Breaking News

आणि मुख्यमंत्र्यांनी राणेंना करून दिली “त्या” फोनची आठवण जनतेच्या कामासाठी नेहमीच आपण राजकारण विरहीत काम करतो

सिंधुदूर्ग: विशेष प्रतिनिधी

राणेंच्या जनादेश यात्रेच्या दरम्यान झालेल्या अटक नाट्यानंतर पहिल्यादांच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने एकाच मंचावर आले. मात्र या दोघांमध्ये असलेले शत्रुत्व सर्वश्रुत आहे. परंतु एका कामासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना फोन केल्याची आठवण दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनी राणे यांना करून देत विकास कामासाठी आपण पक्ष बघत नसल्याची आठवण राणे यांच्या बालेकिल्ल्यातच करून दिली.

चिपी विमानतळाच्या कामावरून यापूर्वीच श्रेयवादाची लढाई सुरु झालेली असताना आज उद्घाटनाच्या कार्यक्रमात नारायण राणे यांनी जाहिरपणे या कामाचे श्रेय माझेच असून त्याच्या आसपासही कोणाचे नाव पसरू शकत नसल्याचे वक्तव्य करत अप्रत्यक्ष मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आपल्या भाषणा दरम्यान लगावला.

त्यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपल्या भाषणात राणेंच्या याच वक्तव्याचा धागा पकडत मी हेलिकॉप्टरने एरियल फोटोग्राफीसाठी फिरत असताना मला छत्रपती शिवरायांनी बांधलेला सिंधुदुर्ग किल्ला दिसला. महाराजांचे किल्ले, आता किल्ले म्हणजे … माझा समज असा आहे की, निदान सिंधुदुर्ग किल्लातरी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे. नाही कोणतरी बोलेल मीच बांधला असा उपरोधिक टोला नारायण राणे यांचे नाव न घेता लगावला.

तसेच त्याच भाषणात ते पुढे म्हणाले की, मी तुम्हाला आठवत असेल तुम्ही तुमच्या मेडिकल कॉलेजच्या फाईली संदर्भात मला फोन केला होतात. तेव्हा लगेच मी दुसऱ्या दिवशी तुमच्या फाईलीवर सही केली अशी आठवण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगत राणे यांनी त्यांच्या मेडिकल कॉलेजला राज्य सरकारने परवानगी द्यावी यासाठी प्रत्यक्ष फोन केल्याचे सांगितले.

तसेच मीही कोणत्याही गोष्टीचा विचार न करता लगेच सही केली कारण मेडिकल कॉलेज हे जनतेच्या हितासाठी आहे. लोकांच्या कामासाठी मी पक्ष पहात नसल्याचे सांगत राणे आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यात शत्रुत्व असले तरी विकास कामात मदतीस नेहमीच तयार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

विशेष म्हणजे विकास कामासाठी एकमेकांशी फोनवरून बोलणारे मुख्यमंत्री ठाकरे आणि केंद्रीय मंत्री राणे हे प्रत्यक्षात मात्र आजच्या कार्यक्रमात एकमेकांकडे पाह्यला आणि बोलायला तयार नव्हते.

Check Also

अखेर मालदीव बरोबरचे संबध दृढ करण्यासाठी चीन घेतोय पुढाकार

साधारणतः दोन महिन्यापूर्वी मालदीव मधील निवडणूका पार पडल्या या निवडणूकीत भारतीय वंशाचे मोहम्मद मोईझु यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *