Breaking News

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, पंतप्रधान मोदींची योजना आल्यावर जाहीर करू शेतकऱ्यांना हमीभाव मिळणे अजूनही दूरच

मुंबईः विशेष प्रतिनिधी

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार महाविकास आघाडीकडून कर्जमाफी देणे सुरु करण्यात आले. मात्र शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्याबाबत पंतप्रधान मोदींची हमीभाव योजना येणार असून त्याची वाट आम्ही बघत असल्याची खोचक टीका मोदी यांच्यावर करत ही योजना आल्यानंतर त्याचा अभ्यास करून महाविकास आघाडीची हमीभाव योजना जाहीर करू अन्यथा आम्ही त्यांची कॅापी केल्याचा आरोप होईल अशी उपरोधिक मल्लिनाथी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली.

विधिमंडळातील मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब, आमदार सुनिल प्रभू आणि भास्कर जाधव यांच्यासह सहकार विभागाच्या प्रधान सचिव उपस्थित होत्या.

राज्यातील शेतकऱ्यांचे शेती पिकाचे अवकाळी पाऊस, रोगराई पडून नुकसान होवून त्यांचे आर्थिक नुकसान होवू नये यासाठी प्रधानमंत्री फसल बीमा योजना राज्यात लागू आहे. मात्र ही योजना राज्यात का फसली याचा अभ्यास करू. मात्र योजनेच्या नावात जो फसल शब्द वापरला तो मराठी शब्द आहे का हिंदी शब्द आहे याची माहिती घेवू असा उपरोधिक टोलाही  त्यांनी पंतप्रधान मोदी यांना लगावला.

राज्यात आतापर्यंत १० लाख शेतकरी कर्जमाफीच्या योजनेसाठी पात्र ठरले असून तितक्याच संख्येच्या शेतकरी लाभ धारकांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या संख्येत जास्तीत जास्त वाढ होवून लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत आम्ही आग्रही असल्याचे त्यांनी सांगितले.

७ मार्चला अयोध्येला जाणार-मुख्यमंत्री

देव हा काही एकट्याचा नसतो. यापूर्वीही मी अयोध्येला गेलो होतो. आताही ७ मार्चला अयोध्येला जाणार आहे. महाविकास आघाडीतील मित्रपक्ष आणि सहभागी मंत्री कोणी येणार असतील तर त्यांनाही आम्ही सोबत नेण्यास तयार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सामना-शिवसेना एकच परिवार

सामना आणि शिवसेना हे एकाच परिवारातील आहोत. मुख्यमंत्री पदामुळे मी जरी संपादक पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच त्याच्या संपादक पदाची जबाबदारी सौ.रश्मी ठाकरे यांच्याकडे सोपविण्यात आलेली असली तरी सामना दैनिकाची भाषा तशीच राहणार असून संपादकीय जबाबदारी संजय राऊतच कायम पार पाडतील. त्यात येणारे विचार हे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून माझेच असतात. तसेच त्या दैनिकाची भाषा ही पितृभाषा असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

मुस्लिम आरक्षणावर अद्याप निर्णय नाही

मुस्लिम आरक्षणाबाबतचा विषय अद्याप राज्य सरकारसमोर आलेला नाही. त्यामुळे त्यावर आताच बोलणे योग्य होणार नाही. ज्यावेळी हा विषय समोर येईल त्यावेळी त्यावर आम्ही पक्ष बसून निर्णय घेवू. मात्र या आरक्षणाबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच याप्रश्नावरून आदळआपट करणाऱ्यांनी थोडी सबुरी ठेवावी असा खोचक सल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिला.

Check Also

अतुल लोंढे यांची खोचक टीका, … ४०० पारच्या पोकळ गप्पा मारणा-यांचे २०० चे वांदे

भारतीय जनता पक्षाने ‘अब की बार ४०० पार’चा जो नारा दिला आहे, तो केवळ हवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *