टोरेस घोटाळा प्रकरणात अटकेत असलेल्या युक्रेनियन अभिनेत्याने जामीनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. आपला फर्मशी कोणताही संबंध नसल्याचा दावा अभइनेत्याने जामीन अर्जात केला आहे.
या घोटाळ्यात सहभागी असल्याप्रकरणी आर्मन अतेन या युक्रेनियन अभिनेत्याला गेल्या महिन्यात पोलिसांनी मालाड मालवणीतून अटक केली होती. तेव्हापासून तो न्यायालयीन कोठडीत आहे. आपले नाव मूळ गुन्ह्यातमध्ये नसतानाही आपल्याला तुरुंगात ठेवण्यात आले आहे, शामुळे आपली एक अभिनेता म्हणून कारकीर्दीवर परिणाम होऊ शकतो. आपण निर्दोष असून आपल्याला या प्रकरणात गुंतवण्यात आले असल्याचा दावाही अटेनच्या वतीने याचिकेत करण्यात आला आहे. काही युक्रेनियन लोकांनी मुंबईत दागिन्यांचे दुकान सुरू करण्यासंदर्भात आपल्याशी संपर्क साधला होता. म्हणूनच त्याने मुख्य आरोपी मोहम्मद तौसिफ रियाझसोबत बैठक केल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. तसेच आपण कंपनीचे संचालक किंवा प्रवर्तक नसून टोरेस स्टोअरच्या कामांशी आपला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणताही संबंधित नसल्याचा दावाही अतेन जामीन अर्जात केला आहे.
बनावट जन्मदाखल्यावरून अटक
टोरेस घोटाळा प्रकरणात अटकेत असलेल्या युक्रेनच्या अभिनेत्याकडे बनावट जन्मदाखला होता आणि त्याआधारे त्याने भारतीय असल्याचा दावा केला होता, अशी माहिती मुंबई पोलिसांनी त्याल अटक करताना दिली होती. आरोपीने तपासादरम्यान भारतीय असल्याचा दावा करीत मुंबई महापालिकेच्या एफ-वॉर्डकडून कथितरित्या मिळालेला जन्मदाखला दाखवला. तसेच आधार कार्ड, वाहन परवाना व अन्य कागदपत्रेही दाखवली. मात्र, जन्म दाखल्याच्या सत्यतेविषयी शंका आल्याने त्याविषयी महापालिकेकडे पडताळणी केली असता, त्याचा दाखला बनावट असल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
दी प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने ‘टोरेस ज्वेलरी’ या ब्रँडखाली गुंतवणुकीच्या खोट्या योजना राबवून गुंतवणूकदारांची एक हजार कोटी रुपयांहून अधिकची फसवणूक केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी आर्मनसह सहा आरोपी अटकेत आहेत. आतापर्यंत १०,८४८ हून अधिक गुंतवणूकदारांनी मुंबई पोलिसांकडे फसवणुकीच्या तक्रारी दाखल केल्या आहेत. ग्राहकांना सोने, चांदी आणि हिऱ्याचे दागिने देणाऱ्या त्यानंतर हळूहळू पैशांत गुंतवणूक करून संधी मिळताच हजारो कोटी घेऊन पोबारा करणाऱ्या टोरेस शोरुम घोटाळ्यातील ११ आरोपी फरार असून त्यांच्याविरुद्ध लूक आउट सर्क्युलर (एलओसी) बजावण्यात आली आहे.