Breaking News

मुंबई, पुण्याची गर्दी कमी करायचीय, तर दुर्लक्षित जिल्ह्यांमध्ये जावे लागेल महानगरांमध्ये ४० लाख कामगारांची संख्या

मुंबई: विशेष प्रतिनिधी
राज्याची आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई आणि पुणे महानगरात मोठ्या प्रमाणावर उद्योगांची गर्दी झालेली आहे. या दोन्ही महानगरात राज्यातील आणि परराज्यातील स्थलांतरीत कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या दोन शहरांमध्ये जमा होणारी गर्दी कमी करायची असेल तर राज्यातील इतर मागास जिल्ह्यांचा विकास करत रोजगाराच्या संधी निर्माण कराव्या लागणार असल्याची माहिती उद्योग विभागातील एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने दिली.
कोरोनाच्या निमित्ताने बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, छत्तीसगड आदी राज्यातील परप्रांतीय कामगारा मुंबई आणि पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर असल्याचे दिसून आले. एकट्या मुंबईतून आतापर्यत १२ लाख स्थलांतरीत मजूरांना बिहार, उत्तर प्रदेशात पोहोचविण्यात आले असून अद्यापही ५ ते ७ लाख मजूर मुंबईत असण्याची शक्यता आहे. मात्र एकाबाजूला इतक्या मोठ्या प्रमाणावर आता मजूर गेले-जात असताना राज्यातील भूमिपूत्रांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले.
सद्यपरिस्थितीत मराठवाड्यात विशेष औरंगाबाद महसूली विभागातील जिल्ह्यातील आणि नाशिक पट्यात मोठे उद्योग २३३ आहेत. तर लघु व मध्यम क्षेत्रातील ३३ हजार २०७ इतके उद्योग आहेत. परंतु या दोन पैकी सर्वाधिक रोजगाराच्या संधी या औरंगाबाद जिल्ह्यात आणि नाशिक जिल्ह्यातच निर्माण होतात. त्यामुळे या भागातील रोजगाराच्या संधी न मिळालेले नागरिक मुंबई, पुणे महानगरात येतात. मात्र या दोन्ही महानगरात याआधीच परप्रांतीय कामगारांनी जागा पटकाविल्याने त्यांना रोजगाराच्या संधी तशा कमीच मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच नांदेड, परभणी, हिंगोली, बीड या जिल्ह्यातील नागरिक आंध्र प्रदेश, तेलंगणातही जात असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यानंतर नागपूर आणि अमरावती या भागात मोठे उद्योग २०० च्या घरात आहेत. तर लघु व मध्यम क्षेत्रातील १०१,६६८ इतके उद्योग आहेत. मात्र यातील मुख्य कारखानदारी आणि उद्योग हे अमरावती, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातच आहेत. त्यामुळे इतर जिल्ह्यांमध्ये तसेही रोजगाराच्या संधी फारशा उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे या भागातील अनेकजण जवळपासच्या इतर राज्यांमध्ये उदारणार्थ मध्य प्रदेश, तेलंगणा राज्यात अन्यथा शेवटी पुणे-मुंबई महानगरात येत असल्याचे ते म्हणाले.
उद्योग, व्यवसायांचा जो काही विकास झाला तो प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील पुणे विभागातील पुणे जिल्ह्यांसह, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये या भागात ३५३,९०५ इतक्या मोठ्या प्रमाणावर लघु व मध्यम क्षेत्रातील उद्योग आहेत. तसेच ६५३ मोठे उद्योग आहेत. येथील सर्व उद्योगांमध्ये प्रामुख्याने स्थानिक भूमिपूत्रांबरोबरच शेजारील जिल्ह्यामधील आणि परप्रांतिय मजूरांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असतात. त्यामुळे महाराष्ट्रातील रोजगाराच्या संधीच्या शोधात असणारे अनेक या भागाची वाट धरत असल्याचे त्यांनी सांगितले.
कोकण विभागात मुंबई महानगरासह कोकणातील अन्य काही जिल्ह्यात २९६ मोठे उद्योग तर लघु व मध्यम क्षेत्रातील १९३,५५६ इतके उद्योग आहेत. मात्र या क्षेत्रात सर्वाधिक रोजगाराच्या संधी निर्माण होतात. त्यामुळे देशाच्या कोणत्याही भागातून रोजगाराच्या निमित्ताने येतात. या दोन उद्योगांमध्ये चित्रपटसृष्टी, दूरचित्रवाणी क्षेत्रांचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे एकट्या कोकणात नेमके परप्रांतीय कामगार काम करत याची निश्चित आकडेवारी नसल्याचे त्यांनी सांगितले.
यासंदर्भात कामगार विभागाशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, राज्यातील विभागनिहाय अशी कामगारांची आकडेवारी आमच्याकडे उपलब्ध नाही. मात्र आता कोरोनामुळे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात बांधकाम क्षेत्रातील २० लाख कामगार काम करत आहेत. मात्र यापैकी आमच्याकडे नोंदणी झालेली संख्या ही १२ लाख ५० हजाराच्या घरात असून यातील बहुतांष कामगार महानगरात करत आहे. याशिवाय संघटीत क्षेत्रात अर्थात छोटे-मोठे कारखाने, उ‌द्योगांमध्ये २० ते २५ लाखाच्या घरात काम करत आहेत. मात्र राज्यात सर्वाधिक कामगारांची संख्या ही असंघटीत क्षेत्रातील कामगारांची असून तब्बल ४ कोटींच्या घरात ही संख्या असल्याचे त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ८० टक्के परप्रांतीय कामगार महाराष्ट्राबाहेर गेलेला आहे. त्यामुळे या रोजगाराच्या संधी स्थानिक भूमिपूत्रांना उपलब्ध होवू शकतात. मात्र त्यासाठी भूमिपूत्रांनी पुढे येणे गरजेचे आहे. राज्यातील जवळपास १५ जिल्ह्ये असे आहेत की त्या जिल्ह्यांच्या प्रगतीचा विकास दर बिहार, उत्तर प्रदेशांमधल्या जिल्ह्यांशी समांतर आहे. त्यामुळे मागास जिल्ह्यांमध्येही विकास आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्यास राज्यांतर्गत स्थलांतराची गर्दीही मुंबई, पुणे या महानगरात होणार नसल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *