Breaking News

मुख्यमंत्र्याच्या फोनचा ४० हजार जणांना फायदा अखेर केंद्रीय नौकानयन मंत्रालयाची परवानगी

मुंबई: प्रतिनिधी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नाने अखेर मरिला डिस्कव्हरी या एका मोठ्या क्रुझ शिपवर महिन्याभरापासून अडकून पडलेल्या १४६ भारतीय खलाशी व नाविक यांना मुंबई बंदरावर उतरण्याची परवानगी मिळाली आहे. मुख्यमंत्री स्वत: नौकानयन राज्यमंत्री मनसुख मांडविया यांच्याशी बोलल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने काल उशिराने यासंदर्भातील एक आदेश जारी केला. त्याचा फायदा समुद्रात ठिकठिकाणी जहाजांवर अडकलेल्या सुमारे ४० हजार खलाशी, जहाजावरील कर्मचाऱ्यांना सुद्धा होणार आहे.
उद्या सकाळपासून या क्रुझ वरील खलाशांना व कर्मचाऱ्यांना मुंबई बंदरावर उतरविणे सुरु होईल. त्यांची वैद्यकीय तपासणीही होणार आहे. प्रसंगी त्यांना क्वारंटाईन करण्यासाठी एक इमारतही उपलब्ध ठेवण्यात आली आहे.
२ ते ६ एप्रिल या कालावधीत मरिला डिस्कव्हरी ही क्रुझ कोचीन, न्यू मंगलोर, गोवा आणि मुंबई अशा ठिकाणी पोहचणार होती. दरम्यान कोरोनाचा उद्रेक सुरु झाला आणि या क्रुझने लाएम चाबँग या थायलँड येथे १४ मार्च रोजी सर्व प्रवासी सोडले. ही क्रुझ १२ एप्रिल रोजी कोचीन येथे पोहचली पण या क्रुझवरील कर्मचाऱ्यांना उतरण्यास परवानगी नाकारण्यात आली. नंतर ही क्रुझ मुंबईजवळच्या समुद्रात १४ एप्रिल रोजी पोहचली आणि तेव्हापासून त्यावरील कर्मचारी मुंबईला उतरण्याची वाट पाहत होते. जहाजावरील कुठल्याही कर्मचाऱ्यास कोरोना लागण झाली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. थायलँड सोडून ३७ दिवस होऊन गेले होते मात्र जहाजावर कुठलाही संसर्ग नसल्याचे कंपनीने सागितले तरी परवानगी मिळत नव्हती.

Check Also

जयराम रमेश यांचे भाकित, मतदानाचे संकेत स्पष्ट, मोदी सरकारला निरोप…

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील १०२ जागांवर झालेले मतदान हे भाजपा व नरेंद्र मोदी सरकारचे शेवटचे दिवस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *