Breaking News

न्यायाधीशांच्या उपस्थितीतच मुख्यमंत्री म्हणाले, आरोप करणाराच गायब तरीही चौकश्या सुरु देशात लोकशाहीचे पालन होते आहे किंवा नाही यावर स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात अमृत मंथन होणे गरजेचे

औरंगाबाद : प्रतिनिधी.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या विस्तारीत इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यासाठी भारताचे सरन्यायाधीश एन.व्ही रमणा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री किरेन रिजिजू, न्या.उदय लळीत, न्या.धनंजय चंद्रचूड, न्या.भूषण गवई, न्या.अभय ओक, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, मुंबई उच्च न्यायालयाचे न्या.दीपंकर दत्ता, राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्या उपस्थितीत उच्च न्यायालयाच्या विस्तारित इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. या आयोजित सोहळ्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी थेट न्यायपालिकेसह राजकिय आणि सामाजिक भावनांना हात घालत केंद्र सरकार आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले.

यावेळी त्यांनी वेगळ्या पध्दतीने आपल्या भाषणाला सुरुवात करत खंडपीठाच्या भूमिपूजनाच्या वेळी मी नव्हतो पण झेंडा रोवायला मी आलो आहे. मराठीत एक म्हण आहे, “शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात…” त्यावर उपस्थितीतांमध्ये एकच हशा पिकला. त्यावर ते पुढे म्हणाले की, मी अजून पुढचे बोललो नाही. पण मी एक गोष्ट अभिमानाने सांगतोय की, न्यायमूर्ती दिपंकर दत्तु यांनी परवानगी दिली म्हणून मुंबई उच्च न्यायालयाची ब्रिटीशकालीन अप्रतिम इमारत हेरिटेज वॉकसाठी नागरिकांना खुली झाली. आणि औरंगाबाद खंडपीठाची इमारत देखील कशी आहे हे पाहण्यासाठी लोकांनी यावे अशी माझी इच्छा असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले.

मी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांना आजच निमंत्रित करतो की, लवकरच आम्ही मुंबई उच्च न्यायालयाचा नवीन इमारतीकरिता जागा देत असून त्यांनी भूमीपूजनासाठी यावे. आमच्या कारकीर्दीतच ही महत्वाची भव्य वास्तू उभारण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

न्या. चंद्रचूड साहेबांनी कोर्टात किती केसेस आहे आणि न्यायमूर्ती किती काम करतात हे सांगितले. हाच धागा पकडत आम्हाला त्याविषयी पूर्ण आदर आहे, पण तरीसुद्धा न्यायदानातील विलंबामुळे सर्वसामान्यांना भोगावे लागते आहे. तारीख पे तारीख असे आपण ऐकले आहे. पण ही सर्वच न्यायदान प्रक्रिया गतिमान करण्यासाठी सरकारकडून जे काही करता येणे शक्य आहे ते आम्ही केल्याशिवाय राहणार नाही हे माझे वचन असल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

आपण १९५८ पासून एक आरोपी फरार आहे आणि त्याची अजून केस सुरू आहे हा उल्लेख केला. इथे तर एक तक्रारदारच गायब आहे आणि इकडे तपास आणि धाडीचे सत्र सुरू आहेत असा उल्लेख माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोप प्रकरणाचा नाव न घेता उल्लेख करत या प्रकरणी अधिक माहिती मिळविण्यासाठी रोज खणायचे काम सुरु आहे. धाडी सुरु आहेत, चौकशा सुरु आहेत. या सर्व गोष्टीला कोठे तरी फ्रेममध्ये आणण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी यावेळी न्यायाधीशांच्या उपस्थितीत व्यक्त केले.

न्यायदान केवळ न्यायालयाची जबाबदारी नाही तर आपणा सर्वांची आहे. आपल्या देशाकडे जगातली सर्वात मोठी लोकशाही म्हणून पाहिले जाते. लोकशाहीचा गोवर्धन पर्वत कार्यकारी मंडळ, न्यायपालिका, कायदे मंडळ आणि माध्यमांनी पेलला आहे. यावर दबाव जरूर आहे, पण हे स्तंभ दबावामुळे कमकुवत झाले तर कोलमडून पडतील आणि मग परत उभे राहणे अवघड आहे. त्यामुळे या सर्व खांबाना मजबूत करण्याची गरज असल्याचे सांगत काही अनिष्ठ प्रथांना रोखण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

समाजात गुन्हे घडतात त्यावर न्याय देण्याची गरज आहे. ते काम आपण करत आहात. पण समाजात गुन्हेगारीची भावनाच निर्माण होवू नये असा समाज आपल्याला निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याची भावना व्यक्त करत एकच समाधानाने  सांगू इच्छितो की, जलद न्यायदानासाठी सरकार म्हणून करता येणे शक्य आहे ते मी करणारच असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

काही छोट्या छोट्या पण महत्वाच्या गोष्टी सांगतो. विजयादशमीच्या निमित्ताने आम्ही पोलीस यंत्रणेला अधिक बळकट करणारा आणि गुन्हे तपासाला वेग आणणारा निर्णय घेतला. पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षक अशी पदोन्नतीच्या संधी दिल्याने हवालदारांचे अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. तसेच गुन्हे तपासासाठी अधिक मनुष्यबळ मिळणार आहे. सुमारे दीड लाख पोलिसांना याचा फायदा होणार आहे. अमरावती जिल्ह्यातील तीन पोलीस ठाणी आणि तीन पोलीस वसाहतींचे लोकार्पण माझ्या हस्ते नुकतेच झाले. पोलीस ठाण्यांच्या इमारती सुसज्ज करणे तसेच ठाण्याच्या परिसरातच पोलिसांच्या निवासाची सोय करणे यावर आम्ही भर दिला असून त्याची सुरुवात केल्याचे त्यांनी सांगितले.

वन्यजीवांसाठी पहिल्या आणि मानवी डीएनएसाठी मुंबई, पुणे नागपूर अशा तीन एकत्रित फॉरेन्सिक लॅब्स सुरू केल्या. यामुळे गुन्ह्यांचा तपास वेगाने लागण्यास मदत होणार आहे. अनाथ व निराश्रित महिला व मुले यांच्या सुरक्षेसाठी निवारे तयार करण्याचे ठरविले, त्याचाच एक भाग म्हणून  बेघर, अनाथ महिला, मुले यांच्या निवाऱ्यासाठी मुंबईत सर्व्हेक्षण सुरू केले असून यामुळे अशा दुर्बल घटकांवरील अन्याय रोखण्यास मदत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आपल्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी अमृत महोत्सव ७५ वर्ष आपण साजरे करतोय. अमृतमहोत्सवी वर्षांमध्ये आपण नेमके कुठे आहोत याचा विचार करण्याची गरज आहे, पूर्वी कसे समुद्र मंथन होऊन अमृत निघाले होते तसे आता अमृत मंथन सुद्धा व्हावे. आपल्या देशाच्या घटनेत संघराज्य असा शब्द आहे की केंद्र यावरून चर्चा सुरू आहे. ज्या घटनेची शपथ आपण अभिमानाने राष्ट्रपतींपासून सगळेजण घेतो त्या घटनेत राज्याचे काय अधिकार आहेत ते दिले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना प्रश्न विचारले गेला तेव्हा त्यांनी देखील स्पष्ट सांगितले होते की, काही विशिष्ट अधिकार सोडले तर राज्ये सार्वभौम आहेत. हा स्वातंत्र्याचा महोत्सव हा केवळ ७५ वर्षासाठी मर्यादित नाही तर हे स्वातंत्र्य टिकवायचे आहे, गुलामगिरी आपल्या नशिबात घेऊ नये असे जर का वाटत असेल तर नम्रपणाने एक विनंती करतो की आज सगळे मान्यवर विधी तज्ञ व्यासपीठावर आहेत. या विषयावर चर्चा घडवून त्यावर प्रकाश टाकला पाहिजे असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

स्वातंत्र्याचा अर्थ काय ? कोणाला किती अधिकार आहेत?  पदावर आहे म्हणजे तुझी मर्जी हा तुझा अधिकार होऊ शकत नाही.  तुझा अधिकार वेगळा आणि तुझी मर्जी वेगळी. हे मी थोडेसे वेगळे पण सामान्यांच्या मनातलं बोललो आहे. सगळ्यांनी एक घटनेची चौकट असते, या चौकटीतच काम केलं तर मला वाटतं समाज आणि देश खऱ्या अर्थाने स्वतंत्र होईल असे त्यांनी शेवटी सांगितले.

Check Also

जिल्हा बँक संचालकांवर दोन वर्षांत अविश्वास प्रस्ताव आणता येणार नाही

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या संचालकावर दोन वर्षांच्या आत अविश्वास प्रस्ताव दाखल करता येणार नाही अशा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *