मुघल बादशाह औरंगजेबबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे समाजवादी पक्षाचे नेते आणि मानखुर्द-शिवाजीनगरचे आमदार अबु आझमी यांना सत्र न्यायालयाने २० हजार रुपयांच्या बाँण्डवर अटकेपासून संरक्षण दिले.
औरंगजेबबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकऱणी अबु आझमी यांच्या विरोधात मुंबईत गुन्हा दाखल कऱण्यात आला होता. त्याप्रकऱणी अटकेपासून संरक्षण मिळावे, म्हणून अबु आझमी यांनी सत्र न्यायालयात अर्ज केला होता, तो अर्ज न्यायालयाने स्वीकारला आणि त्यांना अटकेपासून संरक्षण दिले. त्यासोबतच १२ ते १५ मार्च रोजी तपास अधिकाऱ्यासमोर उपस्थित राहण्याचे आदेश दिले.
काय प्रकरण
आपल्याला चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. औरंगजेबने अनेक मंदिरांची स्थापना केली होती. त्यामुळे आपण औरंगजेबाला क्रूर शासक मानत नाही. तसेच छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील युद्ध राज्य कारभाराची होती. त्यात कुठेही हिंदू आणि मुस्लिम अशी किनार नव्हती, असे वक्तव्य आझमी यांनी केले होते. त्यानंतर भाजप व शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी विधानसभेत अबू आझमींच्या वक्तव्यावरून गोंधळ घातला होता. राजकीय वर्तुळात अबू आझमींवर टीकेची झोड उठली होती. अबू आझमींनी माफी मागावी, अशी मागणी देखील केली जात होती. यानंतर विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत अबू आझमी यांचे निलंबन करण्यात आले. दरम्यान, आपण कोणतही चुकीचे वक्तव्य केले नसल्याचा दावा अबू आझमी यांनी केला होता.