Breaking News

उद्या रात्री ८ वाजल्यापासून राज्यात संचार बंदी आणि गरीबांसाठी पॅकेज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडून जाहिर

मुंबई: प्रतिनिधी

राज्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून ही कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पुढील १५ दिवस लॉकडाऊन सदृश्य कडक निर्बंध लागू उद्या रात्रो ८ वाजल्यापासून लागू होत असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहिर करत राज्यात १४४ कलम अर्थात संचारबंदी लागू करण्यात येत आहे. या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व गोष्टी बंद राहणार असून हॉटेल, रेस्टॉरंट मधून होम डिलीव्हरी फक्त सुरु राहणार असून राज्यातील गोर गरीब जनतेसाठी मोफत धान्य पुरवठा आणि मोफत शिवभोजन थाळी सुरू राहणार असल्याचे सांगत राज्यातील जनतेला दिलासा दिला.

याशिवाय राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद ठेवण्यात येणार नाही. मात्र ही सेवा फक्त अत्यावश्यक वर्गात काम करणाऱ्या नागरीकांसाठी सुरु राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मागील काही दिवसांपासून राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू करण्याबाबत आधीच कल्पना देण्यात येत होती. अखेर त्यावर चर्चा विचार विनिमय करून अखेर राज्यात संचारबंदी लागू करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी समाजमाध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधताना केली.

राज्यात आजस्थितीला राज्यात ५२३ कोरोना चाचणी केंद्रे आहेत. मात्र चाचण्यांची संख्या आला २ लाखाहून अधिक वाढविण्यात आल्याने त्याचा अहवाल येण्यास उशीर होत असून आता या केंद्रावरही ताण येत आहे. तर मागील कोरोना लाटेत २६०० कोविड सेंटर्स होती आता त्यात वाढ करत कोविड सेंटरची संख्या ४ हजारावर नेण्यात आली आहे. तर पूर्वी ३ लाख २५ हजार बेड्स होते. त्यात आता वाढ करण्यात आली असून ३ लाख ५० हजाराहून अधिक बेड्स उपलब्ध करण्यात आले आहे. तसेच दिवसाकाठी ४० ते ५० हजार रेमडिसिव्हीर इंजेक्शनची गरज लागत असल्याची माहिती त्यांनी दिली.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यातील सर्वांशी चर्चा केली. रेमडिसीव्हरची मागणी मध्यंतरी घटली होती. मात्र आता पुन्हा मागणी वाढत असून पुढील आठवड्यापासून त्याचा पुरवठा नियमित होईल. रेमडिसिव्हीर औषध तयार होण्यासाठी किमान दोन ते तीन आठवडे लागतात. त्यामुळे आता त्याचा पुरवठा सुरुळीत होईल. सध्या राज्यात ऑक्सीजनचा तुडवडा आहे. सध्या वाढणारी संख्या अशीच वाढत राहिली तर आगामी काळात हाताशी असलेला ऑक्सीजन पुरवठा संपल्याशिवाय राहणार नाही. सद्यपरिस्थितीत राज्यात दैंनदिन १२०० मेट्रीक टन ऑक्सीजनचे उत्पादन होत आहे. ते सर्व उत्पादन आपण वैद्यकीय सेवेसाठी वापरत आहोत. त्यामुळे आपण केंद्र सरकारकडे मदत मागितली. त्यावर  केंद्राने ईशान्य राज्यातून ऑक्सीजन आणण्यासाठी परवानगी दिली आहे. काही निर्मिती करणाऱ्या कंपन्या राज्यातही आहेत. मात्र ईशान्य राज्यांसह इतर राज्यातूनही ऑक्सीजन आपल्याला आणावे लागणार आहे. जर इतक्या लांबच्या राज्यातून ऑक्सीजन आणणे शक्य नसल्याने या कामासाठी एअरफोर्सच्या विमानाने ऑक्सीजन आणण्यासाठी केंद्राला पत्र आणि वैयक्तीक बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कडक निर्बंधाच्या अनुषंगाने अनेकांशी बोललो. त्या दरम्यान काही जणांनी जीएसटी भरण्यासाठी तीन महिन्याची मुदत आणि परतावा तीन महिन्यातून एकदा तरी परत करावा अशी मागणी काही जणांनी केली. त्यासाठी आपण पंतप्रधानांशी आपण बोलणार असून त्या अनुषंगाने निर्णय घ्यावा यासाठी विनंतीही करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्याची परिस्थिती ही जसा एखादा भूकंप आल्यावर असते तशी आहे. कोरोनाची आपत्ती ही नैसर्गिक आपत्ती असून त्याच पध्दतीची मदत करायला हवी. त्यामुळे राज्यातील सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था यांनी सरकारच्या बरोबरीने पुढे येवून मदत करावी असे आवाहनही त्यांनी केले.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लंडनमध्ये जसे लॉकडाऊन लागू करून लसीकरण मोहिम राबविण्यात आली. त्यामुळे तेथे बाधित होण्याच्या प्रमाणात घट झाली असून तेथील मृत्यूदरातही घट झाली आहे. त्या प्रमाणात आपणालाही या काळात लसीकरण वाढवावे लागणार आहे. लसीकरण केले तरी आपणाला काही काळ कोरोनाचा धोका राहणार आहे. त्यामुळे तिसरी लाट, चौथी लाट येतच आहे. कारण लसीमुळे प्रतिकारशक्ती निर्माण होण्यास काही कालावधी लागतो. त्यामुळे आपणाला पुरेशी काळजी घ्यावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्यावर्षी आपल्या जिद्दीमुळे तेवढी लाट आपण थोपवू शकलो. त्यावेळी जेवढी वैद्यकिय सेवा उभारली ती आता तोकडी पडताना दिसत आहे. सध्याची असलेली रेमडिसिव्हीरची सध्या असलेली ४० ते ५० हजाराची दररोजची मागणी ही पुढील काळात दुप्पट अर्थात एक लाख होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही साखळी तोडणे आवश्यक असल्याने काही  निर्बंध जरी ती लॉकडाऊन सदृश्य असली तरी त्या लावावी लागणार आहेत. तसेच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आपल्याला घरातच थांबावे लागणार आहे. या निर्बंधांमुळे अनेकजण म्हणत होते रोजी रोटी मंदावेल. मात्र रोजी मंदावेल परंतु रोटी मंदावणार नसून त्यासाठी सर्वसामान्य नागरीकांना प्रती व्यक्ती ३ किलो गहू २ किलो तांदूळ मोफत देणार असून ज्यांचे हातावर पोट आहे अशांसाठी शिवभोजन थाळी मोफत देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्याची वेळ ही उणीदुणी काढण्याची नसून सोबत काम करण्याची वेळ आहे. पंतप्रधानां सोबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरस मिटींगमध्ये मी त्यांना सांगितले की कोरोनाची लढाई लढण्यासाठी सर्व नेत्यांना एकत्र येवून साथीने लढण्याची गरज आहे. त्यानुसार राज्यातील सर्वांना सोबत घेवून चर्चा केली. राज्यात निर्बंध लावण्यात मला आनंद वाटत नाही. मात्र सध्याची वेळ ही कडक पावले उचलण्याची असल्याचे त्यांनी सांगितले.  राज्यात खालील ब्रेक द चेन अंतर्गत कडक निर्बंध लागू राहणार-

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात दोन तीन दिवसात मतदान होणार असल्याने तेथील निवडणूक पार पडल्यानंतर राज्याच्या इतर भागात लागू होणारे निर्बंध तेथेही लागू होणार आहेत. मात्र सुरुवातीला तेथे हे नियम लागू होणार नाहीत. त्यामुळे निवडणूका होईपर्यत पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघ त्यास अपवाद असेल. अपवाद मात्र त्यानंतर तेथेही निर्बंध लागू होतील.

  • उद्या बुधवारी संध्याकाळी ८ वाजल्यापासून ब्रेक द चेन अंतर्गत १४४ कलम राज्यात संचारबंदी लागू करत आहे. येणे-जाणे बंद करावे लागले. अतिआवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे अन्यथा काम नसेल तर लोकांनीच येणे-जाणे बंद करावे. कारण नसताना घराबाहेर पडून आपण कोरोनाला मदत करणार की सरकारला? हे ज्याने त्याने ठरवावे. अत्यावश्यक उपक्रम सोडून सकाळी ७ ते रात्री ८ या कालावधीत अत्यावश्यक सेवा सुरु ठेवणार. लोकल, बस, एसटी बंद करत नाही. रूग्णालये, दवाखाने, विमा कंपन्या, औषध कंपन्या, वाहतूक, लस वाहतूक, मास्क, वैद्यकीय, जनावरांशी संबधित-पाळीव प्राणी आणि कृषी जनावरे, विमाने, रेल्वे वाहतूक. पावसाळी कामे सुरुच राहणार.
  • आरबीआय आणि संबधित यंत्रणा तसेच आरबीआयने मान्यता दिलेल्या संस्था- आर्थिक बाबींशी संबधित कार्यालये सुरु राहतील. अधिस्विकृतीधारक पत्रकार यांना मुभा राहणार आहे.
  • बांधकाम व्यावसायिकांनीही त्यांच्या व्यक्तींची सुविधा त्याच ठिकाणी करावी. काही उद्योगांनी कामगारांसाठी वसाहत केली असेल तर तेथून कामगारांची ने-आण करावी आणि आपले कारखाने सुरु ठेवावेत.
  • हॉटेल, रेस्टॉरंट आदींना नियम लागू राहणार असून होम डिलीव्हरी, टेक-वे याची परवानगी त्यांना देण्यात आली. त्याचबरोबर रस्त्यावरचे खाद्य पदार्थ विक्रेते यांनाही विक्री करण्यास परवानगी मात्र त्यांनी पार्सल व्यवस्था सुरु ठेवावी.
  • अन्न सुरक्षा योजनेंतर्गत राज्यातील गोरगरीब व्यक्तींना प्रती व्यक्ती ३ किलो गहू, २ किलो तांदूळ मोफत देणार. ७ कोटी नागरीकांना हे धान्य एक महिनाभर देण्यात येणार.
  • १० रूपयात सुरु केलेली शिवभोजन थाळी मधल्या काळात ५ रूपयात ही थाळी आता सुरु आहे. मात्र पुढील एक महिना ही थाळी आता गोरगरीबांसाठी मोफत देणार.
  • केंद्र व राज्य सरकारच्या संजय गांधी, इंदिरा गांधी, विधवा निवृत्तीसह पाच योजनेतील लाभार्थ्यांना दोन महिन्यांचे १ हजार अर्थ सहाय्य आगाऊ देणार याचे लाभार्थी ३५ लाख आहेत.
  • इमारत कामगार कल्याण मंडळातील नोंदणीकृत कामगारांना १५०० रूपये देणार. घरेलू कामगारांसाठी एक निधी देतोय.
  • अधिकृत फेरीवाल्यांना १५०० रूपये देणार. ५ लाख लाभार्थी
  • रिक्षा चालकांना परवानाधारकांना १५०० रूपये देणार -१२ लाख लाभार्थी
  • आदिवासी समाजाला खावटी योजनेतील २ हजार रूपये देणार -१२ लाख लाभार्थी.
  • कोविडवरील योजनेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निधी द्यावा लागणार. ३३०० कोटी रूपये त्यासाठी बाजूला काढून ठेवले.

४ हजार ५०० कोटी रूपयांची यंत्रणांच्या खरेदीसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.  साखळी तोडण्यासाठी हे निर्बंध घालत असून बंधन एकतर्फी नाहीत. प्राण वाचविण्यासाठी ही बंधन आहेत. माझ्यावर टीका करणारे कितीही करत असतील त्याची पर्वा न करता आपल्या चांगल्यासाठी हि बंधने लादत आहे. न चीडता, न रागावता हे स्विकारून सरकारबरोबर कोरोना भगावच्या लढ्यात सामील व्हा असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.

Check Also

गडकरींकडून आदर्श आचारसंहितेचा भंग, गडकरी व आमदार मोहन मतेंवर गुन्हा नोंदवा

भारतीय जनता पक्ष सर्वकायदे धाब्यावर बसवून सातत्याने आचारसंहितेचा भंग करत आहे. भारतीय जनता पक्षाचे नागपूर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *