Breaking News

जमिनीवरील कायदे आपले पण… नियम न पाळल्यास निसर्ग न्याय ही करतो वन्यजीव सप्ताहाच्या शुभारंभ कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा इशारा

मुंबई: प्रतिनिधी

आपण विविध दिनविशेष साजरे करतो त्या विषयाची उत्सुकता आणि आस्था त्या दिवसापूरती नको. वन, वन्यजीव आणि पर्यावरणाप्रती लोकांमध्ये जशी जनजागृती झालीच पाहिजे तशीच ती राजकीय नेत्यांमध्ये ही झाली पाहिजे असे सांगत जमिनीवरील कायदे आपले आहेत. पण निसर्गाचे नियम वेगळे असून ते नियम न पाळल्यास निसर्ग आपल्या पध्दतीने न्याय करत असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले.

वन्यजीव सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

आपण कायदे करतो, कायदे पायदळी तुडवतो, आपल्या सोयीप्रमाणे त्याचे अर्थ लावतो. विकासाचे वेडे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण कोणता विनाश करत आहोत हे न बघता आज आपण पुढं जात आहोत.आपण स्वतःला या पृथ्वीचे मालक समजू लागलो आहोत, जमिनीवरचा कायदा आपला आहे पण निसर्गाचे नियम त्या पेक्षा वेगळे आहेत ते नियम आपण पाळले नाही तर निसर्ग त्याच्या पद्धतीने न्याय करतो. विकासाचा ध्यास घेऊन विनाशाकडे तर जात नाही ना याचा विचार करण्याची वेळ आली असल्याचा गर्भित इशारा देत चक्रीवादळ, अतिवृष्टी ही त्याची उदाहरणे आहेत असे त्यांनी सांगितले.

आपण वनांमध्ये घुसखोरी करत आहोत, कोणत्या वन्यजीवाने याविरोधात उपोषण किंवा आंदोलन केल्याचे ऐकले का हो? त्यामुळे या मूक वन्यजीवाचा विचार करून पुढे जायला हवे. निसर्गावर आपण आक्रमण केले आणि ते असह्य झाले की निसर्ग आपले अतिक्रमण आपल्या पद्धतीने दूर करतो. त्यामुळे समजून विचार करून पुढे जाणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

शालेय विद्यार्थ्यांमध्ये वन वन्यजीव संरक्षण आणि संवर्धन यासंदर्भातील रुची निर्माण करण्यासाठी अभ्यासक्रमात या विषयाचा समावेश व्हावा, मोठ्याप्रमाणात शक्य आहे तिकडे वृक्ष लागवड व्हावी. नाशिकला मित्रा नावाची संस्था स्थापन करण्यात आली आहे ही संस्था पर्यावरणपूरक विकास कसा करायचा हे सांगेल. अन्न वस्त्र निवारा या मानवी मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी त्यात निवाऱ्याची गरज पूर्ण करण्यासाठी वस्त्या वाढवत आहोत, जंगलांमध्ये जात असल्याचे त्यांनी सांगितले.

माझा विकासाला विरोध नाही, आता आज सीआरझेड कायद्यातील नियम शिथिल केल्याच्या आणि मुंबईच्या विकासाला गती मिळणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. हे खरं आहे पण वाढणाऱ्या मानवी वस्त्यांना मूलभूत सुविधा, पाणी कस द्यायचं? त्या देताना लाखो झाडांची आहुती द्यावी लागते. अस म्हटलं जातं की जिथे जंगल अधिक तिकडे पाऊस जास्त पण अलीकडच्या काळात हे चित्र बदलते आहे. चेरापुंजी नाही तर दुसऱ्या भागात जास्त पाऊस पडत आहे, कोकण, मराठवाड्यात आपण अशी अतिवृष्टी पहिली असल्याचे त्यांनी सांगितले.

वन संरक्षक हे वनांचे खरे रक्षक त्यांच्या विभागाच्या कार्याला शक्ती देण्याचे काम आपण सर्वजण मिळून करू. मुख्यमंत्र्यांनी आवाहन करत आपल्याला आपले वन आणि वन्यजीव वैभव जपायचे आहेच. त्यासाठी जगा आणि जगू द्या हा मूलमंत्र गाठीशी बांधत पुढं जाऊ या. आपण “वाईल्ड मुंबई” ही चित्रफीत तयार करत आहोत. त्यात रात्रीच्या निरव वातावरणातील बिबट्याचा वावर आपण चित्रित करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Check Also

अखेर मान्सून राज्यात धडकलाः वातावरणातल्या गारव्याने नागरिकांना दिलासा कोकणात बरसल्या मान्सूनच्या सरी

महाराष्ट्रातील प्रत्येक जण ज्या गोष्टीची गेल्या काही दिवसांपासून आतुरतेनं वाट पाहत होता. तो दिवस आज …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *