Breaking News

लॉकडाऊन असा हवा की विषाणूमुळे नॉकडाऊन व्हायची वेळ येऊ नये मुख्यमंत्र्यांनी घेतली कोविड संदर्भात प्रमुख उद्योजक आणि चित्रपट-दूरचित्रवाणी निर्मात्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात कोविडची दुसरी लाट आल्यानंतर राज्यातील सर्व प्रकारच्या चित्रीकरणाला बंदी करण्यात आली होती. मात्र आता कोविड रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याने राज्यात अनलॉक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. निर्मात्यांनी राज्य शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असून चित्रीकरणासाठी सावधानता आणि खबरदारी पाळायची आहे. तसेच ब्रेक दि चेन मधील नव्या वर्गवारी प्रमाणे नियमांचे पालन करायचं असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

येत्या काळात मुंबईतील कोविड बधितांची संख्या नियंत्रणात आली तर मुंबईत चित्रीकरणासाठी परवानगी देण्यात येईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले

राज्यभरातील कोविडच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चित्रपट आणि टीव्ही मालिका निर्मात्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. या चर्चेमध्ये मुख्यमंत्र्यांनी शासन घेत असलेल्या निर्णयांच्या अनुषंगाने सहकार्य करावे, असे आवाहन केले. तसेच या संवादात निर्मात्यांनी आपल्या विविध सूचना मांडून एकजुटीने शासन घेईल त्या निर्णयांना पाठिंबा असेल, असे आश्वासन दिले. राज्यातील चित्रपट आणि वाहिन्यांवरील निर्मात्यांची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मातोश्री निवासस्थान आणि दूरदृष्टी प्रणाली द्वारे आयोजित करण्यात आली होती.

आता आपल्याला लॉकडाऊन नको आणि नॉकडाऊन नको

राज्यात गेल्या वर्षी कोविड विषाणूचा संसर्ग वाढल्याने गेल्या वर्षी प्रथम लॉकडाऊन करण्यात आला.या वर्षी एप्रिलमध्ये पुन्हा कोविड  संसर्ग वाढू लागल्याने लॉकडाऊन करण्यात आला.  लॉकडाऊनमुळे सगळेच बंद होते आणि मग चित्रीकरणाचे नॉकडाऊन होते. मात्र आता आपल्याला हळूहळू अनलॉक करत असताना लॉकडाऊन नको आणि नॉकडाऊन नको असे त्यांनी सांगितले.

आजच्या झालेल्या बैठकीत टास्क फोर्स प्रमुख डॉ. संजय ओक, टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी, के.माधवन, मेघराज राजेभोसले, आदेश बांदेकर, प्रशांत दामले,भरत जाधव,सुबोध भावे, डॉ. अमोल कोल्हे, सिद्धार्थ रॉय कपूर,जे.डी.मजेठीया, अमित बहेल, झी समूहाचे पूनित गोयंका, दीपक राजाध्यक्ष, अजय भाळवणकर, सतीश राजवाडे, निलेश पोतदार, संग्राम शिर्के, विजय केंकरे, शरद पोंक्षे, प्रसाद कांबळी, अनिकेत जोशी, अशोक दुबे, नितीन वैद्य, अशोक पंडित, गौरव बॅनर्जी, मधू भोजवानी, राहुल जोशी, त्याचप्रमाणे मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जरहाड,सांस्कृतिक कार्य सचिव सौरभ विजय,आदी देखील सहभागी झाले होते.

करोनाची दुसरी लाट राज्यात पसरू लागल्याने सर्वप्रकारच्या चित्रीकरणावर महाराष्ट्र राज्य सरकारने बंदी घातली होती. संपूर्ण राज्यातील सर्वंकष परिस्थितीचा आढावा घेण्यात आला असून काही नियम (एसओपी) तयार करण्यात आले आहेत. राज्यात सोमवारपासून अनलॉकची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. ज्या शहरांत, गावांत, जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटीचा रेट हा ५ ते १० टक्क्यांमध्ये आहे तिथे हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेडवर उपचार घेणारे पेशंट ४० टक्क्यांहून अधिक आहे ते सर्वजण लेवल तीनमध्ये येतात. अशा जिल्ह्यांमध्ये मालिका, सिनेमाची चित्रीकरणे केली जाऊ शकतात. परंतु त्यासाठी काटेकोर नियमांचे पालन सक्तीचे आहे.आखून दिलेल्या नियमांमध्ये सर्व चित्रीकरण करणे आवश्यक आहे. चित्रीकरणाशी संबंधित असलेले कलाकार, तंत्रज्ञ, इतर कर्मचाऱ्यांना ‘बायोबबल’ वातावरणातच राहणे बंधनकारक करणे आवश्यक करावे. तसेच अधिकाधिक कलाकारांचे लसीकरण करण्यावर भर देण्यात यावा, असेही ते यावेळी म्हणाले.

उद्योग चालवून दाखविले असे उदाहरण देशात निर्माण करायचाय-ठाकरे

कोरोना काळातही संपूर्ण काळजी घेऊन महाराष्ट्राने उद्योग चालवून दाखविले असे उदाहरण मला देशात निर्माण करायचे आहे. आपल्याला लॉकडाऊन आणि नॉकडाऊन दोन्ही नकोत. त्यामुळे आरोग्याचे नियम पाळत रहा. अनलॉक करताना आपण कॅलक्युलेटेड रिस्क घेत आहोत. त्यामुळे काळजी घ्या. एकदम काहीही शिथिल केलेले नाही. त्यासाठी काही निकष आणि पातळ्या ठरविल्या आहेत. स्थानिक पातळीवर प्रशासन निर्बंध किती शिथिल करायचे किंवा कडक याबाबत निर्णय घेतील. साप भी मरे और लाठी भी ना तुटे असे आपल्याला वागावे लागेल अशी सूचना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी उद्योजकांना केली.

युकेतील विषाणू सारखे किंवा त्यापेक्षाही जास्त धोकादायक पद्धतीने आपल्याकडे संसर्ग वाढला. गेल्या वर्षभरात सुविधा वाढवल्या. साडे तीन लाख बेड्स वरून साडे चार लाख बेड्स पर्यंत पोहचलो. प्रयोगशाळा वाढविल्या आहेत. कोविड केअर केंद्रे वाढवली आहेत पण दुसऱ्या लाटेत आपल्याला काही सुविधा अपुऱ्या पडतील की काय अशी भिती होती. ऑक्सिजनचा तुटवडा झाला पण सर्व मोठ्या कंपन्यांनी आम्हाला ऑक्सिजन उपलब्धतेसाठी सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितले.

बांधकाम कामगार तसेच राज्यातील इतर उद्योगांमध्ये बाहेरील राज्यातील जे कामगार काम करीत आहेत त्यांची आरोग्य विषयक नोंद व्यवस्थित ठेवा. त्यांनी त्यांच्या राज्यात जाताना आणि तिकडून येताना कोविडचा विषाणू पसरवू नये. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची देखील माहिती ठेवा. कामगार परराज्यातून आल्यानंतर त्यांना विलगीकरणात ठेवावे, त्यांची तपासणी करावी असा सल्लाही त्यांनी बांधकाम व्यावसायिकांना दिला.

पावसाची सुरुवात होते आहे. त्यामुळे रोगराई वाढू शकते, साथीचे रोग पसरतात. आपल्या कामगार आणि कर्मचारी यांना आरोग्याचे नियम पाळतील असे पहा. आरोग्य तपासण्या कराव्यात बांधकामांच्या ठिकाणी पाणी साचून मलेरिया, डेंग्यु यासारखे रोग पसरणार नाही हे पहा. पूर्वी जसे सार्वजनिक ठिकाणी किंवा इतरत्र सर्रास धुम्रपान केले जात असे पण आज असे सार्वजनिक ठिकाणी कुणी धुम्रपान करताना दिसत नाही. कारण केवळ कायद्याचा बडगा नाही तर आता ती आपल्याला सवय लागली आहे. तसेच मास्क लावण्याच्या बाबतीत आपण सवय लावावी असे आवाहनही त्यांनी केले.

येणाऱ्या काळात कोरोनाची तिसरी लाट आली आणि आणि लॉकडाऊन करावा लागला तरी उद्योगांच्या दैनंदिन कामकाजावर, उत्पादनावर परिणाम झाला नाही पाहिजे. आपण जसे आरोग्यासाठी फिल्ड सुविधा उभारल्या तसेच उद्योगांनी त्यांच्या भागात कामगार व कर्मचारी यांच्यासाठी तात्पुरत्या निवास सुविधा उभाराव्यात तसेच वैद्यकीय व इतर आवश्यक सुविधा यांचे नियोजन करून ठेवावे अशी सूचनाही त्यांनी केली.

 उद्योजक काय म्हणाले ?

निर्बंधांसंदर्भात निकष आणि लेव्हल्स (पातळ्या) चा निर्णय चांगला आहे. याबाबत लोकांमध्ये योग्य रीतीने जनजागृती होणे अपेक्षित आहे. विशेषत: ग्रामीण भागातील संसर्ग रोखण्यासाठी उद्योजक मदत करतील व योगदान देतील. उद्योग क्षेत्राशी संबंधित असंघटीत वर्गाचे लसीकरण व इतर काळजी घेणं आवश्यक आहे. आयटी क्षेत्राने वर्क फ्रॉम होमवर पुढील काही महिना भर द्यावा. उद्योग व कारखान्यांत येणारे कर्मचारी यांचे लसीकरण, चाचणी याबाबत वर्गीकरण करावे. तिसऱ्या लाटेत आर्थिक व्यवहार बंद होऊ नयेत उद्योगांनी केवळ त्यांच्या कर्मचाऱ्यांचेच नाही तर त्यांच्या परीवारांचेही लसीकरण जलद गतीने करावे. लसीकरणाला जनतेचा प्रतिसाद वाढविण्यासाठी अगदी तळागाळात जाऊन लोकशिक्षण करावे. बांधकाम क्षेत्रात काम करणारे तसेच कामगार यांचे लसीकरण मोठ्या प्रमाणावर होणे गरजेचे आहे. मुंबई खूप मोठी आहे. त्यामुळे निर्बंधांच्या बाबतीत अगदी लहान लहान कंटेनमेंट झोन्सवर भर द्यावा.

पहिल्या पातळीमध्ये आपण लोकांना विविध कारणांसाठी, समारंभ, कार्यक्रमासाठी अधिक संख्येने उपस्थित राहण्यास परवानगी दिली आहे, त्याबाबत अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. रस्त्यांवर पोलिसांचे चेक पोस्ट हटवावे म्हणजे वाहतूक संथ होणार नाही व गर्दी टळेल अशा अनेकविध सूचना उद्योजकांकडून राज्य सरकारला करण्यात आल्या. या बैठकीस उद्योग मंत्री सुभाष देसाई, सीआयआयचे पदाधिकारी उदय कोटक, संजीव बजाज, बी थियागराजन, डॉ नौशाद फोर्बस, अमित कल्याणी, अशोक हिंदुजा, ए एन सुब्रमनियन, डॉ अनिश शहा, अजय पिरामल,बनमाली अग्रवाल, हर्ष गोयंका, सुनील माथुर, उज्वल माथुर, संजीव सिंग, बोमन इराणी, निरंजन हिरानंदानी, जेन करकेडा, असीम चरनिया, सुलज्जा फिरोदिया सहभागी.

Check Also

अतुल लोंढे यांची खोचक टीका, … ४०० पारच्या पोकळ गप्पा मारणा-यांचे २०० चे वांदे

भारतीय जनता पक्षाने ‘अब की बार ४०० पार’चा जो नारा दिला आहे, तो केवळ हवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *