Breaking News

… डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शब्द खरे ठरतायत : मल्लीकार्जून खरगे फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचा वारसाच देशाला तारणार : नाना पटोले

मुंबई: प्रतिनिधी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिवसरात्र एक करून देशाला जगातील सर्वश्रेष्ठ संविधान दिले. परंतु आज लोकशाही व संविधान धोक्यात आले आहे. विद्यमान सत्ताधा-यांकडून लोकशाही व संविधानाला पायदळी तुडवून राज्य कारभार सुरु आहे. मागील काही वर्षात दलित, अल्पसंख्यांकांवर अत्याचार वाढले आहेत. प्रसार माध्यमांनाही बोलण्याची मोकळीक नाही. सीबीआय, ईडी, निवडणूक आयोग अशा सर्व स्वायत्त संस्थांचा दुरुपयोग वाढला आहे. सरकारच्या विरोधात बोलले की चौकशी लावली जाते. आंदोलन केले तर बदनाम केले जाते. भाजपा-आरएसएस हे समाजात विद्वेषाचे बिज पेरून धर्माच्या, जातीच्या नावावर फूट पाडण्याचे काम करत आहेत. आता लोकशाही व संविधान रक्षणाची जबाबदारी आपल्यावर आली आहे. “अनियंत्रित लोकशाही हुकूमशाहीला जन्म देते” हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शब्द आज खरे ठरत आहेत, असे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे यांनी म्हटले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व मुंबई विभागीय काँग्रेसच्या वतीने आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी व्हर्च्युअल सभेचे आयोजन केले होते. यावेळी खरगे बोलत होते. ही व्हर्च्युअल अभिवादन सभा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते खा. मल्लिकार्जुन खरगे, राज्याचे प्रभारी एच. के. पाटील, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक प्रमुख पाहुणे होते तर विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, मत्ससंवर्धन मंत्री अस्लम शेख, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, बस्वराज पाटील, माजी खा. संजय निरुपम, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव सोनल पटेल, आशीष दुआ, वामसी रेड्डी, संपतकुमार, बी. एम. संदीप, विजय अंभोरे, मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणजित सप्रा, डॉ. संजय लाखे पाटील, देवानंद पवार आदी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि काँग्रेस पक्षाचे विचार एकच असून समाजातील दलित, आदिवासी, शोषीत समाज व महिलांच्या कल्याणासाठी काम करण्याचा हा विचार आहे. आंबेडकरांचा पक्ष आणि काँग्रेस हे दोन्ही भिन्न पक्ष होते पण त्यांची विचारधारा मात्र समान होती. समाजातील शोषीत घटकांच्या कल्याणासाठी त्यांनी काम केले. बाबासाहेबांनी देशाला दिलेले संविधान बदलण्याचे काम सध्याचे सरकार करत आहे परंतु रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत संविधानाचे रक्षण करु असा निर्धार काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के पाटील यांनी व्यक्त केला.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावेळी म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक धोरण हे देशातील शोषित, वंचित, पददलित समाजाला न्याय देणारे होते परंतु दुर्दैवाने आज केंद्रातील सरकार हे देशातील मुठभर लोकांसाठीच आर्थिक धोरणे राबवत आहे. फुले, शाहु, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसाच देशाला तारणारा असून हा विचार राज्यात यापुढेही रुजवू आणि देशाला तोडू पाहणारा विचार नष्ट करण्याचे काम करु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान संपुष्टात आणू पाहणाऱ्या भाजपा-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ते काम करु देणार नाही, लोकशाही व संविधानाचे रक्षण करु. 

माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा काँग्रेस पक्ष पुढे घेऊन जात आहे तर दुसरीकडे भाजपा जातीयवादावर आधारीत भूमिका मांडून वेगळा समाज निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. डॉ. बाबासाहेबांचे अपूर्ण राहिलेले काम आपल्याला पूर्ण करायचे आहे. डॉ. आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने रक्तदान शिबिर आयोजित केले हे अत्यंत कौतुकास्पद आहे.

बाबासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी विविध उपक्रम राबविले पाहिजेत. भावी पिढीला हे विचार मिळाले तर लोकशाही आणखी मजबूत होईल अशी आशा काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी व्यक्त केली.

विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की, आपल्याबरोबर स्वतंत्र झालेल्या देशातील लोकशाही संपली पण आपली लोकशाही अजून भक्कमपणे टिकून आहे. महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारामुळेच देश आजही भक्कमपणे उभा आहे. घटनेतील समतेचे मूलभूत तत्व ही वस्तुस्थिती आपण मान्य केली असून राज्यघटनेतील मुलभत तत्वे जपण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. या शास्वत तत्वाला ताकद देण्याचे काम आपल्या सर्वांना करावे लागेल. डॉ. बाबासाहेबांचा विचार तरुणांपुढे पोहचवण्याचे काम आपणास करावे लागणार आहे.

व्हर्च्युअल सभेच्या आधी राज्यव्यापी रक्तदान शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा, तालुका, ब्लॉक स्तरावर हा ‘रक्तदान सप्ताह’ सुरु राहणार आहे. मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघातही हे रक्तदान शिबीर होत आहे. राज्यभरात आयोजित शिबिरांमधून २ लाख रक्त पिशव्या संकलीत करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. संकलित केलेले सर्व रक्त शासनाच्या रक्तपेढ्यांना दिले जाणार आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे यांनी केले. तत्पूर्वी सकाळी चैत्यभूमीला जाऊन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

नालंदा हॉल चेंबूर येथे आज सांगली, सातारा, पुणे या जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

Check Also

कोकण-पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना केंद्र सरकारने दिला दिलासा पुन्हा होणार JEE-Main ची परिक्षा-शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी अतिवृष्टीमुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पूर आणि दरड  कोसळण्याच्या घटना घडल्या. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *