Breaking News

गर्दी टाळण्यासाठी भाजीपाला, किराणा, औषधांच्या गाड्या सोडाव्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर एमएमआरमधील नागरीकांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू केलेली असली तरी यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आली. तसेच शहरातील रस्त्यांवर गर्दी होवू नये यासाठी प्रत्येक सोसायटीत राहणाऱ्या नागरीकांच्या भाजीपाल्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली. या भाजीपाल्याबरोबरच जर राज्य सरकारने प्रत्येक सोसायटीत, झोपडपट्टीभागात किराणा माल आणि औषधे असलेल्या मोबाईल गाड्या पाठविण्याची मागणी मुंबई महानगरातील प्रदेशातील अनेक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

मुंबई शहरातील रस्त्यांवर भाजीपाला खरेदी करण्यासाठी भायखळा बाजार, महात्मा फुले मार्केट येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. त्यामुळे संचारबंदी लागू करण्याच्या मुख्य उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. यावर तोडगा म्हणून मुंबई जिल्हाधिकाऱी कार्यालयाकडून भाजीपाला खरेदीची जबाबदारी सोसायटींच्या पदाधिकाऱ्यांवर सोपविण्याचा निर्णय घेत त्याचे आदेशही काढले. मात्र या गोष्टीमुळे जरी एकाबाजूला रस्त्यावरील गर्दी कमी होण्यास मदत होणार असली तरी यामुळे नागरीकांचे समाधान होण्याऐवजी नागरीकांमध्येच असंतोष निर्माण होण्यास मदत होईल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

त्यापेक्षा तत्कालीन राज्य सरकारने सोसायटीधारकांची मागणी असेल तर प्रत्येक इमारतीत भाजीपाला विक्रीची दुकाने सुरु करता येईल असे विधेयक सहकार विभागाकडून मंजूर करण्यात आले होते. त्यानुसार भाजीपाला व्यापारी अथवा शेतकऱ्याला प्रत्येक भागातील काही सोसायट्या दिल्यास त्या सोसायटीत एका ठरलेल्या दिवशी तो जावून त्याची विक्री करेल. तसेच हा भाजीपाला विकत घेताना तेथील रहिवाशांकडून किमान १ मीटर अंतराचा नियमही पाळला जावून त्यांना वाट पहात बसावे लागणे अथवा माल खराब होण्याचा धोका उरणार नसल्याचे ठाणे शहरातील रहिवाशी प्रल्हाद कुलकर्णी यांनी सांगितले.

याच धर्तीवर किराणा मालाचे असलेले मोबाईल गाड्या, औषधे असलेल्या गाड्या त्या त्या भागात एक दिवस सोडून अथवा आठवड्यातून दोन दिवसाआड पाठविल्यास रस्त्यावर नागरीकच दिसणार नसल्याचे सांगत या राज्य सरकारचा जो मुख्य उद्देश आहे तो पूर्ण होईल आणि नागरीकांना हवे असलेले मिळेल अशी मागणी कल्याण येथील रहिवाशी दिपक खेडेकर यांनी केली.

तसेच त्या त्या विभागात सुरु राहणारी डॉक्टरच्या नावांची यादी किंवा शासकिय किंवा महानगरपालिकांच्या आरोग्य केंद्रांची यादीही जाहीर करावी जेणेकरून किरकोळ अथवा साधारण आजारासाठी बाहेर पडणाऱ्या रूग्णांना फारशी वणवण करावी लागणार नसल्याची सूचनाही त्यांनी केली.

Check Also

मिठी नदी पात्रातील बाधित झोपडपट्टीधारकांना ठाकरे सरकार देणार घरे त्वरित स्थलांतर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी मिठी नदी पात्रातील क्रांती नगर, संदेश नगर येथील बाधित झोपडपट्टीधारकांना प्राधान्य देऊन त्यांचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *