Breaking News

काँग्रेस म्हणते, आता मुख्यमंत्र्यांनीच अधिकृत घोषणा करावी मोफत लसीकरणावरून श्रेयवादाची लढाई अयोग्य: बाळासाहेब थोरात

मुंबई: प्रतिनिधी

राज्यातील जनतेचे कोरोनापासून संरक्षण करण्याच्यादृष्टीकोनातून मोफत लस देण्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांनी जाहिर यांनी करताच शिवसेना नेते तथा मंत्री आदित्य ठाकरे यांनी यांनी यासंदर्भात राज्य सरकारकडून योग्य तो निर्णय जाहिर करणार असल्याचे ट्विट करत अंतिम निर्णय झाले नसल्याचे स्पष्ट केले. तर मोफत लस देण्याची काँग्रेसची भूमिका असून यासंदर्भात आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीच अधिकृत घोषणा करावी अशी मागणी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज केली.

कोरोनावर लस हीच प्रभावी असून वाढती कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणायची असेल तर मोफत लसीकरण मोहिम व्यापक प्रमाणात राबविणे हाच त्यावरचा उपाय आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी तसेच राहुलजी गांधी यांनी कोरोना लस मोफत दिली पाहिजे अशी मागणी केली असून काँग्रेस पक्षाची तीच भूमिका असून महाराष्ट्रातही सर्वांना सरसकट मोफत कोरोना प्रतिबंधक लस द्यावी, अशी आग्रही मागणी मुख्यमंत्र्यांकडे काँग्रेसने केल्याचे ते म्हणाले.

कोरोना लसीसंदर्भात काँग्रेस पक्षाची भूमिका पहिल्यापासून स्पष्ट आहे ती म्हणजे लस ही मोफतच दिली पाहिजे. याविषयी मुख्यमंत्र्यांकडे काँग्रेसने मागणी केलेली असताना मोफत लसींवरून श्रेयाची लढाई सुरू होणे हे योग्य नाही, तसेच काँग्रेसला ते आवडलेले नाही. केंद्र सरकारने लसींचा पुरेसा साठा उपलब्ध होईल याचे नियोजन केले पाहिजे. १८ वर्षांवरील सर्वांना १ मेपासून कोरोना लस दिली जाणार आहे, या पार्श्वभूमीवर धोरण ठरवण्याची गरज आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देताना सुरुवातीला गर्दी झाली, गोंधळ झाला. १८ ते ४४ या वयोगटातील लोकसंख्या पाहता निश्चित धोरण जाहीर केले नाही तर गर्दी होऊन कोरोनाचा प्रसार वाढण्याची शक्यता आहे. मुख्य सचिवांबरोबर याविषयी आपली चर्चा झाली असून दोन तीन दिवसात यासंदर्भात धोरण निश्चित होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

काँग्रेस नेते तथा मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आता मुख्यमंत्र्यांनीच अधिकृत घोषणा करण्याची मागणी केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी केलेली घोषणा आता अधिकृत घोषणा नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच मोफत लस घोषणेचे श्रेय राष्ट्रवादी काँग्रेसच्या या प्रयत्नास काँग्रेसने हाणून पाडण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येत आहे. मात्र राज्यातील जनतेला मोफत लस देण्याची मागणी सर्वप्रथम काँग्रेसच्यावतीनेच करण्यात आली होती.

Check Also

फणसळकर यांच्यासह तीन आयपीएस अधिकाऱ्यांना पदोन्नती संचालक पदांवर नियुक्त्या देण्यात आल्या

मुंबई : प्रतिनिधी ठाणे पोलिस आयुक्त व्ही.व्ही.फणसळकर यांना पदोन्नती देत महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *