Breaking News

प्रियांका, कंगनाला वेळ देणाऱ्या मोदींनी संभाजीराजेंना वेळ न देणे हा महाराष्ट्राचा अवमान मोदींना छत्रपतींची आठवण केवळ मतांकरिताच होते का?- सचिन सावंत यांचा सवाल

मुंबई: प्रतिनिधी

मराठा आरक्षण प्रश्नावर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चारवेळा भेटण्याची वेळ मागितली, परंतु आजपर्यंत मोदींनी त्यांना वेळच दिली नाही. चित्रपट अभिनेत्री प्रियांका चोप्रा, कंगना राणावत व इतर बॉलिवूड अभिनेत्यांना भेट देतात. या सर्व तारकांचे कोणते गहन प्रश्न होते त्यांना मोदींनी वेळ दिला आणि मराठा आरक्षणाकरिता भेट मागणाऱ्या छत्रपती संभाजीराजेंना भेटायला त्यांच्याकडे वेळ नाही. संभाजीराजेंना भेट न देणे हा महाराष्ट्राचा अवमान आहे. नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाला छत्रपतींची आठवण केवळ निवडणुकीच्या वेळीच येते का, असा सवाल काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला.

मोदींनी कोणाला भेटावे हा त्यांचा प्रश्न असल्याने आमचा आक्षेप नाही. पण मराठा समाजाच्या समस्या घेऊन जाणाऱ्या आपल्याच पक्षाच्या नेत्यांना व तेही छत्रपतींच्या वंशजाला भेट न देणे हे महाराष्ट्राला कदापि आवडणार नाही. महाराष्ट्रातील बॉलिवूडबद्दल मोदींना अधिक माहिती आहे. पण मराठा आरक्षणाबाबत त्यांना माहिती नाही हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे म्हणणे मराठा आरक्षणासाठी ५८ मोर्चे काढून इतिहास रचणा-या आंदोलकांच्या जखमांवर मीठ चोळणारे तसेच मराठा आरक्षणासाठी शहिद झालेल्यांचा घोर अपमान करणारे आहे. चंद्रकांत पाटील हे मनकवडे आहेत असे दिसते. मनकवड्या चंद्रकांत पाटील यांनी मोदींना मराठा आरक्षण राज्याचा विषय वाटल्याने संभाजीराजे यांना मोदींनी भेट दिली नसल्याचे सांगितल्याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली.

त्यांच्या वक्तव्यातून त्यांनी तीन गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. मोदींची विषयांची समज फार कमी आहे. मोदींना मराठा आरक्षण हा विषय समजलाच नाही आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या नावातील छत्रपती या उपाधीची केवळ मतांकरिता वापरण्या इतपतच मोदींच्या लेखी किंमत आहे असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

मराठा आरक्षणाचा मुद्दा केंद्र सरकारच्या अखत्यारित असतानाही भाजपाकडून त्यावर राजकारण केले जात आहे. राज्य सरकारवर सर्व ढकलून राज्यातील भाजपा नेते नरेंद्र मोदी यांचा बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. मुळात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची विचारधारा ही आरक्षणविरोधी आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी जर भाजपाची प्रामाणिक इच्छा असती तर पाच वर्ष महाराष्ट्रात तसेच केंद्रातही सत्ता असताना ‘फुलप्रुफ’ आरक्षण देता आले असते. पण सर्वोच्च न्यायालयाने फडणवीस सरकारने दिलेले आरक्षण किती ‘फुलप्रुफ’ होते हे दाखवून दिले आहे, असा उपरोधिक चिमटाही त्यांनी काढला.

Check Also

सहकारी संस्थांच्या बैठक मुदतवाढीसह हे प्रमुख निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतले ओबीसींच्या अध्यादेशाचा प्रस्ताव पुन्हा पाठविणार

मुंबई: प्रतिनिधी ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणासंबधी काढवयाच्या अध्यादेशाचा प्रस्ताव पुन्हा राज्य सरकारकडून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *