Breaking News

मुख्यमंत्री ठाकरेंनी पोलिसांना केला “मानाचा मुजरा” सर्वोत्तम प्रशिक्षण, अत्याधुनिक सुविधा देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आश्वासन

मुंबई: प्रतिनिधी
पोलीसांसाठी या “अभय मुद्रा” वरील ब्रीद वाक्याप्रमाणे कर्तव्य बजावण्याची कठीण जबाबदारी असते. त्यामध्ये ताण-तणाव स्वीकारून, इतरांना निर्धास्त करावे लागते. पोलिसांच्या खबरदारीमुळेच सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत निर्धास्तपणे केले. त्यासाठी पोलीसांना “मानाचा मुजरा” या शब्दांत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कौतुकोद्गार काढले.
बदलत्या कालानुरूप पोलिसांपुढे आव्हानंही मोठी आहेत. विघातक शक्ती अत्याधुनिक गोष्टी वापरू लागले आहेत. त्यामुळे त्यांचा मुकाबला करण्यासाठी पोलिसांना एक पाऊल पुढे राहावे लागेल. यासाठी जगात उपलब्ध असे सर्वोत्तम प्रशिक्षण आणि सुविधा मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असून सुविधाच्या रुपाने पाठबळ दिले जाईल. या हिमतीमुळेच शिवरायांच्या महाराष्ट्राची मान आणखी उंचावता येणार आहे. त्यामुळे पोलिस दलाला पाठबळ देण्यासाठी वचनबद्ध असल्याचा पुनरूच्चार त्यांनी केला.
महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त आयोजित संचलन समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मरोळ येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र प्रांगणात आयोजित या समारंभात पोलीस दलातील विविध विभागांच्या पथकांनी शानदार संचलन करून मानवंदना दिली. महाराष्ट्र पोलीस दलाच्या इतिहासात प्रथमच ध्वजप्रदान दिनानिमित्त असे संचलन करण्यास सुरुवात करण्यात आली. या पहिल्याच संचलनात मानवंदना स्विकारण्याची संधी मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री ठाकरे यांनी हा क्षण आयुष्यातील अनमोल ठेवा बनल्याचे नमूद केले.
या संचलनात राज्यातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या पोलीस वाद्यवृंद पथकांनी संस्मरणीय अशा धून सादर करून रंग भरला. तर विशेष सुरक्षा विभागाने अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेशी निगडित प्रात्यक्षिकांनी थरार निर्माण केला.
संचलनास मंत्री आदित्य ठाकरे, आमदार रमेश लटके, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार, पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यासह पोलीस दलातील वरीष्ठ अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीलाच उपस्थितांना आणि विशेषतः पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र पोलीस दलाला तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते ध्वज प्रदान करण्यात आला होता. हा ध्वजाचा मान मिळविणे जितके अभिमानास्पद आहे, तितकेच हा मान टिकवणे आणि वाढविणे महत्त्वाचे असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
सुरुवातीला राज्य राखीव पोलीस दल, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी, मुंबई पोलीस यांच्यासह विविध पथकांनी बंदुकीच्या हवेत फैरी झाडून सलामी दिली. त्यानंतर शानदार संचलनासह मानवंदना दिली.
मुख्यमंत्र्यांनी उलगडला ऋणानुबंध पट
महाराष्ट्र पोलीस दलाला २ जानेवारी १९६१ ला तत्कालिन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांनी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीत ध्वज प्रदान केला. हा ध्वज जे. जे. स्कूल ऑफ आर्टसचे प्राचार्य व्हि. एन. आडारकर यांच्या संकल्पनेतून साकारला आहे. प्राचार्य आडारकर हे मुख्यमंत्री ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या कलानगर मध्येच राहतात. तसेच स्वतः मुख्यमंत्री ठाकरे हे जे.जे. स्कूल ऑफ आर्टसचे विद्यार्थी. त्यामुळे ध्वज प्रदानाच्या निमित्ताने आयोजित आणि त्यातही पहिल्यांदाच संचलनासह होणाऱ्या या समारंभास उपस्थित राहता आल्याचे सांगत पोलिसांशी ऋणानुबंध असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलिसांच्या निवासस्थान संकुलाचे भूमीपूजन संपन्न
महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्यावतीने मुंबई पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी बांधण्यात येणाऱ्या मरोळ येथील निवासस्थानाच्या प्रकल्पाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले.
या प्रकल्पात प्रशासकीय इमारत, विश्रांतीगृह, वसतीगृह, क्रिडासंकुल यांच्यासह सर्व सुविधायुक्त ४४८ सदनिकांचे बांधकाम करण्यात येणार आहे. यासाठी तळमजल्यासह सात मजल्यांच्या सोळा इमारती उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी सुमारे २२५ कोटी १३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यावेळी पोलीस महासंचालक (गृहनिर्माण) बिपिन बिहारी यांनी स्वागत केले व प्रकल्पाची माहिती दिली.
फोर्स वनच्या प्रशिक्षण केंद्राचे मुख्यमंत्र्यांकडून कौतूक
फोर्स वन या विशेष पोलिस दलाच्या जोगेश्वरी येथील प्रशिक्षण केंद्रास मुख्यमंत्री ठाकरे , मंत्री आदित्य ठाकरे यांनी भेट दिली. याप्रसंगी पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल, प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख तथा अतिरिक्त पोलीस महासंचालक सुखविंदर सिंह उपस्थित होते. या केंद्राने नुकताच पुणे येथे झालेल्या अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविले आहे. यासह नेमबाजी आणि प्रशिक्षणातील काठीण्यपातळीतील प्राविण्यासाठीची पदके पटकाविली आहेत. याबाबींचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी विशेष कौतुक केले.

Check Also

तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांसाठी गोड बातमी: मानधनात वाढ उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली घोषणा

मुंबई: प्रतिनिधी मागील अनेक वर्षापासून तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करावी अशी मागणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *