Breaking News

२०१९ मध्ये केंद्र आणि महाराष्ट्रातून भाजपची घरवापसी निश्चित काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचा विश्वास

मुंबई : प्रतिनिधी

मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने भाजपचा पराभव करून तीनही राज्यात विजय मिळवला आहे. हा भाजपच्या धनशक्तीवर जनशक्तीचा विजय असून लोकसभा निवडणुकीत भाजपची घरवापसी निश्चित असून देशात राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे सरकार सत्तेवर येईल असा दृढ विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.

विधानसभा निवडणुकांच्या निकालात काँग्रेस पक्षाने आघाडी घेतल्यानंतर गांधीभवन येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके फोडून ढोल ताशांच्या गजरात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. त्यानंतर गांधीभवन येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

या निवडणुकीत जनतेने तीनही राज्यातील लोकविरोधी भाजपचा पराभव केला आहे. भाजपने फार मोठ्या प्रमाणात सत्ता व पैशाचा गैरवापर केला. पण या निकालाच्या माध्यमातून हुकुमशाही पद्धतीने वागणा-या केंद्र सरकारला जनतेने मोदीजी जानेवाले है.. राहुलजी आनेवाले है.. असे सुनावल्याचे त्यांनी सांगितले.

महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी, महिला, दलित, अल्पसंख्यांकांवरील अत्याचार या सर्वच बाबतीत केंद्रातील आणि विविध राज्यातील भाजप सरकारे अपयशी ठरली आहेत. भाजपची सरकारी जनतेसाठी नाही तर देशातील काही मोजक्या उद्योगपतींसाठी काम करत आहेत. त्यामुळेच या तीनही राज्यातील लोकविरोधी सरकारांचा पराभव जनतेने केला आहे. हा धनशक्तीवर जनशक्तीचा विजय आहे. हुकुमशाहीवर लोकशाहीचा विजय आहे. तिरस्कारावर प्रेमाचा विजय आहे. अहंकारावर नम्रतेचा विजय आहे. धर्मांध जातीयवादी विचारधारेवर धर्मनिरपेक्षतेचा विजय आहे. भांडवलदारांवरासाठी काम करणा-या भाजप सरकारविरोधात शेतकरी, कष्टकरी, तरूण, सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या संघर्षाचा विजय असल्याचे ते म्हणाले.

नोटाबंदीसारखे तुघलकी निर्णय घेऊन भाजप सरकारने अर्थव्यवस्थेचे वाटोळे केले आहे. चुकीच्या पद्धतीने केलेल्या जीएसटीच्या अंमलबजावणीमुळे व्यापारी संकटात आहेत. शेतक-यांच्या मालाला भाव नाही. तरूणांच्या हाताला काम नाही. महिला, मुली सुरक्षित नाहीत. भाजपाने निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. त्यामुळे भाजपलने आपल्याला फसवले आहे. आपला विश्वासघात केला आहे अशी देशातील जनतेची भावना आहे. त्यामुळेच देशातील जनतेने नरेंद्र मोदी यांच्या अहंकारी नेतृत्वाखालील भाजपला पराभूत करून विनम्र राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला विजयी केले आहे. विजयाबद्दल खा. चव्हाण यांनी मतदारांचे आभार मानले.

आजच्या निकालातून देशाच्या पुढील राजकीय वाटचालीची दिशा स्पष्ट झाली आहे. राज्यातील फडणवीस सरकारचे अवघे काही महिने राहिले असून महाराष्ट्रातही आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली लोकविरोधी फडणवीस सरकारला सत्तेवरून खाली खेचून शेतकरी, कष्टकरी, महिला, तरूण, वंचितांच्या हितासाठी काम करणारे काँग्रेसचे सरकार येईल असा दृढ विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *