घाटकोपरमधील महाकाय फलक दुर्घटनेप्रकरणी जामीन मिळाल्यानंतर इगो मीडियाचा मालक भावेश भिंडेने दोषमुक्ततेसाठी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. घटनेनंतर सर्वसामान्यांमध्ये निर्माण झालेला संताप कमी करण्याच्या उद्देशाने आपल्याला या प्रकरणात गोवल्याचा दावा भिंडेने अर्जातून केला आहे.
आपल्या अटकेला भिंडेने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. अटक बेकायदा ठरवून तातडीने जामिनावर सुटका करण्याचे आदेश देण्याची मागणीही केली होती. परंतु, त्याची अटक कायदेशीर ठरवून उच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर, भिंडेने सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. सत्र न्यायालयाने ऑक्टोबर महिन्यात भिंडेला जामीन मंजूर केला होता. त्यांनतर आता आपण निर्दोष असल्याचा आणि आपल्याला विनाकारण यामध्ये गोवल्याचा दावा करून प्रकरणातून दोषमुक्त करण्याची मागणी भिंडेने सत्र न्यायालयात केली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एम. पाथाडे यांनी भिंडेच्या अर्जाची दखल घेतली आणि पोलिसांना भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश देऊन प्रकरणाची सुनावणी ७ डिसेंबर रोजी ठेवली.
इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या स्थापनेपासून ते हे महाकाय फलक लावेपर्यंत आपला कंपनीशी कोणताही संबंध नव्हता. याउलट, या काळात प्रकरणातील सहआरोपी जान्हवी मराठे या कंपनीच्या संचालकपदी होत्या आणि २१ डिसेंबर २०२३ रोजी त्यांनी राजीनामा दिल्यानंतर आपण कंपनीच्या संचालकपदाचा कार्यभार हाती घेतला. तोपर्यंत दुर्घटनाग्रस्त महाकाय फलक लावून त्यावर जाहीरातही प्रसिद्ध झाली होती. त्यामुळे, आपल्यावरील आरोप निराधार, खोटे, अस्पष्ट असून गुन्ह्यातील आपल्या सहभागाबाबत कोणताही ठोस पुरावा नसल्याचा दावाही भिंडेने अर्जात केला आहे.
फलक दुर्घटना ही दैवी कृत्य होते. त्यासाठी आपल्याला जबाबदार धरता येणार नाही.तसेच राजकीय सूडबुद्धीमुळे आपल्याला या प्रकरणी गोवण्यात आल्याचा दावा भिंडेने जामिनाची मागणी करतानाही केली होता.