Breaking News

२४-२५ कोटी लस वाटपासाठी टास्क फोर्स पण राजकारण न करण्याची सूचना द्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची पंतप्रधान मोदींकडे तक्रार

मुंबई : प्रतिनिधी
कोरोनाची लाट पुन्हा येत आहे, अशा परिस्थितीत केंद्राच्या सूचनेनुसार तसेच योग्य त्या सावधतेने आम्ही जनजीवन पूर्वपदावर आणत आहोत. मात्र काही राजकीय पक्ष जनतेच्या जीवाशी खेळत आरोग्याचे नियम मोडत रस्त्यावर उतरून राजकीय आंदोलने करीत आहेत त्यांना परिस्थितीची कल्पना देऊन योग्य ती समज द्यावी अशी सूचना द्यावी अशी मागणी राज्यातील भाजपा नेत्यांचे नाव न घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. लसीकरण आणि तिचे वितरण याबाबत राज्यात एक टास्क फोर्स गठीत केला असल्याची माहितीही त्यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कोविडचा अधिक प्रादुर्भाव असलेल्या देशातील 8 राज्यांची व्हीसीद्वारे बैठक घेण्यात आली, यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. याप्रसंगी नीती आयोगाने देखील येणाऱ्या लसीची निर्मिती, वितरण याबाबत सादरीकरण केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी देखील मार्गदर्शन केले.
राजकारण न करण्याच्या सूचना द्याव्यात
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पुढील काळात लस वितरण, राज्याराज्यांतून नागरिकांचा होणारा प्रवास तसेच कंटेन्मेंट क्षेत्र निश्चिती याबाबत देशव्यापी धोरण असेल तर अधिक नियोजनबद्ध रीतीने हा लढा देता येईल. आज दिल्ली, केरळ मध्ये संसर्ग वाढला आहे. तर उद्या आणखी कुठल्या राज्यात वाढेल. महाराष्ट्रात काही महिन्यांपूर्वी २४ हजार रुग्ण दररोज सापडायचे. तिथे आता ४७०० ते ५००० रुग्ण दररोज आढळत आहेत. रुग्ण संख्या कमी होत असली तरी आम्ही राज्यातील जनतेला गाफील न राहण्याच्या आणि त्रिसूत्रीचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पंतप्रधान किंवा गृहमंत्र्यांनी देशातील सर्व राजकीय पक्षांची एक बैठक घेऊन परिस्थितीचे गांभीर्य समजावून सांगावे व राजकारण न करता उपाय योजनांत सहकार्य करण्याच्या सूचना द्याव्यात. आज एकीकडे आम्ही कोरोनाला रोखण्यासाठी सुरक्षित अंतर, मास्क घालणे हे आवाहन करीत असून दुसरीकडे राजकीय पक्ष रस्त्यावर उतरून राजकारण करीत आहेत. त्यामुळे आमचे सर्व प्रयत्न असफल होऊ शकतात व कोरोना लाटेला आमंत्रण मिळू शकते याकडेही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे लक्ष वेधले.
कोरोना लसीबाबत आम्ही सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांच्याशी सातत्याने बोलत आहोत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, लसीकरणाच्या बाबतीत काही गोष्टींची स्पष्टता आवश्यक असून लसीची उपलब्धता, लसीची संख्या, लसीचे दुष्परिणाम, लसीचा परिणाम, लसीवरील येणारा खर्च व त्याचे वितरण याबाबतीत राज्यात एक टास्क फोर्स गठीत केला असून त्यामध्ये या सर्व विषयांवर चर्चा केली जाणार आहे.

माझे कुटुंब, माझी जबाबदारीचे यश
केंद्राकडून दिल्या जाणाऱ्या सुचना कटाक्षाने पाळण्याचा प्रयत्न महाराष्ट्र करीत असून राज्यात दोन टप्प्यात राबविण्यात आलेल्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. संसर्ग रोखण्यातही यश मिळाले आहे. या मोहिमेत प्रत्येक घरात आरोग्य चौकशी करण्यात आली असून ११ कोटी ९२ लाख लोकांचा आरोग्य डेटा आपल्याकडे आहे. यातून राज्याचा आरोग्य नकाशा तयार होण्यास मदत होणार आहे. या मोहिमेत ३.५ लाख सारी आणि आयएलआयचे रुग्णही सापडले तसेच ५१ हजार कोरोना रुग्ण आढळले ज्यांच्यावर उपचार करण्यात आले अशी माहितीही त्यांनी दिली.

कोविडनंतरचे आरोग्य परिणाम
कोविडमधून बऱ्या झालेल्या काही रुग्णांमध्ये आरोग्याच्या गंभीर समस्या देखील आढळत असून यावरही आपल्याला लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आज राज्यात दररोज ७० ते ८० हजार चाचण्या होत असून आरटीपीसीआर चाचण्या अधिक वाढविण्याचे तसेच संसर्गग्रस्त व्यक्तीचे जास्तीतजास्त संपर्क शोधण्यास सांगण्यात आले आहे. कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही अतिशय सावधपणे पाउले टाकत असून केंद्राने दिलेल्या सूचनांचे वेळोवेळी पालन केले जाईल.

कोरोना रुग्ण संख्येत महाराष्ट्राचा क्रमांक घसरला
तत्पूर्वी केंद्रीय आरोग्य सचिव यांनी सादरीकरण केले. यानुसार महाराष्ट्रात गेल्या दोन आठवड्यात दररोज आढळणाऱ्या कोरोना रुग्ण संख्येत घसरण झाली असून आठ राज्याच्या तक्त्यात आता राज्य सर्वात खालच्या क्रमांकावर आहे. दिल्ली येथे दररोजच्या रुग्ण संख्येत १०० टक्के वाढ आहे, हरियाना ५३ टक्के, पश्चिम बंगाल ८ टक्के वाढ आहे . या तुलनेत गुजरातमध्ये १४ टक्के घट, केरळ २८ टक्के, छतीसगड ५० टक्के, महाराष्ट्र ७६ टक्के अशी रुग्ण संख्या कमी झाली आहे. मात्र मृत्यू दर अजूनही महाराष्ट्रात सर्वात जास्त २,४४, पश्चिम बंगाल १.७५ दिल्लीत १.२२, छतीसगड १.१५ असा असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढील काळात संक्रमणाची साखळी तोडणे गरजेचे आहे. 5 टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटीव्हीटी दर आणणे गरजेचे आहे. हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर जनजागृती वाढविणे आवश्यक आहे. एन्टीजेनचा निगेटिव्ह अहवाल आलेल्या पण लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांवर लक्ष केंद्रित करून परत आरटीपीसीआर चाचणी करणे महत्वाचे आहे असेही ते म्हणाले.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *