Breaking News

शरद पवारांनी बोलाविलेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत या मुद्यांवर झाली चर्चा विद्यमान आमदारांमध्ये कामे होत नसल्यावरून नाराजी

मुंबईः प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून काही काळासाठी पुढे ढकलण्यात आलेल्या असल्या तरी त्या निवडणूका फार काळ लांबविता येणार नाही. त्यामुळे उद्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे जर तातडीने निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर करावा लागला तर ओबीसीच्या जागेवर ओबीसीचाच उमेदवार देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती या बैठकीस उपस्थित असलेल्या एका माजी आमदाराने दिली.
राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी-माजी आमदार, खासदारांची आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीचे आयोजन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण मध्ये आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीला सर्वांची एकदम उपस्थिती होवून गर्दी होवू नये यासाठी विभागवार बैठकांचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
जवळपास १५-२० वर्षापासून राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका या काँग्रेस पक्षाबरोबर आघाडी करून लढविण्यात आल्या. मात्र तरीही काँग्रेस राष्ट्रवावादीला शत्रु मानत असल्याचा सूर काही जणांनी या बैठकीत मांडल्याचे सांगत शिवसेना आणि काँग्रेसचे मंत्री राष्ट्रवादीच्या आमदारांची कामे करत नसल्याबाबतचा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आल्याची माहिती अन्य एका माजी आमदाराने यावेळी दिली.
या नाराजीला पक्षाचे प्रमुख प्रवक्ते नवाब मलिक यांनीही दुजोरा दिला आहे. तीन पक्षाचे सरकार असताना प्रत्येक पक्ष आपल्या आमदारांना झुकतं माप देतो. दोन पक्षांचं सरकार होतं तेव्हाही अशा तक्रारी होत्या. एक पक्षाचं सरकार असलं तरी नाराजी असतेच. आमदारांची सर्व काम होतीलच असे नाही.
साडे पाच तास चाललेल्या या बैठकीत ५५ जणांनी आपली मते मांडली. विशेषतः जिल्ह्यातील परिस्थिती, तिथली प्रलंबित विकास कामे, त्याचा पाठपुरावा आणि जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीवर या बैठकीत चर्चा झाली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक परिस्थितीनुसार आघाडी वा युती करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला. यावेळी राज्यातील जास्तीत जास्त स्थानिक स्वराज्य संस्थांवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता स्थापन करण्याच्या निश्चियाने काम करण्याचे आणि घरोघरी राष्ट्रवादी पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. तसेच या आगामी निवडणूकीत महाविकास आघाडीमधील सहकारी पक्षांबरोबर कमीत कमी संघर्ष राहील आणि कटुता वाढणार नाही यादृष्टीने योग्य काळजी घेण्याचे संकेतही या बैठकीत सर्वांना देण्यात आले.

Check Also

अमित शाह यांची घोषणा, सत्तेवर येताच संपूर्ण देशात समान नागरी कायदा

संपूर्ण देशात समान नागरी कायदा, एकाच वेळी लोकसभा-विधानसभा निवडणुका, ७० वर्षावरील प्रत्येक नागरीकास पाच लाखापर्यंत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *