Breaking News

भाजपा म्हणते, काँग्रेसने किमान स्वत:ची कागदपत्र तरी नीट वाचावित ती स्थानबद्धता केंद्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार-केशव उपाध्ये

मुंबईः प्रतिनिधी
स्थानबध्द केंद्र निर्माण करण्यासाठी काँग्रेसने जारी केलेली कागदपत्रे आधी त्यांनीच आधी नीट वाचायला हवीत असा खोचक सल्ला भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी देत काँग्रेसचे प्रवक्ते हे आपल्या सोयीची कागदपत्र वापरून बेताल वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध असल्याची टीका त्यांनी केली.
काँग्रेसच्या अशा बेताल वक्तव्यांना भारतीय जनता पार्टीने वारंवार उघडे पाडले आहे. ज्या स्थानबद्धता केद्रांवरून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खोटे ठरवित आहेत, त्यासंदर्भातील आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यांनीच स्वत:च जारी केलेल्या गृहविभागाच्या पत्रातील तिसर्‍या ओळीत हे स्पष्टपणे नमूद केल्याचे त्यांनी सांगितले.
गृह विभागाने 16 ऑगस्ट 2019 रोजी एक पत्र सिडकोला पाठविले होते. या पत्रातच स्पष्ट करण्यात आले होते, की असे स्थानबद्धता केंद्र (डिटेन्शन सेंटर्स) उघडणे हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बंधनकारक आहे. कारागृहातून शिक्षा भोगून मुक्त झालेल्या परंतु राष्ट्रीयत्त्व सिद्ध न झाल्याने परत पाठविणे प्रलंबित असलेल्या परदेशी नागरिकांना मायदेशी पाठविण्यापूर्वी योग्य नियंत्रित जागी ठेवणे आवश्यक असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात नोंदविले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर तशा सूचना सुद्धा गृहमंत्रालयाने जारी केल्या होत्या असे ते म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात त्याचे प्रयोजन स्पष्टपणे दिले असताना भलत्याच कागदपत्रांवरून थेट पंतप्रधानांवर आरोप करणे, हा फारच मोठा पोरकटपणा आहे. पंतप्रधानांनी जे विधान केले, त्याचा आणि या स्थानबद्धता केंद्रांचा काही एक संबंध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Check Also

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, कोल्हापूरकरांची पूर चिंता कायमची मिटणार

अतिवृष्टीमुळे कोल्हापूरात येणाऱ्या महापुराबाबत कायमस्वरुपी तोडगा काढणारा ३५०० कोटींचा कृती आराखडा राज्य सरकारने मंजुर केला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *