Breaking News

या जिल्ह्यात झाली कापसाची विक्रमी खरेदी अकोटच्या सीसीआय केंद्रावर २ लाख ८५ हजार क्विंटल कापसाची खरेदी

अकोला: विशेष प्रतिनिधी
अकोला जिल्हयात कापसासाठी प्रसिद्ध असलेल्या अकोट तालुक्यात कापसाची विक्रमी खरेदी झाली असून अकोटातील कृषी उत्पन्न बाजार समितीत असलेल्या सीसीआयच्या केंद्रावर आतापर्यंत २ लाख ८५ हजार क्विंटल इतक्या विक्रमी कापसाची खरेदी करण्यात आली आहे.
अकोट तालुक्यात कापूस, ज्वारी, मुग ही खरिपाच्या हंगामातील प्रमुख पिके समजली जातात. कारण ही तिन्ही नगदी पिके असल्याने बाजारात माल विकला की शेतकऱ्यांच्या हातात त्वरित पैसा मिळतो. त्यामुळे या पिकांचा अधिक प्पेरा करण्यावर शेतकऱ्यांचा भर असतो. संपलेल्या खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांनी शेतात कापूस (पराटी) पेरला होता. कापसाचे पीकही चांगले आले होते. कापूस वेचण्यासाठी मजूर मिळत नसल्याने मे महिन्यापर्यंत शेतात पराटीला कापूस होता. कापूस घरात आल्यानंतर शासनाच्या हमी भावाप्रमाणे शेतकरी आपला कापूस शासनाच्या अधिकृत केंद्रावर नेऊन विकतात. तसा तो विकण्यात आला.
अकोट येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सीसीआय केंद्रावर या कापसाची खरेदी केली जात असून आतापर्यंत २ लाख ८५ हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. शेतकर्‍यांच्या घरात अजूनही कापूस पडून आहे. परंतु लाकडाऊन सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांची मोठीच अडचण होत आहे. नोंदणीकृत शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील कापूस १३ जुलैपर्यंत विक्रीसाठी आणावा यासाठी त्यांना एस एम एस पाठवले असून १४ तारखेनंतर सीसीआय केंद्रावर कापूस खरेदी केला जाणार नाही, असे सांगण्यात आले आहे. या तारखेनंतर केवळ एफ ए क्यू दर्जाचा कापूस खरेदी केला जाईल व नाँन एफ ए क्यू दर्जाच्या कापसाची खरेदी केली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. आपल्याकडील कापूस लवकर विक्री केला जावा यासाठी शेतकर्‍यांनी बैलगाडीतून तर काही शेतकऱ्यांनी टँक्टरमधून आपला कापूस विक्रीसाठी आणला होता.
दरम्यान तेल्हारा तालुक्यातील कापूसही अकोटच्या सीसीआय केंद्रावर विक्रीसाठी आणण्यात आला होता. त्यामुळे कापूस खरेदी केंद्रावर एकच गर्दी झाली होती. अकोटात १० जिनिंग कारखाने असून या कापूस मोजमापाची जबाबदारी या कारखान्यांवर देण्यात आली होती. काही तुरळक घटना वगळता कापूस खरेदी शांततेत झाली आहे. शेतकर्‍यांना त्यांचा कापूस विक्री करण्यासाठी आणखी तीन दिवस उरल्यामुले ही कापूस खरेदी तीन लाख क्विंटलचा टप्पा गाठू शकते. ही कापूस खरेदी करण्यात सभापती, सचिव व कर्मचाऱ्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली आहे.

Check Also

बाळासाहेब थोरात यांचा आरोप तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बैठकीचे आश्वासन

दुधाचे भाव २५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत, राज्यभर आंदोलने आणि मोर्चे सुरू आहेत. सरकार मात्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *