Breaking News

लॉकडाऊन….व्हायरल व्हीडीओ संवेदनशील कलाकार आणि लेखक अंकुर विठ्ठलराव वाढवे यांची खास कथा

भारतात लॉकडावून म्हणजे देवाने आपल्याला सुट्ट्या मिळण्यासाठी कोरोना आपल्या देशात पाठवला ही सात्विक समज आपल्या डोक्यात ठेवून रवी नेहमीसारखा घराबाहेर पडला. बाहेर पडताना त्याच्या आईने त्याला टोकले पण तो ऐकायला तयार नव्हता. त्याला बघायच होतं पोलीस खरंच त्यांच काम व्यवस्थित करत आहेत का? ग्राम पंचायतचा सदस्य या नात्याने त्याच्यावर ती महत्त्वाची जबाबदारीच होती जणू. लॉकडावून च्या काळात पंतप्रधानाने जे आदेश वजा आव्हान म्हणून केले मग ते थाली/टाळी वाजविणे असो की दिवे लावणे ते सगळं त्याने देशाच्या हितासाठी आणि एकतेसाठी केले. आज जेव्हा तो घरच्या बाहेर पडत होता, तेव्हाही त्याच्या आई ने त्याला याची जाणीव करून दिली, ‘अरे बाबा, पंतप्रधानाने हेही सांगितले आहे की, कोणीही घरच्या बाहेर पडू नका! तू का जातो मग?’

‘अगं, बाहेर काय परिस्थिती आहे जरा बघून येतो’ असं आईला घरातून जाता जाता बोलला.

घरापासून काही अंतरावर गेल्यावर त्याला त्याचे काही मित्र पळत येताना दिसले, ‘काय झाल?’ म्हणून त्याने विचारले. ‘पोलीस लय मारायला लागले यार’ त्यातला एक आपले ढुंगण चोळत बोलला. हे ऐकताच रवीने आपला मोर्चा वळवला; घराकडे नव्हे दुसर्‍या गल्लीतून त्याच दिशेने जिथे त्याला जायायच होतं. पळत येणार्‍या मित्रापैकी एकाला त्याने सोबत घेतले आणि दोघंही बसस्टॉप च्या दिशेने निघाले.

समोर गेल्यावर त्यांना दिसलं की पोलीस लोकांना विनंती करून काहींना आपल्या दांड्याचा प्रसाद देऊन घरात बसण्यासाठी आव्हान करत आहेत. हे बघून रवीला अभिमान वाटला, तेवढ्यात दोन तीन पोरांची टोळी पोलीसांच्याच हातातली काठी घेऊन पोलीसांनाच मारहाण करू लागली, हे रवीला बघवल नाही. त्याने लगेच आपल्या खिशातला मोबाइल काढून ते चित्र शूट करून घेतले आणि आपल्या फेसबुक वर अपलोड केले. क्षणात त्या व्हिडीओला हजारो लाइक आणि शेअर सुद्धा आले, ‘आपल्या संरक्षणासाठी उभे असलेल्या रक्षकावरच हल्ला?’ असे त्या व्हिडीओला त्याने कँप्शन (caption) दिले.

रवी घरी आला तेव्हा त्याचे बाबा टी. वी. वर बातम्या बघत होते. बातम्या मधे रवीने शूट केलेला विडिओ सुरू होता. बातम्यांमधील रिपोर्टर घशाला कोरड पडेल या अवेशात बोलत होता. कारणही तसंच होते त्या हल्ल्यात पोलीस शिपायांचा मृत्यू झाला होता. रवीचे बाबा जोरजोरात शिव्या घालत होते, ‘त्या भ्याड शूटिंग करणाऱ्याले अक्कल नाही. शूटिंग सोडून पोलीसाले त्या भामट्यापासून वाचवाले मदत केली असती त त्यायचा जीव वाचला असता. पोलीस एवढं जिवाच रान करू राहिले आपल्यासाठी अन् हे सायचे त्यायले मारताना शूटिंग करतात, केली मदत त का होते काय माहीत त्यायले?’ बाबाचे हे शब्द ऐकून रवीला कळलं की, खरंच त्याने आणि त्याच्या मित्राने ठरवलं असतं तर कदाचित त्या भामट्यांना त्यांनी पोलिसांना पकडून देवू शकले असते. त्याची चूक त्याच्या लक्षात आली. ‘फक्त टाळ्या आणि दिवे लावल्याने देशाची एकता दिसणार नाही तर कोरोनाला आपल्या देशातून हद्दपार करण्यासाठी पंतप्रधानांनी आणि आपल्या मुख्यमंत्र्यानी जे जे उपाय आणि आवाहन केले त्याचे काटेकोर पालन करावेच लागेल.’ हा विचार करत तो आपल्या व्हरांड्यात बसला असता बाजूचा धायगोडे काका त्यांच्या घरात भाड्याने राहणाऱ्या सविता परिचारिकेला (नर्स), ‘तू आमच्या घरात कोरोना आणशील.’ म्हणत घरातून बाहेर काढत असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्याचा हात कधी खिशातल्या मोबाईल कडे गेला हे त्यालाही कळलं नाही.

Check Also

शेतकरी पोराच्या लग्नाची गोष्ट… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तवाधारीत काल्पनिक कथा

केशव रत्नाकरची वाट बघत होता. दिवे लागणीची वेळ होत आली तरी सकाळी गेलेला माणूस अजून कसा आला नाही याची काळजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *