Breaking News

कन्टेजन (contagion) अर्थात कोरोना चित्रपट आणि सद्यपरिस्थिती चित्रपटात दाखविलेल्या सुरक्षेच्या उपायाची वास्तवात अंमलबजावणी

वास्तविक पाहता चित्रपट, कांदबरी, कथा किंवा गेला बाजार वर्तमानपत्र ही सर्व माध्यमातील पोटअंगे समाजाचा आरसा म्हणून आपणा सर्वांना परिचित आहेत. मात्र २०१६ साली वॉर्नर ब्रदर्स या प्रसिध्द चित्रपट निर्मिती संस्थेने हॉलीवूड सिनेमा “कन्टेजन” हा आणला होता. तो सर्व जगभरात प्रदर्शित झाला. त्यावेळी सिनेमाप्रेमींनी हा चित्रपट पाहिलाही असेल. मात्र सायन्स फिक्शन म्हणून त्यावेळी हा चित्रपट पाहून त्याकडे दुर्लक्ष केल्याची शक्यता अधिक आहे. असो…
साधारणत: २०१९ संपता संपता कोविड कुटुंबातील अनेक व्हायरस अर्थात विषाणूनी इबोला, स्वाईन फ्यु, एच१एन१ विषाणूपासूनचे आजार जगाच्या पाठीवर आले. त्याला अटकाव करण्यात जगभरातील शास्त्रज्ञांना यशही आले. मात्र २०२० साल उजाडताच चीन मध्ये या कुटुंबातील कोरोना अर्थात कोविड-१९ या विषाणूने आपली पाळमुळं पसरायला सुरुवात केली. सुरूवातीला हा आजार एकट्या दुकट्यापासून सुरु होवून त्यानंतर चीनच्या हुबेई प्रातांतील वुहान या संपूर्ण प्रांतात पसरला आणि त्याचा संसर्ग आजूबाजूच्या काही भागाबरोबर त्याचे विषाणू सबंध जगभर पसरले. तब्बल चार महिन्यानंतर वुहान प्रांतातील दैनदिंन जीवन आता पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. परंतु या विषाणूचा उगम कोठून झाला यावरून आता वादाला सुरुवात झालीय.
कन्टेजन्स या चित्रपटात हॉगकाँगमधील एके ठिकाणी वटवाघूळ या पक्षाने एका डुक्कर असलेल्या फार्म हाऊसमध्ये आसरा घेतला आणि तेथे त्याने त्याची विष्टा टाकली. ती विष्टा त्या फार्ममधील डुकरांनी खाल्ली. त्याच डुकरांचे मांस रेस्टॉरंटमध्ये खाण्यासाठी आले. सदर चित्रपटातील नायिका ही त्यावेळी त्या रेस्टॉरंटमध्ये गेलेली. तिला तेथील शेफ अर्थात स्वंयपाक्याला भेटायची इच्छा होते आणि ती त्याला भेटते, त्याच्याबरोबर ती फोटोसेशनही करते. मात्र दरम्यान हा शेफ त्या फार्ममधील डुकरांचे मास काढत असतो. मात्र अमेरिकन बाईने अर्थात सदर नायिकेने त्याला भेटण्याची इच्छा व्यक्त केल्याने तो तसाच बाहेर येतो. स्वत:च्या अंगावरील सदऱ्याला हात पुसतो आणि बाहेर येवून सदर नायिकेचा हात हातात घेवून फोटोही काढून घेतो.
तेथून या विषाणूच्या प्रवासाला अर्थात संसर्गाला सुरुवात होते. याच कालवाधीत सदरची नायिका दुसऱ्या एका रेस्टॉरंटमध्ये जाते, तिथे ती काहीतरी खाते-पिते. तिचे उष्टे आणि वापरलेले ग्लास काढायला गेलेल्या वेटरला त्या विषाणूची बाधा होते. तो घरी परतेपर्यत त्याच्यावर विषाणू चांगलाच कब्जा करतो. घरी आल्यावर त्याच्या संपर्कात त्याच्या घरातील व्यक्तींनाही याची लागण होते.
इकडे सदर नायिका अमेरिकेतील शिकागो येथील घरी परतते आणि तिच्या मुलाला तिच्यापासून संसर्ग होवून दोघेही मरतात. मात्र तिचा पती काही मरत नाही. त्याची रितसर तपासणी होते. मात्र त्याला या विषाणूची लागण झालेली नसते. दरम्यान हॉगकाँग ते अमेरिका या दरम्यान ती ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात येते, त्या सर्वांना या विषाणूची लागण होते. पुढे या विषाणूचा संसर्ग गुणाकार पध्दतीने व्हायला सुरुवात होतो. त्यामुळे अमेरिकेत विशेषत: शिकागोमध्ये त्याचे रूग्ण मोठ्या प्रमाणावर वाढायला लागतात. त्यामुळे अशा रोग्यांवरील उपचारासाठी विलगीकरण कक्ष अर्थात क्वारंटाईन सुविधा सुरू करण्यावर भर दिला जातो.
सुरूवातीला हा आजार नेमका काय आहे? याची कल्पना कोणालाच येत नाही. त्यामुळे प्रत्येकजण अशा व्यक्तींच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सर्दी, न्युमोनिया, ताप येणे, डोकेदुखी, अंग दुखी सारखा त्रास सुरु होतो. त्यावर तातडीने संशोधन सुरु होते. या आजाराची गंभीरता लक्षात घेवून जागतिक आरोग्य संघटनेकडूनही या आजाराचा शोध घेण्यास सुरुवात होते. हा विषाणू कसा आला, कोठून आला? मात्र या सगळ्याचा तपास करणारी महिला अधिकारीच या आजाराचा बळी ठरते आणि कालांतराने तिचाही मृत्यू होतो.
दरम्यानच्या काळात चित्रपट पुढे सरकत असताना हा आजार चेहऱ्याला, नाकाला किंवा डोळ्याला सतत स्पर्श केल्याने होत असल्याचे सांगितले आहे. तसेच सुरक्षेचा उपाय म्हणून प्रत्येकाने अशा व्यक्तींपासूनचा संसर्ग टाळण्यासाठी चेहऱ्यावर मास्क वापरण्यास सांगितले जाते. त्यानंतर या रूग्णांवर उपचार करताना पीपीईचे किट कशा पध्दतीचे वापरायचे याचा नमूनाच त्यांनी चित्रपटात दाखवून दिला. तसेच या आजारावर नेमके औषध सापडत नसल्याने घरातच राहणे, इतरांच्या संपर्कात न येणे आणि चेहरा, तोंड, नाक आदींना स्पर्श न करणे, सामाजिक अंतर राखणे आदी गोष्टींचे सल्ले या चित्रपटात देण्यात आले.
शेवटी एक संशोधनकर्ती डॉक्टर महिलेला तिच्याच वडीलांच्या मदतीने एका लसवर केलेले संशोधन आठवते आणि त्या लसीची चाचणी करण्याचा निर्णय घेते. त्यानुसार ही लस स्वत:ला टोचून घेवून विषाणूग्रस्त बनलेल्या आपल्या वडीलांना रूग्णालयात जावून भेटते. परंतु तिच्यावर कोणताच त्या विषाणूचा परिणाम होत नाही. ती लस असते कॉलरावरची. मग तीच लस या संसर्ग आजारावरची लस म्हणून जागतिक आरोग्य संघटनेकडून आणून ती रोग्यांमध्ये वाटली जाते आणि अशा पध्दतीने या आजारावर अमेरिकने विजय मिळविल्याचे चित्रपटात दाखविण्यात आले आहे.
हे सर्व झाले चित्रपटातील संदर्भ आता वास्तवातील घटनां तपासू. संबध जगभरात या विषाणूने विळखा घालण्यास सुरुवात केली. ती साधारण जानेवारी महिन्यातच. भारतातही जानेवारी महिन्याच्या शेवटच्या कालावधीत पहिला रूग्ण सापडला. तरीही या आजाराबद्दल आपल्याकडे फारशी दखल घेतल्याचे दिसले नाही. उलट परदेशातून येणारे प्रवासी भारतीय आणि अभारतीय अशा दोन्ही प्रवाशांची तपासणी करणे, त्यांचा माग ठेवणे आदी कोणत्याच गोष्टी किंवा या सदरच्या विषाणूते स्वरूप काय त्याची कार्य पध्दती काय या दृष्टीने केंद्र सरकारने कोणतीच पावले उचलली नाहीत.
दैनदिन जीवन, घडामोडी, घटना रोज घडतच होत्या. याच कालावधीत दिल्लीतील एका कार्यक्रमाच्या अनुषागाने परदेशातील काही कोरोनाबाधीत नागरिक देशात आले. ते इथल्या लोकांमध्ये मिसळले. त्याचे विषाणू इथे सोडले आणि गेले. याचकालावधीत मध्य प्रदेशातील जनतेने कौल दिलेल्या काँग्रेस सरकारचा पाडाव करून भाजपा सरकार स्थापन करण्यासाठी सर्वच पातळ्यांवर ऊत आला होता. नेमक्या याच कालावधीत देशात परदेशातून येणारे प्रवासी थांबविण्याची गरज होती. परंतु ते काही केले नाही. त्यामुळे हा विषाणू सुप्त अवस्थेत पसरत राहीला.
या विषाणूचे रूग्ण जेव्हा जगभरात मोठ्या प्रमाणावर आढळून येवू लागले आणि त्याची लक्षणे देशातील नागरिकांमध्ये जेव्हा जाणवू लागली. तेव्हा भारत सरकारला काही प्रमाणात जाग आली. तोपर्यत ओडीसा, पंजाब आणि महाराष्ट्राने त्यांच्या राज्यापुरता प्रश्न संपविण्यासाठी त्यांच्या राज्यात लॉकडाऊनची घोषणा करून टाकली. चित्रपटातही शिकागो शहराच्या सर्व सीमा सील केल्या जातात. तेथील नागरिक बाहेर जाणार नाही आणि बाहेरचा आत येणार नाही.
ही घोषणा करताना घराच्या बाहेर पडू नका, कामाच्या निमित्तानेच बाहेर पडा, किमान सामाजिक अंतर राखा, चेहरा-नाक-डोळे यांना सतत स्पर्थ करू नका, कोणालाही भेटल्यावर किमान तीन फुटाचे नंतर पाच फुटाचे अंतर राखा, चेहऱ्यावर मास्क लावा सारख्या सूचना राज्याच्या आरोग्य विभागाकडून करण्यास सुरुवात झाली. या दोन गोष्टींचे साम्य चित्रपट आणि वास्तवात आहे.
मात्र या आजाराचे गांभीर्य नागरिकांच्या लक्षात येईपर्यंत फक्त श्रीमंतापुरता मर्यादीत राहीलेला अर्थात परदेशगमन करून आल्या व्यक्तींपुरता राहीलेला आजार झोपडपट्टी, दाटीवाटीने रहात असलेल्यांच्या दारापर्यंत पोहोचला. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला.
या रूग्णांची संख्या देशपातळीवर लक्षात घेण्याजोगी वाढेपर्यंत भारत सरकार काय किंवा राज्य सरकार काय कोरोना विषाणूबाधीत रूग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टर, नर्सेंसनी कोणती काळजी घ्यावयाची, कोणते कपडे त्याला लागणार आहेत. याची माहिती नव्हती. त्यामुळे अनेक डॉक्टर्स, नर्सेसंना याची लागण झाली आणि स्वत:वरच उपचार करून घेण्याची वेळ आली. बाधीत डॉक्टर आणि नर्सेसची संख्या वाढल्यावर असे काही कपडे आहे किंवा पीपीई किट आहेत त्यांचा वापर अशा रूग्णावर उपचार करताना डॉक्टर आणि नर्सेसनी घालावयाचे यावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर केंद्राने अशा किट्स मागविण्यास आणि त्याच्या रेशनिंगला सुरुवात केली. हे सर्व पीपीई किट्स पाहिले की चित्रपटात वापरण्यात आलेले डॉक्टर, नर्सेसच्या कपड्यांची आठवण होते.
यानंतर चित्रपटातील तीसऱ्या योगायोगाकडे येवूया जगातील अनेक राष्ट्रे या विषाणूवर औषध शोधण्याचे प्रयत्न करत आहेत. चित्रपटातही करण्यात आले. मात्र चित्रपटात कॉलराशी संबधिक लस वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. तसाच निर्णय अमेरिकेने भारतात मलेरियासाठी वारण्यात येणाऱ्या हायड्रोक्लोरोफाईन या औषधाचा वापर तेथील कोरोनाबाधीत रूग्णांवर करण्याचा निर्णय घेतला. आपल्याकडे भारतातही त्याचा वापर करण्याचा निर्णय सुरुवातीला घेण्यात आला. मात्र आता प्लाझ्मा उपचार पध्दतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपचार पध्दतीमुळे किती रूग्ण बरे झाले याचा आकडा अद्याप बाहेर आलेला नाही. मात्र कोरोनाबाधीत रूग्णाच्या शरीरातील प्रतिकार शक्ती वाढविण्यावर सर्वच उपचारा तज्ञांकडून भर देण्यात येत आहे.
हा सर्व घटनाक्रम पाहिला की, जगात अशी पहिलीच वेळ असेल की एखाद्या चित्रपटात दाखविलेला कल्पनारम्य विलास जगभरातील अनेक नागरीकांना वास्तवात जगायची पाळी येते. यातून दोन गोष्टी दिसून येत असून जी संकट येत आहेत, त्या संकटाकडे आपण सर्वसामान्य आणि जागरूक नागरिक म्हणून आपण पहात नाही आहोत की आपल्या मेंदूने कार्यरत राहणे सोडले आहे. कधीकाळी प्रत्येकाला जगण्याचा, रोजगाराचा, मोठं होण्याचा (आर्थिकसह) हक्क असल्याचे आपण सांगत होतो. मात्र आता प्रांतिय, भाषिक आणि धार्मिक अफूची गोळी घेतल्यासारखे आपण वागत आहोत. त्यामुळे जिकडे बघावे तिकडे धार्मिकता, प्रांतिय भाषणे करतानाच अनेकजण दिसत आहेत. पण एक मात्र खरे की ज्याने कन्टेजन हा सिनेमा पाहिला त्याला आपणही वास्तवातही सिनेमातल्या प्रमाणे एका साईड रोलमध्ये जगत असल्याची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही.

गिरिराज सावंत

Check Also

गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी या तीन मराठी चित्रपटांची निवड मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

यंदाच्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी महाराष्ट्र शासनाकडून ग्लोबल आडगाव, गिरकी आणि बटरफ्लाय या तीन मराठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *