Breaking News

कुर्ला बस दुर्घटना प्रकरण : संजय मोरेचा जामीन नाहीच सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

कुर्ला पश्चिम येथील बेस्टच्या भीषण अपघातातील प्रमुख आरोपी बस चालक संजय मोरेने जामिनासाठी केलेला अर्ज सत्र न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावला.

बसमधील तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचा दावा करून संजय मोरेने जामिनाची मागणी सत्र न्यायालयात अर्जाद्वारे केली होती. संजय मोरेच्या जामीन अर्जावर मागील शनिवारी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. शुक्रवारी सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश सचिन पवार यांनी मोरेच्या जामीन अर्जावर निर्णय देताना तो फेटाळत असल्याचे स्पष्ट केले.

न्यायवैद्यक अहवाल आणि आरटीओ नुसार संजय मोरे हा घटनेच्या वेळी मद्यधुंद अवस्थेत नसली तरीही बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता. मोरेच्या चुकीमुळेच हा अपघात झाल्याचा दावा करून पोलिसांनी जामीन अर्जाला विरोध केला होता. संजय मोरे हा चांगला चालक नसून त्याच्यापासून सर्वसामान्यांना धोका आहे. त्यामुळेच, त्याला जामीन मंजूर करू नये. जामिनावर सुटका झाल्यास तो पळून जाण्याची शक्यता असल्याचा दावाही पोलिसांनी संजय मोरेचा जामीन अर्ज फेटाळण्याची मागणी करताना केला होता.

दुसरीकडे, आपल्याला १९८९ पासून बस चालविण्याचा अनुभव आहे आणि बसमध्ये यांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा दुर्दैवी अपघात झाला. त्यासाठी आपल्याला जबाबदार धरता येणार नाही. या अपघाताला जबाबदार असलेल्या प्रमुख आरोपींना वाचवण्यासाठी आपला बळी दिला जात असल्याचा दावा संजय मोरेच्या वतीने करण्यात आला होता. या प्रकरणात कोणत्याही बस कंत्राटदाराला अटक किंवा आरोपी केलेले नाही. आपल्याला कार्यालयात बसून वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आणि दिंडोशी बस आगारात विद्युत बस चालविण्यास सांगितले. त्यानंतर, आपल्याला कुर्ला येथे बस चालविण्यास परवानगी देण्यात आली. तसेच, या दुर्घटनेसाठी एकट्याला जबाबदार धरता येणार नसल्याचा पुनरूच्चार करून आपल्याला जामीन मंजूर करण्याची मागणी मोरेने केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *