Breaking News

बीकेसी- ठाण्यात कमी दिवसात उभारले हजार खाटाचे कोविड रूग्णालय आरोग्य सुविधा उभारणीची महाराष्ट्राने देशासमोर मांडली यशोगाथा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : प्रतिनिधी
कोरोनाच्या उपायोजनांसाठी आरोग्य सुविधांची उभारणी करताना मुंबईत मोकळ्या मैदानावरील क्षेत्रीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे (आयसीयू) बेडस् निर्माण करण्याची किमया यंत्रणांनी केली. महाराष्ट्राने देशासमोर अभिनव अशी यशोगाथा मांडल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे काढले.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांच्यावतीने बीकेसी मैदानावर दुसऱ्या टप्प्यात उभारण्यात आलेल्या कोरोना रुग्णालयाचा हस्तांतरण कार्यक्रम आणि ठाणे येथे उभारण्यात आलेल्या १००० खाटांचे कोरोना रुग्णालयाचा ई-लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल आदी मान्यवर सहभागी झाले होते.
मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले, बीकेसी मैदान आणि ठाणे येथे ही दोन्ही रुग्णालये युद्ध पातळीवर उभारण्यात आली आहेत. याचा मला अभिमान आहे. कोरोनाच्या उपाययोजनांमध्ये महाराष्ट्र जगाच्या मागे नाही तर पुढे आहे. गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत मुंबईसह राज्यात काही लाख खाटा उपचारासाठी निर्माण केल्या गेल्या ही मोठी गोष्ट आहे.
मुंबईमध्ये मोकळ्या मैदानांवर १० ते १५ दिवसांच्या कालावधीत १००० खाटांचे सर्व सुविधायुक्त रुग्णालयांची निर्मिती होते ही कामगिरी थक्क करणारी आहे. देशात अन्यत्र कुठेही अशा प्रकारच्या मोकळ्या मैदानावरील रुग्णालयात आयसीयुची सुविधा उपलब्ध नाही. महाराष्ट्राने केलेल्या कामगिरीची सचित्र माहिती आपण पंतप्रधानांशी संवाद साधताना देऊ अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्यात डॉक्टर्स, नर्स हे कोरोना योद्धे लढताहेत त्यांना आयुधं म्हणून ह्या आरोग्य सुविधा असल्याचे त्यांनी सांगितले.
आपण रुग्णालये आरोग्य सुविधा निर्माण करीत आहोत. मात्र त्याचा वापर करण्याची वेळ कुणावरही येऊ नये, अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. दाट लोकवस्तीत राहणाऱ्या ५५ वर्षांवरील व्यक्तींनी तपासणी केली जात आहे. त्यांच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण मोजले जात आहे, जेणे अशा व्यक्तींना कोरोनाच्या प्रादुर्भावापासून वेळीच रोखणे शक्य होईल. ट्रॅकींग, ट्रेसिंगचा मालेगाव आणि धारावी मध्ये यशस्वी झालेला प्रयोगाचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला.
मुख्यमंत्री मदतनिधीसाठी एका ८५ वर्षींच्या महिला डॉक्टरांनी आज सकाळी धनादेश सुपूर्द केला असे सांगताना त्या महिला म्हणजे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त राजीव यांच्या मातोश्री असल्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला आणि त्यांना मनापासून नमस्कार करतो, अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
असे आहे बीकेसीवरील टप्पा २ रुग्णालय
साधारणता एक महिन्याभरापूर्वी बीकेसी येथील मैदानावर १००० खाटांचे रुग्णालय उभारण्यात आले. त्याच ठिकाणी दुसऱ्या टप्प्यात अतिरीक्त १२०० खाटांचे आयसीयु, डायलेसिसीच सुविधा असलेले रुग्णालय उभारण्यात आले. त्याचा आज हस्तातरण सोहळा झालाय हे रुग्णालय आज मुंबई महापालिकेला हस्तांतरीत करण्यात आले. येथे १०८ बेडस् आयसीयूचे असून १२ बेडस् डायलेसिससाठी आहेत. तर ४०६ बेडस् विना ऑक्सिजन आणि ३९२ बेडस् ऑक्सिजन सुविधायुक्त आहेत.
डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये मुंबई महानगरपालिकेकडून रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात येत असून सद्यस्थितीत ५०० पेक्षा अधिक रुग्ण सदर हेल्थ सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. मागील काही दिवसांपासून दर दिवशी सुमारे ३० रुग्ण निरोगी होऊन घरी परतत आहेत. डेडीकेटेड कोव्हिड हॉस्पिटल (फेज-२) येथे व्हेंटीलेटर मशिन (३०), डायलिसिस मशीन (१८), आय. सी. सी. यु. बेल्स (५) फंक्शन मोटराईझड बेड (१०८), पेशंट वॉर्मर, सिटीस्कॅन मशिन, आर. ओ. सिस्टीम (१२५० LPH ), कॉरंटाईन बेड्स, ऑक्सीजन पाईप लाईनचे कनेक्शन, नॉईसलेस सक्शन, पोर्टेबल एक्स-रे मशीन, ई.सी.जी. मशिन, पल्स ऑक्सीमीटर, कम्प्युटर रॅडिओलॉजी सोल्युशन्स अशा प्रकारचे वैद्यकीय उपकरणे आहेत.
२४ दिवसांमध्ये रुग्णालयाची उभारणी-नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे
ठाणे कोरोना रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, अवघ्या २४ दिवसांमध्ये या रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. बाळकुम-साकेत येथे १०२४ बेडसचे तळ अधिक १० मजल्यांचे हे रुग्णालय आहे. आयसीयु बेड, डायलिसीस, प्रयोगशाळा, सीटस्कॅन, एक्सरे आदी सर्व सुविधा याठिकाणी करण्यात आल्या आहेत. याकामासाठी एमएमआरडीएसह १९ विकासकांनी योगदान दिले असल्याचे त्यांनी सांगितले. कल्याण-डोंबिवली, बदलापूर, भिवंडी येथे अशा प्रकारे रुग्णालये उभारणीचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
या हॉस्पीटलमुळे ठाणेकरांसाठी मोठी सुविधा ठरणार आहे. त्यातील ५०० बेडस हे सेंट्रल ऑक्सीजनची सुविधा असलेले आहेत. यातील ७६ बेडस हे आयसीयूचे असून १० बेडस डायलेसीस रूग्णांसाठी तर १० बेडस ट्राएजसाठी ठेवण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे येथे रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. आवश्यकता वाटल्यास या रुग्णालयामध्ये अतिरिक्त ३०० बेडस् निर्माण करता येणे शक्य असल्याचेही त्यांनी सांगितले.

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *