Breaking News

मदत न करणाऱ्या सरकारची कोणतीही बीले भरू नका जनआक्रोश मोर्चाच्या सभेत शरद पवारांचे शेतकऱ्यांना आवाहन

नागपूर : प्रतिनिधी

महाराष्ट्रासह देशभरातील शेतकऱ्यांच्या शेती मालाला हमी भाव देण्याची घोषणा देत सत्तेवर आलेल्या सरकारला शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या तरी तातडीने मदत करावीशी वाटत नाही. कर्जमाफी दिल्याशिवाय राहणार नाही अशी घोषणा दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करूनही शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असतानाही त्यांच्याकडून अद्याप कर्जमाफी दिलेली नाही. यांच्या हृदयाला पाझर कसा फुटत नाही असा सवाल करत शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असतानाही भाजप सरकारकडून कोणतीही मदत दिली जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोसायट्यांची बीले, वीज बीले यासह कोणतीही बिले भरून सरकारला मदत करू नका असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज शेतकऱ्यांना केले.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, रिपाई (कवाडे), मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासह समविचारी पक्षांच्यावतीने विधानभवनावर काढण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चाच्या समारोपावेळी शरद पवार बोलत होते. या मोर्चामध्ये लाखो शेतकरी सहभागी झाले होते. हा मोर्चा दिक्षाभूमी येथून लोकमत चौक मार्गे टी-कॉर्नर येथे आल्यानंतर त्याचे सभेत रूपांतर झाले. यावेळी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद, महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेश काँग्रेशचे अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, या यात्रेच्या मुख्य सुत्रधार खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह विधानसभा आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, धनंजय मुंडे यासह आजी-माजी आमदार, खासदार व वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यातील जनतेने या सरकारला कारभार करण्यासाठी निवडूण दिलेले आहे. त्यावर विरोधकांनी कोणते भाष्य केले तर सरकारकडून दमबाजी करण्यात येते. तुम्ही अशीच दमबाजी करत राहीलात तर निवडूण दिलेली जनताच तुम्हाला उघडून फेकून दिल्याशिवाय राहणार नसल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

कॉंग्रेसचे मणिशंकर अय्यर यांच्या घरी देशाचे माजी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि माजी सेनाप्रमुखांची बैठक झाली. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीचा उल्लेख करत गुजरातचा मुख्यमंत्री पाकिस्तानच्या सहाय्याने ठरविण्यासाठी ही बैठक झाल्याची टीप्पणी केली. खरे तर असे बोलताना लाज वाटायला पाहिजे अशा शब्दात शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल चढविला.

तसेच हा जनआक्रोश गल्ली गल्लीत आणि घराघरात नेवून पोहचविण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद म्हणाले की, हे सरकार फसवे सरकार असून या सरकारला फक्त घोषणा करायला येतात आणि ते सोयीस्करपणे विसरता ही येतात. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ५६ इंचाची छाती नव्हे तर ५६ कि.मी लांबीचे मन हवेय जेणे करून शेतकऱ्यांना कर्जमाफी देवून त्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी, मात्र या सरकारकडे ते मन नाही. पंतप्रधान एक तर टीव्ही वर दिसतात, किंवा परदेशी दौऱ््यावर जातात, किंवा निवडणूका लढविण्यासाठी राज्यभर फिरत असतात. ते पंतप्रधानाच्या खुर्चीत कधी असतात असा उपरोधिक सवाल उपस्थित करत भाजप आणि मोदींवर टीका केली.

Check Also

जयराम रमेश यांचे भाकित, मतदानाचे संकेत स्पष्ट, मोदी सरकारला निरोप…

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील १०२ जागांवर झालेले मतदान हे भाजपा व नरेंद्र मोदी सरकारचे शेवटचे दिवस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *