Breaking News

मुख्यमंत्री म्हणाले, त्या “विकास”ने आपल्याला तोंड दाखवायला जागा ठेवली नाही मिशन ऑक्सिजन स्वावलंबन, कोविड केंद्रांची संख्याही वाढवणार

मुंबई : प्रतिनिधी

विकास होत राहील. पण जीव वाचले, तर विकासाला खरा अर्थ आहे. आपण विकास, म्हणून ज्याच्या मागे धावत होतो. त्या विकासाने आपल्याला तोंड दाखवायला जागा ठेवलेली नाही. आपल्याला ऑक्सिजनच्या मागे धावावे लागत आहे असल्याची अप्रत्यक्ष टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली. कोरोनाने आपल्याला धडा दिला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळातील आव्हानांना तोंड देण्याची तयारी आतापासूनच आम्ही सुरु केली आहे. पहिल्या लाटेत आम्ही खूप सुविधां जाणीवपूर्वक वाढवल्या. पण त्याही आता अपूऱ्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे आता लसीकरण सुरु झाल्यानंतरही आरोग्या सुविधा वाढविणाऱ्यावर भर आहे. आता जुलैनंतर पावसाळ्यामुळेही अनेक साथीचे आजार पसरू लागतात. त्यांना तोंड देण्यासह कोविडची तीसरी, चौथी आणि अशा कितीही लाटा आल्या तरीही त्यांना थोपविण्यासाठी, लोकांना उपचार मिळावेत यासाठी जास्तीत जास्तीत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जाणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिली.

कोविडच्या संकटाने सगळ्यांनाच खूप मोठा धडा दिला आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य व्यवस्था आणखी बळकट आणि अशा अनेक संकटांना तोंड देणारी ठरेल, यावर भर दिला जात आहे. पेटीएम फाऊंडेशनच्यावतीने राज्यात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर आणि लसीकरणासाठी राज्य शासनाला सहकार्य करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.  दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते.

पेटीएम फाऊंडेशन स्वतःहून पुढे आल्याबद्दल मुख्यंत्र्यांनी अशा संकटाच्या काळात राज्य आणि देशाच्या आर्थिक चक्राला गती देण्यासाठी असे प्रयत्न महत्वाचे ठरतील, असे कौतुकोद्गारही काढले.

बैठकीस राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय आणि पेटीएम-फाऊंडेशनचे विजय शेखर-शर्मा, सोनिया धवन, राजेंद्र गुल्हर आदी उपस्थित होते.

ऑक्सिजन हे आता औषध ठरल्याचे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील ऑक्सिजन निर्मिती पंधराशे मेट्रीक टनांपर्यंत वाढविण्याचे नियोजन आहे. त्याशिवाय ज्या-ज्या गोष्टी आवश्यक आहेत, त्या जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध होतील, असे प्रयत्न आहे. त्यामध्ये तात्पुरत्या आणि दीर्घकाळाचे असे नियोजन आहे. रुग्णशय्यांची संख्या, तसेच कोविड केंद्रांचीही संख्या वाढवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पेटीएम फाऊंडेशनने ऑक्सिजन निर्मिती, ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर आणि लसीकरणात लसीकरणासाठी सरकारी यंत्रणांना सहकार्य करण्यासाठी, लस उपलब्ध करून देण्यासाठी आर्थिक सहाय्याचीही तयारी दर्शवली आहे. या सगळ्या सहकार्याचे आणि पुढाकाराचेही मुख्यमंत्र्यांनी स्वागत केले.

यावेळी झालेल्या चर्चेत मुख्य सचिव कुंटे यांनी राज्यात ऑक्सीजनच्या उपलब्धतेबाबत आणि स्वयंपूर्णतेसाठी ‘मिशन ऑक्सिजन स्वावलंबन’ राबविण्यासाठी म्हणून विविध प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. व्यास आदींनीही सहभाग घेतला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रयत्न देशासाठी मार्गदर्शक

पेटीएम फाउंडेशनचे विजय शेखर-शर्मा यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कोविड उपाययोजनांसाठीच्या सातत्यपूर्ण प्रय़त्न आणि पुढाकाराचे कौतुक केले. कोविडच्या लाटेला रोखण्यासाठी मास्क वापरासह, लसीकरणाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांमध्ये महाराष्ट्राने पुढचे पाऊल टाकले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या दूरदृष्टीकोनातून सुरु असलेले प्रयत्न देशासाठी मार्गदर्शक असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

पेटीएम फाऊंडेशनचा पुढाकार..

पेटीएम फाऊंडेशनने ऑक्सिजन निर्मिती-पुरवठा, लसीकरण आणि लस उपलब्धतेसाठी निधी यासाठी आवश्यक असे योगदान देण्याची हमी दिली आहे. राज्यात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणीत, तसेच लसीकरणासाठी मुंबई-पुण्यातील मोठ्या कंपन्यांची कार्यालयांचा परिसर आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची तयारी. लशीसाठी आवश्यक अर्थसहाय्यही सामाजिक बांधिलकी निधीतून तसेच विविध मार्गातून आर्थिक भार उचलण्याची तयारी दर्शवली आहे.

Check Also

अमित शाह यांची घोषणा, सत्तेवर येताच संपूर्ण देशात समान नागरी कायदा

संपूर्ण देशात समान नागरी कायदा, एकाच वेळी लोकसभा-विधानसभा निवडणुका, ७० वर्षावरील प्रत्येक नागरीकास पाच लाखापर्यंत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *