Breaking News

नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून राज्यातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे उघडणार आरोग्याच्या नियमांचे मात्र काटेकोर पालन व्हावे-मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

मुंबई : प्रतिनिधी

नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे ७ ऑक्टोबरपासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे आपण नियोजन केले आहे. मात्र हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बऱ्याच बाबतीत निर्बंध शिथिल करीत आलो आहोत. सध्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये उतार येत असला तरी आपल्याला अधिक सावध राहावे लागेल.

धार्मिकस्थळे भक्तांसाठी खुली केली असली तरी त्याठिकाणी आरोग्याच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे. चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशकाचा वापर हा झालाच पाहिजे. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची यामध्ये मोठी जबाबदारी आहे हे विसरू नये, असेही त्यांनी सांगितले.

राज्यातील मंदिरे-प्रार्थनास्थळे खुली करण्याच्या अनुषंगाने भाजपा आणि त्यांच्याशी संलग्नित संघटनांकडून सातत्याने आंदोलने करण्यात येत होती. त्यातच काही दिवसांपूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही मंदिरे-प्रार्थनास्थळे खुली करण्याच्या अनुषंगाने महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडत आंदोलन केले. त्याचबरोबर सण-उत्सवही साजरे करण्याचे आवाहन केले. त्याचाच एक भाग म्हणून दहिहंडी उत्सवाला राज्य सरकारने परवानगी नाकारली असतानाही मनसेच्यावतीने दहिहंडी उत्सव साजरा करत राज्य सरकारच्या विरोधात असल्याचे त्यांनी दाखवून दिले.

अखेर राज्य सरकारने कोरोना आटोक्यात आल्याचे स्पष्ट झाल्यानंतरच सर्व धर्मियांची मंदिरे आणि प्रार्थनास्थळे पुन्हा एकदा उघडण्यास परवानगी दिली. गणेशोत्सव काळात आणि नंतर तिसरी लाट येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र आतापर्यंत तरी कोरोनाचा संसर्ग नियंत्रित ठेवण्यास राज्य सरकारला यश आले आहे. त्यामुळे जवळपास महिनाभरापासून राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत फारशी वाढ झाली नाही. मात्र बाधितांची संख्या स्थिर राहिली. यापार्श्वभूमीवर मंदिरे आणि प्रार्थनास्थळे खुली करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात येत आहे.

याचबरोबर पुढील वर्षात साधारणत: ४ ते ६ महिन्यानंतर अर्थात २०२२ च्या पहिल्या तिमाहीत राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जाहिर होणार आहेत. आधीच ओबीसी आरक्षणाच्या लढाईत राज्य सरकारचा सपशेल पराभव झाल्याचे दिसत आहे. त्यातच आता आणखी मंदिरे-प्रार्थनास्थळे बंद ठेवण्याच्या निर्णयाचा फटका या निवडणूकांमध्ये महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांना बसू नये यादृष्टीकोनातूनही हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

विशेष म्हणजे गणेशोत्सवाच्या आधाही मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला लोकलवरून फटकारल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीनंतर दोन लसीचे डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास खुला करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर दोन तीन दिवसांपूर्वी आणि आज सकाळी शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांच्यात बैठक झाल्यानंतरच मुख्यमंत्र्यांनी प्रार्थनास्थळे आणि मंदिरे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मंदिर आणि प्रार्थनास्थळांसाठीची नियमावली खालीलप्रमाणे :-

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *