Breaking News

विद्यापीठ, महाविद्यालय आणि सीईटी परीक्षांसाठी कुलगुरूंची समिती स्थापन विद्यापीठात टेस्टिंग लॅब सुरू करण्याबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या सूचना

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने विद्यापीठ, महाविद्यालयीन आणि सीईटी परीक्षेचे नियोजित वेळापत्रक पुढे ढकलले. मात्र राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये परीक्षेसंदर्भात संभ्रम निर्माण होत असल्याने विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ यासाठी कोरोना आजाराचा अंदाज घेणे आणि सर्व परीक्षेचे नियोजन आणि नियंत्रण करण्यासाठी समिती गठित करण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

सामंत यांनी आज राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांचे कुलगुरू यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. तसेच यावेळी त्यांनी सर्व विद्यापाठातील कर्मचाऱ्यांनी त्यांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-१९ या खात्यात जमा करावे असे आवाहनही त्यांनी केले.

विद्यापीठ, महाविद्यालय आणि सीईटी सेलकडून पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा रद्द होणार नाहीत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. या सर्व परीक्षेचे वेळापत्रक नव्याने जाहीर करण्यात येईल. या सर्व परीक्षेचे नियोजन आणि नियंत्रण करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुहास पेडणेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर, एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरु शशिकला वंजारी, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे कुलगुरू देवानंद शिंदे, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ.अभय वाघ, उच्च तंत्रशिक्षण विभागाचे संचालक धनराज माने यांची समिती गठित करण्यात आली असून ही समिती राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करून महाविद्यालयीन परीक्षेचे वेळापत्रक नियोजन, शैक्षणिक वर्षाचे नियोजनाचा अहवाल तयार करून उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव आणि मंत्री यांना सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हा अहवाल सादर झाल्यानंतर परिक्षांबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

विद्यापीठात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मल्टीपर्पज लॅब सुरू करण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांच्या सूचना

राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अकृषी विद्यापीठांमध्ये विविध प्रकारच्या आजारा संदर्भातील चाचण्या घेता येतील अशा स्वरूपाच्या मल्टिपर्पज लॅब सुरू करण्याच्या सूचना देत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे अशा प्रकारची लॅब सुरू केली आहे. यासाठी केंद्र शासन, राज्य शासन आणि आरोग्य विभागाच्या आवश्यक त्या सर्व परवानग्या तातडीने देण्यात येतील. याच पार्श्वभूमीवर राज्यातील इतर विद्यापीठांनी आपल्याकडे अशा प्रकारच्या लॅब सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत.  त्यासाठी राज्य शासनाकडून सर्व परवानग्या देण्यात येतील असे आश्वासनही त्यांनी दिले.
आरोग्य यंत्रणेला सहकार्य करण्यासाठी एनएसएस विद्यार्थ्यांचीही मदत

आरोग्य यंत्रणेला सहकार्य करण्यासाठी एनएसएस विद्यार्थ्यांचीही मदत घेता येईल का याचा सर्व विद्यापीठांनी विचार करावा. काही दिवसांपूर्वी सोलापूर विद्यापीठाने आरोग्य यंत्रणेला सहकार्य करण्यासाठी एक प्रयोग सुरू केला असून एनएसएसच्या २७  विद्यार्थ्यांना आईवडिलांकडून परवानगी घेऊन त्यांना प्रशिक्षण देऊन आरोग्यसेवेच्या यंत्रणेसाठी सज्ज केले. याच धर्तीवर राज्यातील इतर विद्यापीठांमध्ये सुद्धा  एनएसएसचे विद्यार्थी आरोग्य यंत्रणेच्या सेवेसाठी घेता येतील का, यासाठीचा अहवाल सादर करावा असे आदेशही त्यांनी यावेळी कुलगुरूंना दिले.

मुंबई विद्यापीठाकडून ऑनलाईन समुपदेशन आणि मानसिक आरोग्य सेवेला सुरूवात

कोरोना विषाणूचा वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांमध्ये  मानसिक आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. त्यांना चिंता, अनिश्चितता, निराशा, सामाजिक विलगीकरण आणि असुरक्षितपणाचा सामना करणे कठीण जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील लोकांच्या मानसिक आरोग्यावर आणि धोक्यामध्ये वावरणाऱ्या लोकसंख्येवर कोरोनाचा प्रभाव नोंदवून त्याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने पुढाकार घेऊन कोव्हिड १९ च्या उद्रेकाच्या मानसिक परिणामास सामोरे जाण्यासाठी विद्यापीठाच्या उपयोजित मानसशास्त्र विभागाने ऑनलाइन मानसिक आरोग्य सहाय्य सेवा उपलब्ध करुन दिली आहे. ही समुपदेशन सेवा वेब-आधारित स्वरूपात दिली जात आहे. विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. विवेक बेल्हेकर यांनी ही ऑनलाईन समुपदेशनाची संकल्पना आखली आहे.  विभागातील सर्व प्राध्यापक समुपदेशन कार्यक्रमाचा भाग असून, डब्ल्यूएचओ, एपीए आणि अन्य व्यावसायिक मार्गदर्शक तत्त्वे वापरून विभागाने एक कोव्हिड १९ समुपदेशन प्रोटोकॉल विकसित केला आहे. अशा प्रकारे इतर  विद्यापीठांनीही सुविधा सुरू करावी अशी सूचनाही त्यांनी केली.

Check Also

EVM आणि VVPAT प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी १८ एप्रिलला

सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी (१६ एप्रिल) व्होटर-व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल (VVPAT) रेकॉर्डच्या विरोधात इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *