Breaking News

विरोधकांकडून टीका तर राज्य सरकारकडून स्वागत

निरर्थक संकल्प असल्याची विखे पाटील यांची टीका तर मुख्यमंत्र्याकडून अभिनंदन

मुंबई : प्रतिनिधी

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पराभवाचा अनर्थ टाळण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आज निरर्थक संकल्प मांडला असून, हा भाजपचा जुमलेबाज जाहीरनामाच असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

शुक्रवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली. मागील ५ वर्षात या सरकारला काहीही करता आले नाही. या सरकारने यापूर्वी ५ पूर्ण अर्थसंकल्प मांडले. पण त्यातील घोषणा प्रत्यक्षात उतरल्या नाहीत. त्यामुळे लोकांचा भ्रमनिरास झालेला असून, पुढील निवडणुकीत ते आपल्याला मतदान करणार नाहीत, याची जाणीव सरकारला झाल्याने या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून लोकप्रिय घोषणा करून मते मिळवण्याचा, लोकांमधील असंतोष कमी करण्याचा आणि स्वप्नरंजन करून आगामी निवडणुकीतील आपला पराभव टाळण्यासाठी केलेली शेवटची धडपड करण्यात आली आहे. पण निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेल्या अशा घोषणांना जनता थारा देत नाही, हे सरकारने लक्षात ठेवावे.

शेतकरी-कष्टकरी, महिला आणि मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा-मुख्यमंत्री

 देशातील सर्वसामान्य माणूस हाच केंद्रबिंदू ठेवून केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा अशा घटकांचे जीवनमान उंचावण्यासाठीच्या प्रामाणिक प्रयत्नांचा जाहीरनामाच आहे. तसेच शेतकरी-कष्टकरी, मध्यमवर्गीय नोकरदार, महिला आणि ग्रामीण जनतेच्या विकासाशी असलेली सरकारची बांधिलकीच त्यातून प्रतिबिंबित होत आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

 या लोककल्याणकारी अर्थसंकल्पाचे स्वागत करताना मुख्यमंत्री म्हणतात, असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी तीन हजार रुपये पेन्शन असो किंवा शेतकऱ्यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपयांचे अर्थसहाय्य, अशा निर्णयातून देशातील सरकारने सर्वसामान्य घटकांच्या उत्थानातून आणखी एक पाऊल पुढे टाकण्याचा निर्धार केल्याचे दिसून येत आहे. आयकर उत्पन्नाची मर्यादा पाच लाखापर्यंत वाढविल्यामुळे नोकरदार वर्गाला मोठा दिलासा मिळाला असून देशाच्या विकासात योगदान देतानाच ते अधिकाधिक बचतही करु शकतील. महिलांना ८ कोटी एलपीजी जोडणी मोफत देण्याच्या योजनेचा आतापर्यंत ६ कोटी महिलांना लाभ झाला असून मार्च अखेरपर्यंत उर्वरित दोन कोटी जोडण्या दिल्या जातील. प्रसुती रजेचा कालावधी २६ आठवडे करण्याच्या निर्णयातून माता आणि बालसंगोपनाबाबतची सरकारची कटिबद्धता सिद्ध झाली आहे. मुद्रा योजनेचा ७५ टक्के महिलांनी घेतलेला लाभ ही अभिमानास्पद बाब असून समाजातील तळागाळातील घटकांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचावा यासाठी निती आयोगाच्या समितीची स्थापना निश्चितच परिणामकारक ठरेल, अशा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

शेतकरी, कष्टकरी, मध्यमवर्गीयांसह सर्वांना समाधान देणारा अर्थसंकल्प– खा.दानवे

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मांडलेला अंतरिम अर्थसंकल्प शेतकरी, कष्टकरी, मध्यवर्गीय अशा सर्व समाज घटकांना समाधान देणारा असून आपण त्याचे स्वागत करतो. हा अर्थसंकल्प ‘नवा भारत’ निर्माण करण्यासाठी सर्व समाजाला शक्ती देणारा आहे,अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी शुक्रवारी व्यक्त केली.

 या अंतरिम अर्थसंकल्पाबद्दल आपण केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांचे अभिनंदन करतो. पाच एकरापर्यंत शेती असलेल्या छोट्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये थेट देण्याची योजना ऐतिहासिक आहे. या योजनेसाठी मोदी सरकारने ७५,००० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. दरवर्षी शेतीच्या बियाणे, खते अशा साधनांसाठी शेतकऱ्यांना हे पैसे उपयोगी पडणार असून त्यामुळे त्यांना सावकाराकडे जावे लागणार नाही. शेतकऱ्यांना व्याजात सवलत,कामधेनू आयोगाची स्थापना, पशूपालनाला प्रोत्साहन असे शेतकरी कल्याणाचे अनेक निर्णय या अर्थसंकल्पात आहेत. शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी मोदी सरकारने स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार दीडपट भावासह अनेक महत्त्वाचे निर्णय यापूर्वी घेतल्याचे त्यांनी सांगितले.

चार वर्षातली पापं धूवून टाकण्यात अंतिम अर्थसंकल्पातही सपशेल अपयश-मुंडे

मोदी सरकारनं आज सादर केलेला अर्थसंकल्प ‘चुनावी जुमला’ असून गेल्या चार वर्षातली पापं धूवून टाकण्यात हा अर्थसंकल्प सपशेल अपयशी ठरला आहे. हा अर्थसंकल्प मोदी सरकारचा ‘अंतिम’ अर्थसंकल्प आहे, अशी टिका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. 

सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंबंधीत कोणतीच घोषणा नाही. दीडपट हमीभाव देण्यासाठी तरतूद नाही. भावांतर योजना नाही. नाशवंत पिकासाठी कोणतेच संरक्षण नाही. उलट महिन्याला ५०० रूपये देऊन शेतकऱ्यांची चेष्टा करण्याचे काम या सरकारने केल्याचा आरोप त्यांनी केला.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *