Breaking News

कोणत्याही विभागातला कर्मचारी मृत पावल्यास ५० लाख लवकरच योग्य तो निर्णय होण्याची शक्यता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

पुणे: प्रतिनिधी
कोरोना प्रतिबंधात विविध विभाग चांगले काम करत असून याकामी कार्यरत शासनाच्या कोणत्याही विभागातील कर्मचाऱ्याचा कोरोना प्रादूर्भावामुळे मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांची मदत देण्याबाबत मुख्यमंत्री महोदयांसोबत चर्चा झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देत याबाबत योग्य तो निर्णय होईल असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले.
कोरोना लॉकडाऊनकाळात रोगजाराच्या निमित्ताने पुणे, मुंबईमध्ये आलेल्या अन्य जिल्ह्यातील मजुरांच्या स्थलांतराबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी एकमेकांशी समन्वय साधून निर्णय घ्यावा. पोलिसांच्या आरोग्याची तपासणी, एन-९५ मास्क, वैद्यकीय सुरक्षा किट व आवश्यक ती साधने उपलब्ध करुन देण्यात यावीत अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी टाळेबंदीचे निर्बंध कडकपणे राबवावेत असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
पुण्यातील कौन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी हे निर्देश दिले.
बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, संदीप बिष्णोई, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालिका डॉ. अर्चना पाटील आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संबंधित विभागांकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती जाणून घेतली. तसेच योग्य ते उपाय सुचवून त्यांची गतीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या व मृत्यूदर कमी करणे आवश्यक आहे. या भागात गर्दी होऊ नये यासाठी येथील शॉपिंग मॉल कोणत्याही परिस्थितीत सुरु करण्यात येऊ नयेत असे आदेशही त्यांनी यावेळी दिले.
कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक निधी व इतर मदत तात्काळ उपलब्ध करुन देण्यात येईल. कॅन्टोन्मेंट भागात लॉकडाऊनचे धोरण पोलीस प्रशासनाने कडक अवलंबून कोणत्याही परिस्थितीत कोरोनाची साखळी तोडणे आवश्यक आहे. यापूर्वी क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींना वेळेत व चांगल्या दर्जाचे भोजन पुरवावे. शहरातील रुग्णसंख्या वाढू नये यासाठी झोपडपट्टी भागातील कुटुंबियांचे संस्थात्मक क्वारंटाईन करुन त्यांना अन्नधान्य व जीवनावश्यक साहित्याचा पुरवठा करण्याबाबत नियोजन करावे. प्रशासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेले निर्बंध पाळून नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले.
कोरोना प्रतिबंधासाठीच्या उपाययोजना राबविण्यासाठी आरोग्यसेवा तत्पर आणि सक्षम होण्यासाठी ससून रुग्णालयाच्या नवीन अकरा मजली इमारतीची उर्वरित कामे गतीने पूर्ण करावीत, असे सांगून रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यास त्यांच्यावर वेळेत उपचार होण्याच्या दृष्टीने काटेकोर नियोजन करावे. गरज भासल्यास शिवछत्रपती क्रीडा संकुलाची इमारत व शैक्षणिक संस्थांच्या इमारतीमध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देता येईल असे त्यांनी सांगितले.

Check Also

गडकरींकडून आदर्श आचारसंहितेचा भंग, गडकरी व आमदार मोहन मतेंवर गुन्हा नोंदवा

भारतीय जनता पक्ष सर्वकायदे धाब्यावर बसवून सातत्याने आचारसंहितेचा भंग करत आहे. भारतीय जनता पक्षाचे नागपूर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *