Breaking News

देशाचा मृत्यूदर १.९२ टक्के, तर मुंबईचा मृत्यूदर ऑगस्टमध्ये ५.४० टक्के मुंबईत संसर्गाचे प्रमाणही १९.७२ टक्के, चाचण्या वाढविण्याची विरोधी पक्षनेते फडणवीसांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी

देशाचा मृत्यूदर १.९२ टक्क्यांवर आहे. मात्र, मुंबईतील ऑगस्टमधील १७ दिवसांत मुंबईचा मृत्यूदर ५.४० टक्क्यांवर गेला आहे. मुंबईत चाचण्या वाढविण्याची नितांत गरज आहे. ही मागणी करणारे आणखी एक पत्र  विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नुकतेच पाठविले.

सातत्याने आग्रह करून सुद्धा मुंबईत चाचण्यांची संख्या मर्यादित ठेवण्याचे कारण आता कळेनासे झाले आहे. मुंबईतील मृत्यूदर सातत्याने वाढत असल्यानेच पुन्हा एकदा आग्रह आहे की, मुंबईत चाचण्यांची संख्या तातडीने वाढविण्यात यावी. जुलै महिन्यात मुंबईमध्ये प्रतिदिन ६५७४ चाचण्या करण्यात आल्या आणि या महिन्याचा मृत्यूदर हा ४,९१ टक्के इतका होता. ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत (दि. १७ ऑगस्टपर्यंत) प्रतिदिन ७००९ चाचण्या करण्यात आल्या. या १७ दिवसांचा मृत्यूदर हा ५.४० टक्के इतका झाला. मुंबईची एकूणच लोकसंख्या पाहता प्रतिदिन ७००० चाचण्या ही संख्या अतिशय कमी आहे. देशाचा मृत्यूदर आता १.९२ टक्क्यांवर आला आहे. असे असताना मुंबईचा मृत्यूदर सातत्याने ५ टक्क्यांच्या वर असणे हे अतिशय चिंताजनक असल्याची बाब त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या निदर्शनास पत्राद्ववारे आणून दिली.

महाराष्ट्राचा मृत्यूदर जून महिन्यात ५.२० टक्के इतका होता. तो जुलैत २.८९ टक्के झाला आणि आता ऑगस्टच्या १७ दिवसांत तो २.८९ टक्के इतका पुन्हा कायम आहे. आतापर्यंतच्या एकूण सर्व आकडेवारीचा विचार करता महाराष्ट्राचा मृत्यूदर हा ३.३५ टक्के इतका आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीचा विचार करता देशातील संसर्गाचे प्रमाण हे ८.८१ टक्के इतके असून, ते महाराष्ट्रात १८.८५ टक्के, तर मुंबईत १९.७२ टक्के इतके आहे. एकिकडे संसर्गाचे प्रमाण अधिक आणि दुसरीकडे सातत्याने वाढणारा मृत्यूदर पाहता चाचण्यांवर अधिकाधिक लक्ष केंद्रीत करणे, रूग्ण ओळखणे, त्यातून विलगीकरण आणि अन्य नागरिकांना सुरक्षित ठेवणे हा एकमात्र उपलब्ध पर्याय असल्याने मुंबईत चाचण्या वाढविण्याची नितांत गरज असल्याचे मतही त्यांनी पत्राद्वारे त्यांना सांगितले.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *