वाट्याला येणाऱ्या रकमेचे विवरण त्यांनी दिले. यामध्ये त्यांनी एक गोष्ट भासविण्याचा प्रयत्न केला आहे की, महाराष्ट्राच्या वाट्याचे सगळेच पैसे थेट राज्य सरकारच्या तिजोरीत येणार आहेत. काल मी सांगितल्याप्रमाणे, विविध जागतिक वित्तीय संस्थांच्या विश्लेषणानुसार केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये फक्त २ लाख कोटी रुपये हे रोख रकमेचे (फिस्कल स्टीम्युलस) आहेत आणि उर्वरित पॅकेज हे कर्जाच्या स्वरूपातील (मॉनेटरी स्टीम्युलस) आहे. हे पाहता महाराष्ट्राच्या वाट्याला जास्तीत जास्त २० हजार कोटी रुपये येऊ शकत असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
रिझर्व्ह बँकेकडून महाराष्ट्राच्या वार्षिक उत्पन्नाच्या (जीएसडीपीच्या) ५% रक्कम कर्ज म्हणून उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले आहे आणि ती रक्कम जवळपास १ लाख ६० हजार कोटी आहे असे सांगितले. ही दिशाभूल आहे. आताच्या परिस्थितीत राज्यांना आधीपासून जीएसडीपीच्या ३% कर्ज घेण्याची परवानगी होतीच, ती आता २% वाढवून ५% पर्यंत वाढवली हे खरे आहे, परंतु त्या वाढीव २% पैकी फक्त ०.५% रक्कम म्हणजेच जास्तीत जास्त १५-१६ हजार कोटी रक्कम तातडीने मिळू शकतील. उर्वरित १.५% रक्कमेची उचल (सुमारे ४५ हजार कोटी रुपये) करण्याआधी अनेक अटी आणि निकष लावण्यात आलेले आल्याचे सांगत फडणवीस यांच्या दाव्यातील हवाच त्यांनी काढून घेतली.
केंद्र सरकारने जाहीर केलेले आर्थिक पॅकेज हे विविध घटकांना कर्ज रुपाने रक्कम देण्याची तयारी दाखविली आहे, पण त्यामध्ये अनेक शर्ती आहेत. जो त्या अटीशर्ती पूर्ण करेल व ज्याची कर्ज परतफेड करण्याची क्षमता असेल त्यालाच ते कर्ज मिळू शकेल. उदा: किरकोळ विक्रेत्यांसाठी ५ हजार कोटी किंवा सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी ३ लाख कोटी रुपये. परंतु हे घटक ते कर्ज घेऊ शकतील का व ते उत्सुक नसतील तर राज्य किंवा केंद्र शासन त्यांना सक्ती करू शकत नाहीत. त्यामुळे पात्र नसणाऱ्या आणि उचल न घेतलेल्या कर्जाची रक्कम महाराष्ट्राला मदत म्हणून दाखवणे ही हातचलाखी असल्याचा आरोपही त्यांनी केला.
त्यामुळे विरोधी पक्ष नेत्यांनी केंद्र सरकारच्यावतीने कर्ज किती व रोख खर्च किती याची स्वतंत्र योजनानिहाय आकडेवारी दिली, तर ताबडतोब किती रोख दिलासा मिळाला हे स्पष्ट होईल व अधिक सकारात्मक चर्चा होईल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *