Breaking News

आता कॉंग्रेसची २८८ मतदारसंघात जनआक्रोश यात्रा काँग्रेसच्या सर्व नेत्यांच्या उपस्थितीत यात्रेचा कोल्हापूरात शुमारंभ

मुंबई : प्रतिनिधी

गुजरात विधानसभेच्या निवडणूकीत काँग्रेसला मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही त्याची पुन:रावृत्ती करण्याच्या उद्देशाने राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात राज्य सरकारच्या विरोधात जनआक्रोश यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेचा शुमारंभ कोल्हापूरातून नवीन वर्षातील जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात येणार असून पाच टप्प्यात ही यात्रा होणार असल्याची माहिती काँग्रेसच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली.

हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने जनआक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते. त्यास विदर्भातील जनतेने मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला. त्यामुळे हा प्रतिसाद कायम ठेवण्यासाठी आणि राज्य सरकारच्या शेतकरी आणि फसव्या घोषणांच्या विरोधात जनतेत जनजागृती करण्यासाठी ही यात्रा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणार आहे. या यात्रेमध्ये राज्यातील काँग्रेसचे जवळपास सर्वच नेते सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या यात्रेचा पहिला टप्पा कोल्हापूरातून सुरू होवून पश्चिम महाराष्ट्रातील जवळपास सर्वच मतदारसंघात फिरत त्याचा शेवट पुणे येथे होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तर या यात्रेचा दुसरा टप्पा मराठवाड्यातून सुरु होवून उत्तर महाराष्ट्रात शेवट होणार आहे. त्यानंतर विदर्भ आणि कोकणातही ही यात्रा काढण्यात येणार असून या यात्रेमध्ये स्थानिक नेत्यांसह सर्वच राज्यस्तरीय नेते सहभागी होणार आहेत. तसेच या यात्रेच्या निमित्ताने राज्यातील गट-तटाच्या राजकारणालाही मुठमाती देण्याचा प्रयत्न करून सर्व कार्यकर्त्ये यांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही अन्य एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

याबाबत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *