Breaking News

विरोधकांवर पलटवार करत मुख्यमंत्र्यांचे कोकणवासियांना आश्वासन संपूर्ण आढावा घेऊन नुकसानग्रस्तांना मदत करणार, कोणीही वंचित राहणार नाही

रत्नागिरी : प्रतिनिधी

तौक्ते चक्रिवादळामुळे झालेल्या कोकणात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मी वैफल्यग्रस्त नसल्याचा टोला लगावला तर सिंधुदूर्गात विशेषत: मालवणमध्ये आपण फक्त फोटो काढण्यासाठी आलेलो नसल्याचे सांगत विरोधकांच्या टीकेला प्रतित्तुर देत चक्रिवादळामुळे बाधित झालेल्या प्रत्येकाला नुकसान भरपाई देणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाधितांना आज दिले.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील चक्रिवादळग्रस्त भागाची पाहणी केली.

तौक्ते चक्रीवादळाने नेमके किती नुकसान झाले याबाबतचे पंचनामे पूर्ण होवू द्या, संपूर्ण आढावा घेऊन व्यवस्थित मदत केली जाईल, कुणीही वंचित राहणार नसल्याचे आश्वासन रत्नागिरीवासियांना देत जिल्हयात या चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्र्यांनी एका बैठकीत आढावा घेतला. यावेळी रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री ॲङ अनिल परब, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व सिंधुदूर्ग जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत आदिंची प्रमुख उपस्थिती होती.

तौक्ते चक्रीवादळाने जिल्हयातील ५ तालुक्यात मोठया प्रमाणात नुकसान झाले.  यात अधिक नुकसान राजापूर व रत्नागिरी तालुक्यात आहे.

जिल्हयात चक्रीवादळाने आंबा आणि काजू तसेच नारळाच्या बागांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर  पंचनामा योग्य पध्दतीने करुन नेमेकेपणाने आकडेवारी सह प्रस्ताव सादर करा असे निर्देश मुख्यमंत्री महोदयांनी या बैठकीनंतर अधिकाऱ्यांशी बोलताना दिले.

कोव्हीड आढावा

या वेळी जिल्हयातील कोव्हीड परिस्थितीचाही आढावा याच बैठकीत घेण्यात आला. रुग्णांना चांगली उपचार सुविधा आपण देत आहोत. सोबतच रुग्णसंख्या प्रामुख्याने मृत्यूचे प्रमाण कमी होईल या दृष्टिकोनातून  सर्वांनी प्रयत्न करावेत असे ते म्हणाले.

दुसऱ्या लाटेनंतर तिसरी लाट येईल असे म्हटले जात असले तरी योग्य ती खबरदारी आणि उपाय योजल्याने आपण ती येणारच नाही यासाठी येणाऱ्या  काळात प्रयत्न करु असे मुख्यमंत्री म्हणाले. जिल्हयात सुरु असणारे लसीकरण आणि त्याबाबतीत इतर माहिती यावेळी सादर करण्यात आली.

मोठया प्रमाणावर नुकसान

जिल्हयात झालेल्या नुकसानीबाबत जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी यावेळी सादरीकरण केले. या चक्रीवादळात जिल्हयात २ जणांचा मृत्यू झाला असून ८ व्यक्ती जखमी झाल्या आहेत. मृत पशुधनाची संख्या ११ आहे. जिल्हयात १७ घरे पूर्णत: बाधित झाली असून  अंशत: बाधित घरांची संख्या ६७६६ आहे. यात सर्वाधित दापोलीत २२३५ आहेत. रत्नागिरी तालुक्यात १०८४ तर राजपूरातील ८९१ घरांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या गोठयांची जिल्हयातील ३७० इतकी आहे. वादळात वाऱ्यामुळे १०४२ झाले पडली. यात सर्वाधित ७९२ झाडे राजापूर तालुक्यात पडली. रत्नागिरीत ही संख्या २५० इतकी आहे. चक्रीवादळात ५९ दुकाने व टपऱ्यांचे नुकसान झाले. नुकसान झालेल्या शाळांची संख्या ५६ आहे. या सर्व शाळा राजापूर आहेत.

शेती

चक्रीवादळाने मोठया प्रमाणावर फळबागांचे नुकसान झाले. अंदाजे ११०० शेतकऱ्यांचे या साधारण २५०० हेक्टर इतके नुकसान झाले. यातील ३४३० शेतकऱ्यांच्या ८१०.३० हेक्टरवरील पंचनाम्यांचे काम आजपर्यंत पूर्ण झाले आहे.

वीज

चक्रीवादळाचा सर्वाधित फटका विद्युत वितरण कंपनीला बसला. यात १२३९ गावातील विद्युत पुरवठा पूर्णपणे बंद झाला होता. आतापर्यंत ११७९ गावांचा पुरवठा आता पूर्ववत झाला आहे. बाधित उपकेंद्राची संख्या ५५ व फिडरची संख्या २०६ आहे. याची दुरुस्ती देखील आता पूर्ण झाली आहे. वीज खांबाचेही मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. उच्चदाब वाहिनीचे ४८५ खांब बाधित झाले असून यापैकी १२५ पूर्ववत करण्यात आले. गावागावात पडलेल्या वीज खांबाची संख्या १२३३ इतकी आहे. यातील १३३ खांबांची उभारणी आतापर्यंत पूर्ण झाली आहे.

मत्स्य व्यवसाय

जिल्हयातील समुद्रकिनाऱ्यावर आश्रयास आलेल्या बोटींपैकी ३ बोटी पूर्णत: तर ६५ बोटींचे अशंत: नुकसान झाले. ७१ जाळयांचेही नुकसान झालेले आहे. अंदाजित नुकसान ९० लाख रुपयांपर्यंत आहे. या चक्रीवादळात जिल्हा परिषदेच्या ३०१ मालमत्ता बाधित झालेल्या आहे. अंदाजे १ कोटी ९८ लाख ८४ हजार पेक्षा जास्त अधिक नुकसान आहे.

ई-उद्घाटन

जिल्हा पोलिसांतर्फे सुसज्ज असे कोव्हीड केअर सेंटर उभारण्यात आले आहे.याचे ई-उद्घाटन याप्रसंगी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते झाले. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग यांनी केंद्राबाबत योवळी माहिती दिली तसेच  त्यावरील एक लघुपट यावेळी दाखवण्यात आला.

साधेपणाने बैठक

बैठकीसाठी व्यासपीठ उभारले असले तरी तेथे न जात मुख्यमंत्री महोदयांनी व्यासपीठा समोरील डी मध्ये खुर्च्या लावण्यास सांगितले व साधेपणाने सादरीकरण व अधिकाऱ्यांशी चर्चा केली. स्वागतासाठी हार – बुके देखील नको अशा सूचना दिलेल्या असल्याने साध्या पध्दतीनेचे पूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, आमदार राजन साळवी, माजी आमदार  हुस्नबानु खलिफे, जि.प. माजी अध्यक्ष रोहन बने, नगराध्यक्ष बंडया साळवी, मुख्य सचिव सीताराम कुंटे, विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, जिल्हा परिषद अध्यक्षा इन्दुराणी जाखड, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड आदि मान्यंवर उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी

सिंधुदुर्गनगरी-तौक्ते चक्रीवादळामुळे किनारपट्टी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पंचनामे पूर्ण होताच राज्यस्तरावर याबाबत आढावा घेवून नुकसानग्रस्तांना मदत जाहीर केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

तौक्ते चक्रीवादळामुळे मालवण येथे चिवला बीच  परिसरात झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्री  ठाकरे यांनी आज पाहणी केली. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, मालवण नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, मुख्य सचिव सीताराम कुंटे, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी उपस्थित होत्या.

तौक्ते चक्रीवादळाची तीव्रता अधिक होती. याचा मोठा फटका किनारपट्टी भागाला बसला आहे. या काळातही शासकीय यंत्रणेने धीरोदात्तपणे काम केले असून त्याबद्दल यंत्रणेस मी धन्यवाद देतो. यामध्ये जनतेचे सहकार्य चांगले मिळाले असल्याचे, मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे एक दोन दिवसात पूर्ण होतील. त्यानंतर राज्यस्तरावर आढावा घेवून नुकसानग्रस्तांना मदत जाहीर केली जाईल. तौक्ते चक्रीवादळामुळे ज्या ज्या घटकांचे नुकसान झाले आहे त्यांना मदत दिली जाईल. कोळी बांधव, मच्छीमार व्यावसायिक यांच्यासह कोणताही घटक वंचित राहणार नाही.  या आपत्तीच्या मदतीसाठी केंद्राकडून राज्याला जास्तीत जास्त मदत मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. बदलत्या हवामानामुळे समुद्रिय वादळांचा धोका वाढला आहे. भविष्यात वादळामुळे कमीतकमी नुकसान होईल याबाबत उपाययोजना केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांचा दिलासा

मालवण येथे त्यांनी ज्यांच्या घरांची पडझड झाली त्याविषयी माहिती घेतली व काही ठिकाणी झालेल्या नुकसानीची पाहणी करून त्यांना दिलासा दिला.

नुकसानग्रस्तांचे पंचनामे करून अहवाल तात्काळ सादर करा

सिंधुदुर्गनगरी – तौक्ते वादळामुळे झालेल्या फळबागा, झाडे, महावितरण, घरे अशा नुकसानग्रस्तांचे पंचनामे करुन तात्काळ अहवाल सादर करावा अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. वादळात झालेल्या नुकसानाबरोबरच भूमिगत विद्युत वाहिनी, धूप प्रतिबंधक बंधारे, चिपी विमानतळ याबाबतही मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला.

चिपी विमानतळ येथे झालेल्या आढावा बैठकीस पालकमंत्री उदय सामंत, परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित होते.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, वादळाची पूर्वसूचना मिळल्याबरोबर यंत्रणा कार्यान्वीत झाली होती. यावेळेला जास्त प्रमाणात नुकसान झाले आहे. अशाही परिस्थितीत कोविड रुग्णांचा ऑक्सिजन पुरवठा खंडित होऊ दिला नाही. त्याबद्दल धन्यवाद देतो. पंचनामे लवकर संपवून तात्काळ अहवाल पाठवावा, जेणेकरून कुणीही वंचित राहणार नाही, नुकसानग्रस्तांना मदत देण्याबाबत निर्णय घेतला जाईल. भूमिगत विद्युत वाहिनी, धूप प्रतिबंधक बंधारे याबाबतही आढावा घेऊन मुख्यमंत्री म्हणाले, जे प्रस्ताव केंद्राकडे आहेत त्याबाबत निश्चित पाठपुरावा केला जाईल. राज्यस्तरावरील  प्रस्तावांना मार्गी लावण्यात येईल. चिपी विमानतळाबाबतही आढावा घेऊन लवकर सुरू करण्याबाबत त्यांनी सूचना केली.

संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी तयारी हवी, मिशन ऑक्सिजन अंतर्गत जिल्ह्याला स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने ऑक्सिजन जनरेशन प्रकल्प उभे करण्याबाबत प्रयत्न करावेत. आरोग्य यंत्रणेला आवश्यक सर्व गोष्टी पुरवल्या जातील असेही ते म्हणाले.

पालकमंत्री सामंत म्हणाले, जिल्ह्यात मोठी बंदरे आहेत. अशा ठिकाणी आपत्कालीन कक्ष सुरू केल्यास यंत्रणा सज्ज राहील. सीआरझेड बाबत लवकर बैठक व्हावी असेही ते म्हणाले.

खासदार राऊत म्हणाले, भूमिगत विद्युत वाहिनी आणि संरक्षण करणारे २१ बंधारे या योजना महत्वाच्या आहेत. २१ बंधारे मंजूर आहेत. हे दोन्ही विषय मार्गी लावावेत.

आमदार केसरकर म्हणाले, काळ्या दगडाचे बंधारे घालणे, अंडग्राऊंड केबलचे काम पूर्ण करावे, मच्छीमारांच्या जाळ्या वाहून जातात त्याबाबत नोंदी व्हाव्यात. वाहून गेलेल्या मस्त्यबीजाची नुकसान भरपाई मिळावी. आमदार नाईक यांनीही मंजूर बंधाऱ्यांचे कामकाज पूर्ण होण्याबाबत सूचना मांडली. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी संगणकीय सादरीकरण करून नुकसानीचा सविस्तर आढावा दिला. यामध्ये पूर्वतयारी, पूर्वसूचना, चक्रीवादळापूर्वीची यंत्रणेची सज्जता, नागरिकांचे स्थलांतर, मच्छीमार नौकांची माहिती, 16 मे ते 19 मे दरम्यान झालेले पर्जन्यमान, घरांचे नुकसान, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, शेतीचे नुकसान, मच्छीमारांचे नुकसान, महावितरण नुकसान आदीचा समावेश होता. पोलीस उपमहानिरीक्षक संजय मोहिते, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, अपर जिल्हाधिकारी मंगेश जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा शल्य चिकिस्तक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Check Also

सहकारी संस्थांच्या बैठक मुदतवाढीसह हे प्रमुख निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतले ओबीसींच्या अध्यादेशाचा प्रस्ताव पुन्हा पाठविणार

मुंबई: प्रतिनिधी ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणासंबधी काढवयाच्या अध्यादेशाचा प्रस्ताव पुन्हा राज्य सरकारकडून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *