Breaking News

जलदगतीने खटला चालवणे हा आरोपीचा अधिकार असल्याची उच्च न्यायालयाची टिप्पणी वडापाव विक्रेत्याला जिवंत जाळण्याचे प्रकरण : खटला संथगतीने सुरू असल्याच्या कारणांती आरोपीला जामीन

खटला जलदगतीने चालवणे हा आरोपीचा अधिकार आहे. याप्रकरणी खटला जलदगतीने चालवण्याचे विविध न्यायालयांकडून आदेश देऊनही खटल्याच्या सुनावणीत फारशी प्रगती झाली नसल्याचे ताशेरे उच्च न्यायालयाने ओढले आणि व्यावसायिक वादातून वडापाव विक्रेत्याला जिवंत जाळल्याप्रकरणी अटकेत असलेल्या अर्जदाराला न्यायालयाने जामीन मंजूर केला.

जलदगतीने खटला चालवला जाणे हा आरोपीचा अधिकार आहे.

याचिकाकर्त्याविरोधातील खटला जलगतीने चालवण्याचे वारंवार आदेश देऊनही खटल्यात कोणतिही प्रगती झालेली नाही, अशा शब्दात न्या. रेवती डेरे आणि न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने ताशेरे ओढले. तसेच, याच कारणास्तव अर्जदाराला सशर्त जामीन मंजूर केला.

उल्हासनगरमध्ये २०१७ मध्ये अर्जदार आणि मृत व्यक्ती या दोघांचाही वडापाव विक्रीचा व्यवसाय होता. त्यातून निर्माण झालेल्या वादातून अर्जदार सुरेश अहुजाने चंद्रलाल रामरत्यानीवर रॉकेल ओतून त्याला पेटवून दिले. मात्र, ८० टक्के भाजलेल्या चंद्रलालचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अर्जदाराचे ज्या ठिकाणी वडापावचे दुकान होते. त्याच ठिकाणी चंद्रलालनेही वडापावचे दुकान सुरू केले. वास्तविक, अहुजाने वडापावचे दुकान बंद केल्यानंतर काही महिन्यांनी चंद्रलालने तेथे वडापावचेच दुकान सुरू केले होते. ही बाब अहुजाला सहन झाली नाही आणि त्याने चंद्रलाल आपल्याला पुन्हा वडापावचे दुकान सुरू करायचे असल्याचे सांगून त्याला दुकान बंद करण्यास सांगितले. परंतु, चंद्रलालने म्हणणे अमान्य केल्यामुळे, रागाच्या भरात अहुजाने चंद्रलालवर रॉकेल ओतून त्याला जिवंत जाळले.

कल्याण सत्र न्यायालयात सुरू असलेल्या अहुजाने खटल्याला होत असलेल्या विलंबामुळे दोनवेळा जामिनाची मागणी केली होती. मात्र, दोन्हीवेळा जामीन नाकारण्यात आला. उच्च न्यायालयानेही त्याला जामीन नाकारताना खटला जलदगतीने चालवण्याचे आदेश दिले होते. तथापि, गेली सात वर्षे याचिकाकर्ता तुरुंगात असून खटल्यात आतापर्यंत केवळ तीन साक्षीदारांची साक्ष नोंदवली आहे. याशिवाय, सरकारी पक्षाकडून आणखी आठ किंवा नऊ साक्षीदार तपासण्यात येणार असून जूनपासून एकाही साक्षीदाराची साक्ष नोंदवण्यात आली नसल्याचे अर्जदाराच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *