कुर्ला परिसरातील बेस्ट बसच्या भीषण अपघातासाठी प्रमुख आरोपी आणि बस चालक संजय मोरेचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचे प्रथमदर्शनी निरीक्षण सत्र न्यायालयाने मोरेचा जामीन अर्ज फेटाळताना नोंदवले. तसेच, बसमधील तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाल्याचा मोरेचा दावा न्यायालयाने फेटाळून लावला.
बसमधील तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाल्याच्या मोरे याच्या दाव्याचे समर्थन करणारे कोणतेही पुरावे नाहीत, आरटीओने अपघातग्रस्त बसबाबत सादर केलेल्या अहवालाचा विचार करता बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता हे स्पष्ट होते. त्यामुळे, बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने किंवा ब्रेक फेल झाल्याने हा दुर्दैवी अपघात झाल्याचे मानणे कठीण असल्याचेही अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एम. पठाडे यांनी १० जानेवारी रोजी मोरेचा जामीन अर्ज फेटाळून लावताना नमूद केले होते. न्यायालयाच्या सविस्तर आदेशाची प्रत मंगळवारी उपलब्ध झाली.
जबाबदारीने बस चालवण्याची गरज असतानाही मोरेने बेफिकीर आणि निष्काळजीपणे बस चालवली. बेफिकीरपण बस चालवून त्याने बसमधील प्रवाशांसह वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या नागरिकांच्या जीव धोक्यात घातला. त्यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले. त्यामुळे मोरे दोषी ठरल्यास त्याला होणारी शिक्षा लक्षात घेता जामीन मंजूर करणे आपल्याला योग्य वाटत नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
दुसरीकडे, आपल्याला १९८९ पासून बस चालविण्याचा अनुभव असून विद्युत बसमध्ये यांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा दुर्दैवी अपघात झाला. त्यासाठी आपल्याला एकट्याला जबाबदार धरू नये. या अपघाताला जबाबदार असलेल्या प्रमुख आरोपींना वाचवण्यासाठी आपला बळी दिल्याचा दावा करून मोरेने जामीन अर्ज केला होता. या प्रकरणात कोणत्याही बस कंत्राटदाराला अटक किंवा आरोपी केलेले नाही. आपल्याला कार्यालयात बसून वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आणि दिंडोशी बस आगारात विद्युत बस चालविण्यास सांगितले, असा दावा करून जामीन मंजूर करण्याची मागणी मोरेने न्यायालयाकडे केली होती.
मोरे हा घटनेच्या वेळी मद्यधुंद अवस्थेत नसला तरीही बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता. हा न्यायवैद्यक अहवाल आणि आरटीओचा अहवालाचा दाखला देऊन मोरेच्या निष्काळजीपणाच हा अपघात झाल्याचा दावा करून पोलिसांनी त्याच्या जामीन अर्जाला विरोध केला होता तसेच, जामिनावर सुटका झाल्यास तो पळून जाण्याची शक्यताही पोलिसांनी वर्तवली होती.