मुंबईः विशेष प्रतिनिधी
भाषण काल माझा सभागृहातला पहिला दिवस होता. मी माझ्या मंत्र्यांची सभागृहात ओळख करुन दिली. आज देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलण्यासाठी मी उभा असून माझ्यासमोर त्यांची जी ओळख आली, ती आधीच यायला पाहीजे होती अशी उपरोधिक चिमटा काढत मी येईन असे कधी म्हणालो नव्हतो पण इथे आलो असे फडणवीस यांचे नाव न घेता टीका करत मी नशीबवान आणि भाग्यवान मुख्यमंत्री असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानंतर मांडण्यात आलेल्या अभिनंदन ठरावावर ते बोलत होते.
जे २५ वर्ष विरोधात होते, ते आज माझे मित्र आहेत. जे २५ वर्ष मित्र होते, ते आता विरोधक झाले आहेत. विरोधक हा शब्द कुणी आणला, याचं संशोधन केले पाहीजे. इथे सर्वच शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जर आलेलो असू तर मग विरोधक आणि सत्ताधारी असे वेगवेगळे का? आमच्याकडे बंद दाराआड आणि कानात काय बोललो याची चर्चा बाहेर सांगण्याची परंपरा नाही असे सांगत अप्रत्यक्ष देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.
इतके दिग्गज सभागृहात आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे मित्र
माझ्यासमोर आहेत. देवेंद्र फडणवीस यांची मैत्री मी कधीच लपवलेली नाही. ती कालही होती, आजही आहे आणि राहिल. आम्ही हिंदुत्व विसरलेलो नाही. दिलेला शब्द न पाळणे हे माझे हिंदुत्व नाही असे सांगत भाजपाच्या राजकिय मैत्रीवर त्यांनी टीका केली.
मी मागच्या पाच वर्षात कधीही सरकारला दगा दिलेला नाही. सरकारने जे काम केले त्याच्या आड आलेलो नाही. मी शिवसेनेच्या सर्व आमदारांना सांगितले होते. काळोखात काही करायचे नाही. मध्यरात्री खलबतं करायची नाहीत असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याशी हातमिळवणी करत पहाटेच सरकार स्थापन आणि पदाची शपथ घेतल्याच्या घटनेचे उट्टे त्यांनी काढले.
मुख्यमंत्री ठाकरेंनी सांगितला ज्योतीबा फुलेंचा किस्सा
सत्ताधारी आणि विरोधक हे दोन विरुद्ध शब्द न राहता इथे लावलेल्या महापुरुषांच्या ज्या तस्वीरी आहेत, त्यांचा वारसा पुढे न्यायचे काम आपल्याला इथे कारायचे आहे. इंग्लडच्या घराण्याच्या राजकुमाराची पार्टी होती. त्या पार्टीला महात्मा फुलें गेले होते. मात्र ते शेतकऱ्यांच्या फाटक्या वेशात गेले होते. त्यावेळी तेथील लोकांनी त्यांना प्रवेश नाकारला. तेव्हा येथील राज्यकर्त्यांना शेतकऱ्यांचे वास्तव कळावे म्हणून मी या वेशात आल्याचे सांगत आपल्याला शेतकऱ्यांना फक्त कर्जमुक्तच करायचे नाहीतर चिंतामुक्त करायचेय असे सांगत लवकरच कर्जमाफीबाबत निर्णय घेणार असल्याचा सुतोवाच त्यांनी केला.
