Breaking News

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, कारभार पारदर्शक …उलट्या फाईल पाठवायच्या नाहीत सचिवांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती

मुंबई: प्रतिनिधी
माझा कारभार हा पारदर्शक राहणार असून उलट्या-सुलट्या फाईली माझ्याकडे पाठवायच्या नाहीत अशी स्पष्टोक्ती राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी देत जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आणि महाराष्ट्राला देशात अग्रेसर करण्यासाठी विकासकामे करताना जनतेचा एकही पैसा वाया जाणार नाही याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कटाक्षाने लक्ष द्यावे, असे स्पष्ट आदेश त्यांनी दिले.
मुख्यमंत्री कार्यालयात पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी मुख्य सचिव अजय मेहता, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव भूषण गगराणी आणि विविध विभागाचे सचिव उपस्थित होते.
सचिवांच्या बैठकीतच पारदर्शक कारभार आणि उलट्या-सुलट्या फाईली पाठवायच्या नाहीत असे सांगितल्याने भ्रष्टाचाराला कारभारात स्थान देणार नसल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले.
तसेच शिवसेना पक्षप्रमुख म्हणून आणि ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्याने ठाकरे हे दिसतात कसे, बोलतात कसे याची उस्तुकता मंत्रालयातील सर्वच अधिकाऱ्यांना होती. तसेच त्यांचे मंत्रालयात झालेले स्वागत आणि सत्कार यामुळे प्रशासकिय अधिकाऱ्यांमध्ये समाधानाची बाब व्यक्त करत त्याबद्दलचा आदरही अधिकाऱ्यांच्या बोलण्यातून जाणवत होता.
जनतेने दिलेल्या करातून विकास कामांसाठी निधी प्राप्त होत असतो. निधीचा योग्यप्रकारे विनियोग करून विकासाला गती देणे आवश्यक आहे. सेवाभावनेने कामे केल्यास जनतेचा विश्वास संपादन करता येईल. सरकार माझे आहे अशी विश्वासाची भावना जनतेच्या मनात निर्माण करणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
जनतेने विश्वासाने मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपविली आहे. राज्याला मुंबईत जन्मलेला पहिला मुख्यमंत्री मिळाला असल्याने मुंबईसह राज्याला देशात अग्रेसर करण्याचे स्वप्न घेऊन यापुढे काम करावयाचे आहे. विकास कामांसाठी निधी देताना करदात्याचे उत्पन्नही वाढेल याकडेदेखील लक्ष देणे तेवढेच महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण आणण्यासाठी विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवावा अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
शासन आणि प्रशासनाबद्दल जनतेच्या मनात आपुलकीची आणि आदराची भावना निर्माण होण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. सर्वांगीण विकास साधताना कामांची गती आणि दिशेलाही तेवढेच महत्त्व आहे. त्यादृष्टीने प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची जबाबदारी खूप महत्त्वाची आहे. अधिकारी आपल्या जबाबदारीचे सक्षमपणे निर्वहन करतील आणि प्रगतीचे उद्दिष्ट गाठण्यास शासन यशस्वी होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Check Also

प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यात उमेदवारी जाहिर होताच पत्रयुध्द

मागील १० वर्षापासून सोलापूर लोकसभा मतदारसंघ भाजपाकडे आहे. परंतु या १० वर्षात भाजपाला स्वतःचा सक्षम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *