Breaking News

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणः प्रज्ञासिंह ठाकूरविरोधातील जामीनपात्र वॉरंट रद्द न्यायालयात हजर झाल्यानंतर न्यायालयाचा निर्णय

मालेगाव २००८ च्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आणि माजी भाजपा खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याविरुद्ध बजावलेले जामीनपात्र वॉरंट गुरुवारी विशेष न्यायालयाने रद्द केले. प्रज्ञा सिंह ठाकूर स्वतः उपस्थित राहिल्यानंतर न्यायालयाकडून वॉरंट रद्द करण्यात आले.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील खटल्याची कार्यवाही शेवटच्या टप्प्यात आली असून राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष न्यायालयासमोर या खटल्यावर अंतिम युक्तिवाद सुरू आहे. तथापि, सर्व आरोपींना प्रत्येक सुनावणीला न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले असून त्यानुसार, गुरुवारी, ठाकूर न्यायालयात उपस्थित होत्या आणि जामीनपात्र वॉरंट रद्द करण्याची मागणी करणारा अर्ज वकिलामार्फत दाखल केला. आपण आजारी असल्याने तथा रुग्णालयात दाखल असल्यामुळे न्यायालयात अनुपस्थित राहिल्याचे ठाकूर यांनी अर्जात नमूद केले होते. न्यायालयाने त्यांचा अर्ज स्वीकारून जामीनपात्र वॉरंट रद्द केले.

संपूर्ण खटल्यादरम्यान, फिर्यादी पक्षाने ३२३ साक्षीदार तपासले, असून त्यापैकी ३४ साक्षीदार फितूर झाले आहेत. २०११ मध्ये एनआयएकडे हस्तांतरित होण्यापूर्वी हे प्रकरण सुरुवातीला महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकाकडे (एटीएस) होते. एनआयएने २०१६ मध्ये प्रज्ञा ठाकूर आणि श्याम साहू, प्रवीण टाकल्की आणि शिवनारायण कलसांग्रा यांना पुराव्यांअभावी दोषमुक्त करून आरोपपत्र दाखल केले. तथापि, एनआयए न्यायालयाने पुढील तपासणीनंतर ठाकूरवरील आरोप कायम ठेवले. साल २०१८ मध्ये साक्षीदारांच्या तपासणीसह खटल्याचा सुरुवात झाली.

काय प्रकरण

२९ सप्टेंबर २००८ रोजी उत्तर महाराष्ट्रातील मुंबईपासून सुमारे २०० किमी अंतरावर असलेल्या मालेगाव येथील मशिदीजवळ मोटारसायकलचा स्फोट होऊन सहा जण ठार आणि १०० हून अधिक जखमी झाले होते. कायदा कारवाया प्रतिबंध कायदा (यूएपीए) आणि भारतीय दंड संहिता (आयपीसी) अंतर्गत खटल्यात सात आरोपींमध्ये लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित आणि माजी भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर हे प्रमुख असून मेजर रमेश उपाध्याय (निवृत्त), अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांच्यावर खटला चालविण्यात आला. त्यातील समीर कुलकर्णीवरील कारवाईला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *