Breaking News

‘कॉपी’ने होणार संस्कृती कलादर्पण चित्रपट महोत्सवाची सुरूवात १६ एप्रिलपासून होणार सुरुवात

मुंबई : प्रतिनिधी

मराठी सिनेसृष्टीला सध्या ‘संस्कृती कलादर्पण’ पुरस्कार सोहळ्याचे वेध लागले आहेत. १८वा संस्कृती कलादर्पण नाट्यमहोत्सव नुकताच मोठ्या थाटात संपन्न झाल्यानंतर १६ एप्रिलपासून १८वा संस्कृती कलादर्पण चित्रपट महोत्सव प्रारंभ होणार आहे. माटुंगा येथील यशवंत नाट्यगृहामध्ये पार पडणाऱ्या या महोत्सवाची सुरुवात बहुचर्चित ‘कॉपी’ या मराठी सिनेमाने होणार आहे.

अर्चना नेवरेकर फाऊंडेशनची प्रस्तुती असलेल्या तसंच संस्थापक-अध्यक्ष चंद्रशेखर सांडवे यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्या या महोत्सवामध्ये २०१७ मध्ये सेन्सॅार झालेल्या चित्रपटांपैकी निवडण्यात आलेले पाच उत्कृष्ट सिनेमे दाखवण्यात येणार आहेत. १६ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता ‘कॉपी’ या सिनेमाने या महोत्सवाला सुरुवात होईल. हा सिनेमा अद्याप प्रदर्शित झालेला नाही. श्री महालक्ष्मी क्रिएशन्सच्या बॅनरखाली तयार झालेल्या ‘कॉपी’च्या निमित्ताने एका वेगळया विषयाला हात घालण्यात आला आहे. शिक्षणव्यवस्थेवर तसंच शिक्षणक्षेत्रातील कारभारावर भाष्य करणाऱ्या ‘कॉपी’चं दिग्दर्शन हेमंत धबडे आणि दयासागर वानखेडे यांनी केलं आहे. या चित्रपटाची मूळ संकल्पना गणेश रामचंद्र पाटील असून निर्मितीही त्यांनीच केली आहे. वेगळया वळणावरील चित्रपटांची विशेष दखल घेणाऱ्या ‘एशियन फिल्मफेस्टिव्हल’मध्येही ‘कॉपी’ची निवड करण्यात आली होती. याखेरीज ‘लॉस एंजेलेस सिने फेस्टिव्हल’मध्ये ‘कॉपी’ने सेमी फायनालिस्ट बनण्याचा मान पटकावला आहे. ‘५५व्या महाराष्ट्र राज्य पुरस्कारां’मध्ये ‘कॉपी’ला प्रथम पदार्पण चित्रपट निर्मितीचे नामांकन जाहिर झाले आहे. ‘कॉपी’ची कथा एका खेडेगावातील शाळेतील आहे. या शाळेतील कारभाराच्या आधारे देशभरातील खेडयांमधील काही शाळामध्ये घडणारा प्रकार उघडकीस आणण्याचा प्रयत्न या चित्रपटात करण्यात आला आहे. दिग्दर्शनासोबतच हेमंत धबडे, दयासागर वानखेडे आणि साहुल साळवे यांनी कथा लिहिली असून हेमंत आणि दयासागर यांनी पटकथा लिहिली आहे. अंशुमन विचारे, जगन्नाथ निवंगुणे, कमलेश सावंत, मिलिंद शिंदे, निता दोंदे, अनिल नगरकर, राहुल बेलापूरकर, आशुतोष वाडकर पूनम राणे, सौरभ सुतार, प्रवीण कापडे, रवी विरकर, श्रद्धा सावंत, अदनेश मदुशिंगरकर, प्रतिक लाड, रोहित सोनावणे, प्रतिक्षा साबळे, शिवाजी पाटणे, सिकंदर मुलानी, आरती पाठक आणि विद्या भागवत आदी कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत.

‘कॉपी’खेरीज अश्विनी भावेच्या अभिनयाने सजलेला ‘मांजा’ हा आणखी एका वेगळ्या विषयावरील धाडसी सिनेमा या महोत्सवामध्ये रसिकांचं लक्ष वेधून घेणार आहे. याशिवाय आजवर कधीही न मांडलेल्या एका विशिष्ट मुद्द्यावर आधारित असलेला ‘नदी वाहते’, ‘रेडू’, ‘गच्ची’, ‘बंदूक्या’, ‘पळशीची पाटी’, ‘कच्चा लिंबू’ आणि ‘मंत्र’ हे सिनेमेही या महोत्सवाची शोभा वाढवणार आहेत. भाऊ कदमची मुख्य भूमिका असलेल्या ‘नशीबवान’ या मराठी सिनेमाने १८ एप्रिलला १८ व्या संस्कृती कलादर्पण चित्रपट महोत्सवाची सांगता होणार आहे.

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *