मुंबईः प्रतिनिधी
महाराष्ट्र सरकार आणि गुंतवणूकदार यांच्यात एक विश्वास आहे. त्यामुळे मागील सांमजस्य करारातील ६० टक्के उद्योगांच्या बाबतीत सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगत राज्यात १ लाख कोटी रूपयांची गुंतवणूक आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
मँग्नेटीक महाराष्ट्र २.० अंतर्गत राज्यात सिंगापूर, जपान यांच्यासह देशातील विविध उद्योगपतींसोबत ३५ हजार कोटी रूपयांचे सामंजस्य करार आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित करण्यात आले. यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यासह काही अन्य मंत्रीही उपस्थित होते. हा कार्यक्रम मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर ते बोलत होते.
मला उद्योग खात्याचा अभिमान आहे. पण ही फक्त सुरुवात आहे.
१ लाख कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक राज्यात आणण्याचे उद्दिष्ट आहे. ३५ हजार कोटींची गुंतवणूक आज होते आहे ही महत्वाची गोष्ट आहे. महाराष्ट्र या कोरोना परिस्थितीतून नुसते बाहेर नाही पडणार तर अधिक सामर्थ्याने देशात आघाडी घेईल. आपल्याला जगाचे दरवाजे कोविडनंतर उघडताहेत. युनिटी इन डायव्हर्सिटी असा हा आजचा करार आहे. जिथे विविध क्षेत्रातील उद्योग राज्यात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. महाराष्ट्र हा डेटा सेंटरच्या बाबतीत देशाचे महत्वाचे केंद्र बनेल असा मला विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज एमआयडीसी आणि विविध कंपन्यांमध्ये सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आल्या. १५कंपन्यांमार्फत जवळपास ₹३४,८५० कोटींची गुंतवणूक राज्यात होत आहे. तसेच यामुळे सुमारे २३,१८२ लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहेत.
