Breaking News

बातमीचा फलक मुख्यमंत्र्यांसमोर फडकाविल्याने भाजपा-शिवसेनेच्या आमदारात धक्काबुक्की विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची सत्ताधारी-विरोधकांना समज

नागपूरः विशेष प्रतिनिधी
शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मुद्यावरून भाजपाने आज दुसऱ्या दिवशीही आक्रमक पवित्रा घेतला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई २५ हजाराची द्यावी अशी मागणी करत होते. यावेळी भाजपाचे औसाचे आमदार अभिमन्यू पवार हे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या समोरील मोकळ्याजागेत बातमीचा फलक फडकाविण्याचा प्रयत्नास शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड, नितीन देशमुख यांनी त्यास आक्षेप घेत या दोन आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. त्यामुळे विधानसभेतील वातावरण तंग बनल्याने अखेर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी अर्ध्यातासासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले.
विधानसभेचे कामकाज सुरु होताच भाजपाच्यावतीने शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. तसेच मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपला शब्द पाळावा अशी मागणी विरोधी पक्षनेते फडणवीस हे करत होते. यावेळी भाजपाचे सर्व आमदार अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत येत सामना या वृत्तपत्रात छापून आलेल्या बातमीचा फलक भाजपाचे आमदार पवार यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासमोरच फडकाविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शिवसेना आमदार संजय गायकवाड, नितीन देशमुख यांनी पवार यांच्या कृत्याला हरकत घेतली. त्यातून या तिघांमध्ये धक्काबुक्की झाल्याचे चित्र सभागृहात पाह्यला मिळाले. त्यामुळे सभागृहातील वातावरण चांगलेच तापणार असल्याचे दृश्य पाह्यला मिळाले. मात्र भाजप आमदार आशिष शेलार, गिरीश महाजन यांनी तातडीने हस्तक्षेप करत मध्यस्थी केली. याशिवाय शिवसेना नेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनीही धावत जाऊन मध्यस्थीचा प्रयत्न केला. सभागृहात शिवसेना आणि भाजप आमदार आमनेसामने आल्यानंतर देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, रवींद्र वायकर समजूत घालण्यासाठी पुढे आले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना २५ हजार हेक्टरी मदत करण्याची मागणी केली व या मुद्द्यावर चर्चा व्हावी अशीही मागणी केली मात्र अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज ठरल्याप्रमाणेच होईल असे सांगितले व चर्चा करण्याची परवानगी नाकारली. यावरून विरोधकांनी प्रचंड गदारोळ घातला.
भाजपच्या आमदारांनी वेलमध्ये उतरून आंदोलन केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये देण्याची मागणी केली होती, मग आता तेच मुख्यमंत्री आहेत, त्यांनी तातडीने शेतकऱ्यांना 25 हजाराची मागणी द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप आमदारांनी केली. पुरवणी मागण्यांमध्ये हेक्टरी 25 हजार रुपयांच्या तरतुदीचा उल्लेख नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत देण्याची सरकारची भावना नाही, असा आरोप फडणवीसांनी केला. भाजपने सामनातील बातमी दाखवत आंदोलन केलं.
त्यामुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अखेर सभागृहाचे कामकाज अर्ध्यातासासाठी तहकूब केले. सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरु झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सभागृहात जे घडलं ते आजपर्यंतच्या इतिहासात अत्यंत चुकीचं घडलं असल्याचे सांगत एकमेकांच्या अंगावर जाण्याचा कुणाला अधिकार नाही. मुख्यमंत्र्यांसमोर बॅनर फडकावणं चुकीचं आहे, सत्ताधारी आणि विरोधकांना मी समज देतो असे सांगत याप्रकरणावर पडदा टाकला.
विरोधकांना त्यांचे मुद्दे मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र विरोधकांकडून मंत्र्यांचं तोंड दाबण्याचा प्रयत्न कालही झाला आणि आजही झाला. जयंत पाटील हे सतत अध्यक्षांकडे संरक्षण मागत होते. मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीपर्यंत जाऊन विरोधक गोंधळ घालत होते. त्यामुळेच आम्ही पुढे जाऊन तो बॅनर फाडला. अध्यक्षही सतत तो बॅनर हटवण्यासाठी विनंती करत होते. अध्यक्षांनी अधिकाऱ्यांना नावं लिहून घेण्याच्या सूचना दिल्या. तरीही गोंधळ थांबत नव्हता. शेवटी मग मंत्री महोदयांना बोललं जात नसल्याने आम्ही गेलो आणि बॅनर फाडला आणि त्यानंतर गोंधळ झाला” असं आमदार संजय गायकवाड यांनी सभागृहाबाहेर बोलताना सांगितले.

Check Also

केंद्रीय निवडणूक आयोगाने आतापर्यंत जप्त केले ४,६५० कोटी रूपये

केंद्रीय निवडणूक आयोगाने (ECI) १५ एप्रिल रोजी सांगितले की, गेल्या ७५ वर्षांतील निवडणुकीदरम्यान ड्रग्ज आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *