Breaking News

यात्रा काढा; पण राजधर्म विसरू नका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा उपरोधिक सल्ला

मुंबई : प्रतिनिधी
मते मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हव्या तेवढ्या यात्रा काढाव्यात. पण यात्रेच्या नादात राजधर्म विसरून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नये. आणखी कोणत्याही शेतकऱ्यावर धर्मा पाटील होण्याची दुर्दैवी वेळ आणू नका असा उपरोधिक सल्ला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राज्य सरकारला दिला.
मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा अकोल्यात येण्याच्या आदल्याच दिवशी जिल्ह्यातील सहा शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. सरकारी अनास्थेमुळे या सहा शेतकऱ्यांना हे टोकाचे पाऊल उचलावे लागल्याने मुख्यमंत्री या सहा शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना न्याय मिळवून देतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी इतक्या गंभीर घटनेची साधी दखलही न घेता आणि या शेतकऱ्यांना न भेटताच अकोला दौरा आटोपता घेतल्याच्या कृत्याची त्यांनी निषेध केला.
राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण पूर परिस्थिती असताना महाजनादेश यात्रा काढून लोकांकडे मते मागायला मुख्यमंत्र्यांकडे वेळ आहे. मात्र सरकारी अनास्थेमुळे आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घ्यायला त्यांच्याकडे वेळ नाही. अकोल्यात आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये मुरलीधर राऊत यांचा समावेश होता. याच मुरलीधर राऊत यांनी नोटबंदीच्या काळात प्रवाशांकडे पैसे नसताना त्यांच्या विनाशुल्क जेवणाची व्यवस्था केली होती. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’कार्यक्रमात त्यांचे जाहीर कौतुक केले होते. त्याच शेतकऱ्यावर भाजप सरकारच्या काळात शासकीय अनास्थेमुळे आत्महत्येची वेळ येते, हे लाजीरवाणे असल्याची टीकाही त्यांनी केली.
आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या या सहा शेतकऱ्यात दीड वर्षापूर्वी आत्महत्या केलेले शेतकरी भारत टकले यांच्या पत्नी अर्चना टकले यांचाही समावेश होता. मुख्यमंत्री काल अकोल्यात होते. त्यामुळे त्यांनी मुरलीधर राऊत आणि अर्चना टकलेसह त्या सहाही शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली जात होती. पण मुख्यमंत्र्यांनी त्यांची साधी दखलही घेऊ नये, हे दुर्दैवी असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
जमीन अधिग्रहणात योग्य मोबदला न मिळाल्यामुळे धुळे जिल्ह्यातील वयोवृद्ध शेतकरी धर्मा पाटील यांनी आत्महत्या केली होती. शेजारच्या जमिनीच्या मालकाचे मंत्र्याशी लागेबांधे आहेत म्हणून त्याला जास्त पैसे मिळाल्याची तक्रार धर्मा पाटील यांनी केली होती. तोच प्रकार अकोल्यात घडला आहे. ज्यांचे अकोल्याच्या पालकमंत्र्यांशी संबंध आहेत, त्यांना जमिनीचा जास्त मोबदला मिळाला. नांदेड जिल्ह्यातही अनेक शेतकऱ्यांची हीच तक्रार आहे. हदगाव, अर्धापूर, लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी राष्ट्रीय महामार्गात गेल्या आहेत. त्यांना मिळालेला मोबदला अतिशय कमी आहे. वाढीव मोबदला मिळावा म्हणून ते शेतकरी आणि मी दोन वर्षांपासून पाठपुरावा करतो आहे. पण सरकारने अजून अंतिम निर्णय घेतलेला नसल्याच्या गोष्टीकडेही त्यांनी यावेळी लक्ष वेधले.

Check Also

केंद्र सरकार शेतकऱ्यांचे उभे पीक आणि आयुष्य उध्वस्त करणाऱ्या रानडुकरासारखे शिवसेना प्रवक्ते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचा गड़करींना टोला

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील आघाडी सरकारला बैलाची उपमा देवून स्वतःची कातडी वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *